सोलापूर : ऑनलाइन व शाळाबाह्य कामांसाठी शिक्षकांच्या हाती वारंवार मोबाईल दिला जातोय. हा मोबाईल शिक्षकांच्या हातातून कायमचा काढण्यासाठी सर्व प्रकारची ऑनलाईन व शाळाबाह्य कामे आणि सर्व्हेक्षणाची कामे रद्द करावीत, अशी मागणी शिक्षक सहकार संघटना व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यावर शिक्षणमंत्री सकारात्मक असून आगामी शैक्षणिक वर्षापासून अध्यापनाशिवाय अन्य कामांचा शिक्षकांवरील बोजा तथा ताण कमी होण्याची आशा आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांमधील शिक्षकांसह सर्व स्वायत्त संस्थांमधील शिक्षकांच्या हातातील मोबाईल हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणात अडथळा ठरत आहे. शिक्षकांना वारंवार विविध प्रकारची माहिती ऑनलाईन लिंकद्वारे मुदतीत भरावी लागते. जिल्हा परिषदांमधील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अजूनही कमी आहे. अशातच शासन स्तरावर विचारली जाणारी वेगवेगळी माहीती लिंकद्वारे भरण्याचा प्रकार पूर्णत: बंद व्हावा. शासनात राबवित असलेल्या उपक्रमांचे आठवडे, पंधरवाडे, दिवस, बंद करायला हवेत.
वारंवार ऑनलाईन लिंकवर माहिती भरणे, व्हिडीओ व फोटो अपलोड करणे, अशा प्रकारांमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तसेच शाळा सुरु झाल्यानंतर पायभुत चाचणीसह इतर अंवातर सर्व चाचण्या थांबवून महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रमच राबविण्याची व त्याचेच मूल्यमापन चाचण्या घेण्यात याव्यात, शिक्षकांना केवळ निवडणूक व जणगणना याशिवाय कोणतीही कामे देऊ नयेत, अशा या संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत.
शिक्षकांना करावी लागतात १५१ प्रकारची कामे
विविध प्रकारचे सर्वेक्षण, बीएलओ, अशी तब्बल १५१ प्रकारची कामे शिक्षकांना करावी लागतात. शाळाबाह्य सर्वच कामे आणि ऑनलाईन लिंकद्वारे माहिती भरणे, अशी सर्व शाळाबाह्य कामे रद्द केल्यास शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी वेळ मिळेल. शिक्षकांवरील शाळाबाह्य कामाचा ताण कमी झाल्यास विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येणार आहे. उल्हास अॅप, स्विटचॅट अॅप, ओटर अॅप अशा सर्व ॲपवरील शिक्षकांना करावी लागणारी कामे बंद करावीत, तसेच अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांसाठी ‘टिईटी’ उत्तीर्णची अट रद्द करावी, अशाही मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. निवेदनावर संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, सचिव निलेश देशमुख, उपाध्यक्ष मनोज कोरडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मुख्याध्यापक संघ महामंडळाचेही निवेदन
राज्यातील शिक्षण आनंददायी, गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी शिक्षकांना लावलेली अशैक्षणिक कामे बंद करावीत. शिक्षण विभागाच्या परवानगीशिवाय शिक्षकांची सेवा कोणत्याही विभागाला वर्ग करू नये, शिक्षकांची प्रशिक्षणे व परिसंवाद दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी पूर्वनियोजन करावे. नवीन शैक्षणिक धोरण राबवताना महाराष्ट्रातील तज्ज्ञ शिक्षकांची थिंक टॅंक तयार करून सर्व शिक्षकांना याबाबत प्रशिक्षण द्यावे, यासह इतर मागण्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केल्या आहेत. मुंबईतील जयहिंद महाविद्यालय शिक्षणमंत्री भुसे यांनी महाराष्ट्रातील प्रमुख संघटनांच्या अध्यक्ष व सचिवांची बैठक घेतली. त्यामध्ये या मागण्यांचे निवेदन महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने व सचिव नंदकुमार सागर यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.