सोलापूर : सुमारे ४८ लाख लोकसंख्येच्या सोलापूर जिल्ह्यात सध्या ३८ लाख ५० हजारांवर मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात एक लाख ९२ हजार ३६ मतदार वाढले होते. दरम्यान, मतदार नोंदणी सर्वांसाठी खुली असून त्यावर जन्म व रहिवासी पुराव्यासंदर्भातील झेरॉक्स कागदपत्रे अपलोड केल्यावर मतदार नोंदणी होते. या पार्श्वभूमीवर ज्यांच्याकडे दोन्ही किंवा दोन्हीपैकी एक कागदपत्र नसल्यास तो दुसऱ्याच्या कागदपत्रावर स्वत:चे नाव टाकून त्याची झेरॉक्स अपलोड करूनही नाव नोंदवू शकतो, अशी स्थिती आहे.
सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमधील उद्योगांमध्ये अनेक वर्षांपासून काम करणारे मजूर आहेत. याशिवाय शिक्षण, रोजगार, नोकरीसह अन्य कारणांसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतर होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असते. अनेकजण एका जिल्ह्यातील मतदार दुसऱ्या जिल्ह्यात नोंदणी करतो. तरीदेखील, सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या ३८ लाख ५० हजारांहून अधिक असल्याची स्थिती आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी वाढलेल्या मतदारांमध्ये एक लाख ११ हजार महिला तर ८० हजारांवर पुरुष मतदार होते. लोकशाहीत मतदार वाढणे सकारात्मक बाब मानली जाते, पण बनावट मतदारांची नोंदणी होणार नाही, याचीही दक्षता महत्त्वाची आहे. निवडणूक काळात अनेकदा परराज्यातील मतदारांची नावे सोलापूर जिल्ह्याच्या यादीत असल्याचे बोलले गेले. दुबार, मयत किंवा स्थलांतरित मतदारांचा ‘बीएलओं’मार्फत सातत्याने सर्व्हे होतो, तरीदेखील मतदारांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.
मतदारांच्या वाढीवर अनेक पक्षांनी आक्षेप घेतला असून त्याचे उत्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देखील नाही. वर्षभर ऑनलाइन मतदार नोंदणी सुरूच असते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय स्तरावरून नोंदणीच्या नियमावलीत बदल करून नव्या मतदारांची नोंदणी करताना किमान झेरॉक्स कागदपत्रे प्रमाणित केलेली तरी असावीत, अशी सर्वांना अपेक्षा आहे. निवडणुकीपूर्वी मतदार यादी अंतिम करताना प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर लावल्यास गावकऱ्यांनाही त्यांच्या गावातील प्रत्येक मतदारांची नावे समजतील, असाही एक पर्याय समोर येत आहे.
संशयित मतदाराची होते बीएलओंकडून तपासणी
भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावरुन १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदार नोंदणी करता येते. मतदार नोंदणीसाठी जन्म व रहिवासी पुरावा लागतो. झेरॉक्स कागदपत्रे अपलोड केल्यावर मतदार नोंदणी होते. एखाद्याबद्दल शंका असल्यास ‘बीएलओ’मार्फत त्याची चौकशी होते.
- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील स्थिती
लोकसभेवेळचे मतदार
३६,५६,८३३
विधानसभेवेळचे मतदार
३८,४८,८६९
सात महिन्यांत वाढलेले मतदार
१,९२,०३६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.