when jyotiba phule got title of mahatma 11 may 1888 sakal
महाराष्ट्र बातम्या

'महात्मा' पदवी आणि मुंबईकरांचे योगदान

११ मे १८८८ रोजी जोतीराव फुलेंच्या वयास साठ वर्ष पुर्ण झाली होती.त्यांनी निवडलेला जीवनमार्ग कडकडीत व खडतर होता.

सकाळ वृत्तसेवा

११ मे १८८८ रोजी मुंबईतील मांडवी कोळीवाडा येथे असलेल्या वडगांव गादी रघुनाथ अर्थात रघुनाथ महाराज सभागृह मध्ये झालेल्या कार्यक्रमात मुंबईतील कष्टकरी जनतेच्यावतीने जोतीराव फुलेंना " महात्मा" पदवी प्रदान केली होती. त्याचे हे स्मरण...

११ मे १८८८ रोजी जोतीराव फुलेंच्या वयास साठ वर्ष पुर्ण झाली होती.त्यांनी निवडलेला जीवनमार्ग कडकडीत व खडतर होता. या मार्गावर ते सतत चाळीस वर्ष चालत होते.ती एक सामाजिक तपश्चर्या होती. या काळात त्यांना पुरेशा सोयी-सुविधा नसतांनाही महाराष्ट्राचा कानाकोपरा धुंडाळून काढला होता.

समाज जागृतीसाठी अहोरात्र झटले होते. स्त्री-शूद्रातिशूद्रांच्या दाराकडे ज्ञानगंगा वळविली होती. अन्यायाचा प्रतिकार करण्याची शिकवण जनतेस दिली होती. उच्चवर्णिय स्त्रियांच्या केशवपन व भृणहत्त्यासारख्या निंदनिय व दयनीय रुढींविरुध्द कृतीशील संघर्ष करुन तथाकथित उच्चवर्णियांना आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडले होते.

ब्राह्मण स्त्रियांचे जे उग्र प्रश्न ब्राह्मणांनी सोडवायचे होते, ते या माळ्याच्या पोराने सोडवले होते. समस्त ब्राह्मण समाजावर माळी समाजाचा व जोतीराव फुलेंचा हा हिमालयाऐवढा उपकार आहे, जो ब्राह्मणांनी अजूनही फेडलेला नाही!

अशा श्रेष्ठ साधुवृत्तीच्या सत्पुरुषाचे अल्पसे उतराई व्हावे, अशी भावना त्यांच्या मुंबईतल्या अनुयायांच्या व नारायण मेघाजी लोखंडे आणि विठ्ठलराव वंडेरांच्या मनात उत्पन्न झाली. त्यांना या माणसात बोधीसत्व दिसले तर साधुंना त्यांच्यात सामान्य माणूस दिसला. अशा या महापुरुषाचा, साधुपुरुषाचा सत्कार करायचा त्यांच्या मुंबईकर अनुयायांनी ठरविले. व तारीख मुक्रर केली ११ मे १८८८.

मांडवी कोळीवाड्याचा रधुनाथ महाराज सभागृह शृंगारण्यात आला होता. कारण मुक्तीदात्याचे व ऊध्दारकर्त्याचे ऋण फेडण्यासाठीचा हा समारंभ होता. ब्राह्मण समाजाने जे करायला हवे होते , मुंंबईकर कष्टकरी कामगार व बहुजनांनी केले होते. सभास्थानी जसे सुशिक्षित, श्रीमंत,पागोटे घातलेले व फेटेवाले होते, तसेच जीर्ण टोप्या व फाटके कपडे घातलेले असंख्य अनुयायी होते.

श्रीमंत घराण्यातील स्त्रिया जशा होत्या, तशा ठिगळांचे लुगडे असलेल्या बहुसंख्य बायाही होत्या. दारिद्रयाने पिडलेले, पोटासाठी आपले गाव, मुलंबाळं, घरदार सोडून आलेल्या पारिव्राजकांचा, मनुष्यत्वास पारखा झालेल्या मानवांचा तो समुदाय होता. या समारंभासाठी बडोदे, खानदेश, सातारा, पुणे, विदर्भ वैगरे भागातील अनेक नामवंत आले होते. पंढरीच्या वाळवंटात सर्व सर्वस्तरीय विठ्ठलभक्तांची जणु ती मांदियाळी होती !

जोतीराव फुले सभास्थानी येताच, उपस्थितांच्या डोळ्यात कृतज्ञता चमकू लागली होती. काहींच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले होते. "जोतीरावांचे असामान्य धैर्य, त्याग, ध्येयनिष्ठा, समता व समभाव यांचा पुरस्कार, व मानवी हक्काचे दरवाजे उघडणारे हे प्रथम महापुरुष आहेत " अशा आशयाचे गौरवपुर्ण भाषण नारायण मेघाजी लोखंडेनी केलं होते. इतर मान्यवरांनी सांगितले की, सतत अहोरात्र चाळीस वर्षे नि:स्वार्थपणे जनसेवा करणारे हेच महाराष्ट्रातील आद्य महापुरुष आहेत.

काहींनी सांगितले की, एकांडी शिलेदारांप्रमाणे प्राणपणाने अज्ञानाविरुध्द ,सनातन्यांविरुध्द व परंपरावाद्यांविरूध्द निकराने व प्राणपणाने लढा देणारे हेच एक युगप्रवर्तक आहेत. असा महात्मा या भारतभूमीत बुध्द कालखंडानंतरच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात शोधूनही सापडणार नाही...." मान्यवर उपस्थितांच्या अशा समयोचित भाषणानंतर बडोद्याचे राजे सयाजीराव महाराज गायकवाड यांनी मुद्दाम पाठवून दिलेला संदेश वाचून दाखवण्यात आला. त्यात महाराजांनी लिहून पाठविले होते की,

" जोतीराव हे भारताचे बुकर टी वॉशिंग्टन आहेत " अशा उत्साहपुर्ण वातावरणात राव बहाद्दूर विठ्ठलराव कृष्णराव वंडेकर यांनी एक भला मोठा हार हातात घेतला व सांगीतले की, " यांच्या तपश्चर्येमुळे अखिल महाराष्ट्रातील स्त्री-पुरुषास मानवी हक्कांचा, जागृतीचा व चैतन्याचा कायमचा ठेवा मिळाला, म्हणून हेच आमचे खरे महात्मा !

" व तद्नंतर " महात्मा फुले की जय " असा त्रिवार जयघोष त्यांनी केला व हाततला हार जोतीरावांना अर्पण केला. ते पुढे म्हणाले की, " आम्ही स्वयंस्फुर्तीने जोतीरावांना ' महात्मा' पदवी अर्पण करीत आहोत." अशा भावूक व तितक्याच ऐतिहासिक वातावरणात महात्मा फुले या सत्काराला मोजक्या शब्दात उत्तर द्यायला उठले.

टाळ्यांच्या गडगडाटाने सभागृह दुमदुमून गेले. महात्मा क्षणभर थांबले.सभागृह स्तब्ध झाला. महात्मा बोलू लागले .. " जनी जनार्दन ! संत बोलती उत्तर " या वचनाप्रमाणे मी अल्पसे कार्य केले. मानवाची सेवा हीच निर्मिकाची सेवा असे माझे मन मला नित्यही ग्वाही देत आहे. याप्रमाणे मी केले. व पुढेही करीत राहीन. सत्यशोधक समाजाच्या कार्यास तुम्ही निष्ठापूर्वक सहाय्य करीत जाणे. हजारो वर्षे जे पददलित म्हणून ठरले गेले, त्यांना माणुसकीचे हक्क देण्यासाठी झटणे यापेक्षा मी दुसरा कोणताच धर्म मानीत नाही.

हेच तुम्हा सर्वांचे कर्तव्य आहे. स्त्रिया व अस्पृश्य यांना त्यांच्या जन्मास येण्याचे साफल्य करणे! त्यांच्या दुर्दशेकडे व हालांकडे आजपर्यंत धर्माच्या व शास्त्राच्या नावावर मुद्दाम डोळेझाक झाली, ती दूर करण्यास मदत करा!. मी माझे कर्तव्य केले. यात विशेष असे माझ्या हातून घडले नाही " ऐवढे बोलून महात्म्याचा कंठ दाटून आला. उपरण्याने डोळे पुसत ते सावकाश खुर्चीवर बसले. व सारा सभागृह 'महात्मा फुले की जय ' या जयघोषांनी कितीतरी वेळ दुमदुमत राहिला..!

जीवनात आपल्या हातून एक खुप महत्वाचे कर्तव्य पार पाडल्याची भावना नारायण मेघाजीं लोखंडे व रा. ब. विठ्ठलराव वंडेकर यांच्या चेहऱ्यावर विलसत होती. एका ऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार बनलो अशी भावना मंचकावर उपस्थित आसलेल्या मान्यवरांच्या मनात उद्भवली होती.

एका खऱ्याखुऱ्या महामानवाला आपल्या मुंबईने "महात्मा " ही पदवी दिली या भावनेने सर्व मुंबईकर सुखावले होते. मुंबई नगरीत एक सामाजिक इतिहास घडला होता. "सुसंस्कृत पुण्याने सतावलं पण कष्टकरी व गतीशील मुंबईने सावरलं, माझ्या पाठीवरून मायेने हात फिरविला " अशी भावना जोतीरावांच्या मनात दाटून आली होती. याच ११ मे १८८८ या तारखेने इतिहास घडवला होता!.

- राजाराम सूर्यवंशी, बदलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बच्चू कडू अन् आंदोलकांच्या तावडीत सापडले भाजप आमदार; 4 तास बसवून ठेवलं

Pune Airport : उत्कृष्ट सेवेमुळे पुणे विमानतळ 'नंबर वन', एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी सर्वेक्षणात सर्वोच्च रेटिंग

Panchang 29 October 2025: आजच्या दिवशी दत्त कवच स्तोत्र पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

Neelam Gorhe: लोककलांच्या जतनासाठी समिती स्थापन करा : डॉ. नीलम गोऱ्हे; महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात विविध लोककला अमूल्य वारसा

Latest Marathi News Live Update : नवले पुलाजवळ ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले, तीन वाहनांना धडक, दोघे जखमी

SCROLL FOR NEXT