सोलापूर : कोरोना काळात ‘एमपीएससी’च्या नियोजित परीक्षा विलंबाने घ्याव्या लागल्या. आयोगातही रिक्तपदे मोठी असल्याने पूर्वीच्या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होऊ शकले नाहीत. आता राज्य सरकारच्या सत्तासंघर्षात भावी अधिकारी तथा वयोमर्यादा संपण्याच्या उंबरठ्यावरील तरूण भरडला जात आहे. अडीच लाख पदे रिक्त असूनही मेगाभरतीचे नियोजनच सुरु आहे. दुसरीकडे ‘एमपीएससी’तर्फे १०० टक्के भरली जातील, असे आदेश असतानाही शासकीय विभागाकडून आयोगाला मागणीपत्र वेळेत पाठविली जात नसल्याने त्या तरूणांची चिंता वाढली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षांना दरवर्षी १२ ते १५ लाख तरुण असतात. अधिकारी होऊन काहीतरी करून दाखवण्याच्या उमेदीने लाखो तरूण घरापासून कोसो दूर अंतरावर राहत आहेत. हातावरील पोट असलेला पालक, आपला मुलगा एक दिवस अधिकारी होईल, या आशेने काबाडकष्ट करीत आहे. बळीराजाची मुले, रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्डवर हमाली करणाऱ्यांसह रात्रीअपरात्री जीव धोक्यात घालून रिक्षा किंवा टॅक्सी चालवणाऱ्यांची व बांधकाम मजुरी करणाऱ्यांचीही मुले त्यात आहेत. कौटुंबिक परिस्थितीमुळे ते तरूण-तरूणी पोटाला चिमटा घेऊन रात्रंदिवस अभ्यास करीत आहेत. सरकारकडून सर्व रिक्तपदे भरली जातील, त्यात आपलाही नंबर लागेल, अशी त्यांना आशा आहे. सरकारी विभागांकडून दरवर्षी सप्टेंबर महिन्यात ‘एमपीएससी’ला रिक्तपदांची मागणीपत्रे पाठविणे अपेक्षित आहे. पण, मागील तीन वर्षांत विविध कारणामुळे तसे झाले नाही. रिक्त जागा जास्त असतानाही मागणीपत्र कमी जागांचे पाठविले जाते आणि मुलाखतीपर्यंत गेलेला हुशार तरूणही अपयशी होतो, अशी स्थिती आहे. पिढ्यानपिढ्या पोटासाठी संघर्ष करणाऱ्यांची मुले अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करीत असतानाही राजकारण्यांना केवळ राजकारणच दिसत, असल्याचेही काहींचे मत आहे. पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरूणाने आत्महत्या केल्यावर तरी किमान सरकार व आयोगाची कार्यवाही गतिमान होईल, असा सर्वांनाच विश्वास होता. किशोरराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आयोगाचे काम गतिमान झाले, पण सरकार स्तरावर दिरंगाईच असल्याचे चित्र आहे.
रिक्तपदांच्या तुलनेत १२ टक्केच पदांची परीक्षा
राज्य सरकारमधील राज्य विक्रीकर निरीक्षकांची (एसटीआय) तब्बल ७३० पदे रिक्त असल्याची माहिती तरूणांनी माहिती अधिकारातून मिळविली. तेवढ्या जागा भरताना आपणही अधिकारी होणार, असा विश्वास हजारो तरूणांना वाटला. त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. पण, सुरवातीला केवळ ७७ जागांचेच मागणीपत्र आयोगाला दिले गेले. त्यामुळे वयोमर्यादेनुसार ही परीक्षा शेवटची असलेल्या तरूणांची चिंता वाढली. आता ८ ऑक्टोबरला त्या पदांची पूर्व परीक्षा आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आर्त हाक
राज्य विक्रीकर निरीक्षक पदासाठी पूर्व परीक्षा होण्यापूर्वी आयोगाला मागणीपत्र पाठविल्यास किमान मुख्य परीक्षेत तरी जागा वाढतील. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला मागणीपत्र पाठविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी तरूणांची आहे. त्यासंदर्भात तरूणांनी ‘ट्विटर’द्वारे अनेक नेत्यांना तशी आर्त हाक दिली आहे. पुढील आठवड्यात तरूणांच्या विषयासह मेगाभरतीसंदर्भात बैठक होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.