महाराष्ट्र बातम्या

Maratha Andolan : जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित! भिडेंनी आंदोलनाला दिलेल्या भेटीचा अर्थ काय?

Komal Jadhav (कोमल जाधव)

मुंबई - संपूर्ण महाराष्ट्रात, घराघरात पोहचलेलं नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील. मराठा आरक्षणासाठी मागील १७ दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटी गावात त्यांचा लढा सुरु आहे. त्यातच २ सप्टेंबरला उपोषणस्थळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला. त्यानंतर पवारांपासून आंबेडकरांपर्यंत विविध पक्षांच्या राजकीय नेतेमंडळींनी उपोषणस्थळी जाऊन जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. जरांगे पाटील यांनी उपोषण थांबवले असले तर आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारवर दबाव वाढत असतानाच १२ सप्टेंबर म्हणजेच मंगळवारी संभाजी भिडे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी उपोषणस्थळी गेले होते. त्यामुळे संभाजी भिडेंनी मराठा आंदोलनाला भेट देण्याचा अर्थ काय? ते समजून घेणार आहोत.

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावात पोहचले. तिथे जाऊन त्यांनी मनोज जरांगेंशी चर्चा केली. मराठा आरक्षणाचा विषय गुंतागुंतीचा असला तरी सरकारकडून तुमच्या मागण्यांची पूर्तता केली जाईल, अशा आशयाचं आश्वासनही भिडेंनी दिलं. पण भिडेंच्या जालन्यातील हजेरीवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी तर थेट भिडे हे सरकारचा सांगकाम्या असल्याचं म्हणत टीका केली. त्यामुळे भिडेंच्या आंदोलनाला जाण्यामागे राजकीय अर्थ पाहावे लागतील.

भिडेंची हिंदुत्ववादी ओळख

संभाजी भिडेंचं मूळ नाव मनोहर भिडे आहे. हिंदू धर्म, संस्कृती, परंपरा जोपासण्याच्या दृष्टीनं ते आग्रही दिसतात. नुकतंच मुंबईत एका कार्यक्रमात महिला पत्रकाराच्या कपाळाला टिकली दिसली नाही तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तो वादही राज्यात चांगलाच गाजला. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारांनी आणि हिंदुत्वाचा प्रचार करण्यासाठीही भिडे प्रयत्नशील असतात.

भिंडेचे समर्थक बहुजन समाजातील सर्वाधिक

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास ते सांगतात. त्यांना भिडे गुरुजी असंही म्हणतात. विशेष म्हणजे गांधी, नेहरुंच्या विचारांना अमान्य करणारे संभाजी भिडे शिवरायांचा इतिहास मात्र आवडीनं आणि उत्स्फूर्तपणे त्यांच्या खास शैलीत अनुयायांना पोहचवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग हा बहुजन समाजातला आहे.

सरकारला मदत करण्याचा हेतू

जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावात सुरु असलेल्या उपोषणस्थळी जाऊन संभाजी भिडेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक करत त्यांनी मनोज जरांगेंना लढा सुरुच ठेवू पण उपोषण मागे घेण्याची विनंती केली. शिवाय, मराठा आरक्षणाचा लढा माझ्याकडे सोपवा, मी त्याचा शेवट आरक्षण मिळवूनच करतो, अशा आशयाचं वक्तव्य केल्यानं ते सरकारला मदत करण्याच्या हेतूनंच तिथे आले होते, असा प्रश्न उपस्थित होतोय.

मराठवाड्यात संघटन वाढवण्याचा प्रयत्न

संभाजी भिडेंची शिवप्रतिष्ठान संघटना आणि भिडेंचं वास्तव्य हे सांगलीत आहेत. त्यात महाराजांचे गडकिल्लेही पश्चिम महाराष्ट्रातच आहे. त्यामुळे भिडेंचा वावर आणि प्रचारही पश्चिम महाराष्ट्रातच दिसून येतो. अशातच मराठवाड्यात आपलं संघटन वाढवण्याच्या हेतूनं संभाजी भिडे जालन्यातल्या आंदोलनस्थळी पोहचले असावेत, अशी शक्यता वर्तवली जाते.

हिंसेत भिडे समर्थकांच्या समावेशाचा आरोप

आजपर्यंत मराठा समाजाने जेवढी आंदोलनं केली ती सर्व शांततेच्या मार्गाने झाली. त्यामुळे जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावातल्या मराठा आंदोलनात उद्रेक करणारे संभाजी भिडेंचेच कार्यकर्ते होते, असा आरोप जालना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय लाखे पाटील यांनी केला. आणि संभाजी भिडेंशी जवळचे संबंध असणारे आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

एकीकडे सरकारकडून वारंवार जीआर काढून, शिष्टमंडळ पाठवून उपोषणकर्ते मनोज जरांगेंची समजूत काढण्याचं प्रयत्न होतोय. पण, मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असून उपोषणापासून मागे हटायला तयार नाहीत.

दुसरीकडे मराठा आंदोलनातील राड्यानंतर गृहमंत्री फडणवीस मराठा संघटना आणि विरोधकांच्या निशाण्यावर आलेत. त्यामुळे फडणवीसांनी मध्यस्थीसाठी आणि जरांगे पाटलांवर दबाव आणण्यासाठी संभाजी भिडेंना आंदोलनस्थळी पाठवलं असावं अशीही चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT