सोलापूर : महापालिकेवर काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता होती, भाजपही पाच वर्षे सत्तेत राहिला. पण, सोलापूरकरांना नियमित पाणी मिळाले नाही. सध्या चार दिवसाआड पाणी असून साधारणत: १० मेपासून त्यात एक दिवसाची वाढ होण्याची शक्यता महापालिका अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक असल्याने या काळात पाणीपुरवठा विस्कळित होणार नाही, याची खबरदारी घेतली जात असल्याचे बोलले जात आहे.
सोलापूर शहराजवळील हद्दवाढ भाग १९९२ रोजी महापालिकेत समाविष्ट झाला, पण अजूनही तेथील नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. आता समांतर जलवाहिनीचे काम स्मार्ट सिटीतून सुरू आहे, पण काम पूर्ण झाल्यानंतरही शहरांतर्गत जलवाहिनी व्यवस्था सुधारावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून लोकसभेवेळी शहरातील पाणी, बेरोजगारी, तरुणांचे स्थलांतर असे मुद्दे प्रचारात आणले जातील. त्यामुळे सत्ताधारी आमदारांकडून शहराच्या पाणीपुरवठ्यावर दररोज लक्ष ठेवले जात असल्याची चर्चा आहे.
पण, ‘सोलापूरला नियमित पाणी आम्हीच देवू’ अशी खात्री भाजपचे आमदार देत आहेत. ‘सत्ताधाऱ्यांनी विमानसेवा दोन महिन्यात सुरू होणार होती, त्याचे काय झाले’ असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. आता निवडणुकीत सोलापूरचा पाणीप्रश्न पेटणार हे निश्चित मानले जात आहे.
आम्हीच सोलापूर शहराला देऊ नियमित पाणी
काँग्रेसची महापालिकेवर जवळपास ४० वर्षे सत्ता राहिली, पण त्यांनी शहराच्या भविष्याचा कधी विचार केला नाही. आता मोदी सरकार व राज्यातील महायुतीचे सरकार विकासाला प्राधान्य देत असून समांतर जलवाहिनी पूर्ण होत असतानाच ‘अमृत-२’मधूनही निधी मिळेल. त्यानंतर शहराला दररोज पाणी मिळेल, अशी खात्री असून विमानसेवा देखील काही महिन्यात सुरू होईल.
- विजयकुमार देशमुख, आमदार, भाजप, शहर उत्तर
---------------------------------------------------------------------------------------
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्ह्याचेच, तरीपण विकास नाही
जिल्ह्याचेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री होते, त्यावेळी सोलापूरला मोठी आशा होती. पण, ना उद्योग ना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. आता मोदी सरकारने गॅरंटी देत प्रत्येक घरी पाण्याचा नळ देण्याची योजना आणली. समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर अमृत-२ योजनेतून पाइपलाइन, ड्रेनेजची कामे होतील. त्यानंतर ३०-४० वर्षांपासूनचा सोलापूर शहराचा प्रश्न सुटेल.
- सुभाष देशमुख, आमदार, भाजप, दक्षिण सोलापूर
१० मार्चला सोलापूरसाठी पाणी अन् मार्चअखेर दुबार पंपिंग
उजनीतील पाणीसाठा सध्या उणे १७ टक्के असून सोलापूर शहराला १० मार्चपासून भीमा नदीतून पाणी सोडण्याचे नियोजन आहे. त्यानंतर उजनीतील साठा उणे ३२ टक्के होईल. मार्चअखेर महापालिकेला दुबार पंपिंग करावे लागणार असून पाणी कमी झाल्याने मेमध्ये सोलापूरचा पाणीपुरवठा पाच दिवसाआड होवू शकतो. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन केले जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.