Dilipkumar Sakal
मनोरंजन

शोकात्म भूमिकांचा राजा !

अभिनय सम्राट, अभिनयाचे गौरीशंकर, अभिनयातला शेवटचा शब्द अशा विविध बिरुदावली ज्या अभिनेत्याला लाभल्या आणि हिंदी चित्रपटातील अभिनयाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार म्हणून कायम पहिले जाते तो अभिनेता म्हणजे दिलीपकुमार!

धनंजय कुलकर्णी

संयत अभिनयावर भर देत त्याने वाक्यातील ‘स्तब्धतेलाही’  नवा अर्थ मिळवून दिला. दुःखाने भिजलेल्या दिलीपच्या  अनेकानेक चित्रपटांनी रसिक पुरते मोहविले.

अभिनय सम्राट, अभिनयाचे गौरीशंकर, अभिनयातला शेवटचा शब्द अशा विविध बिरुदावली ज्या अभिनेत्याला लाभल्या आणि हिंदी चित्रपटातील अभिनयाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार म्हणून कायम पहिले जाते तो अभिनेता म्हणजे दिलीपकुमार! त्याचा अभिनयाचा प्रवास मोठा ‘दिलचस्प’ होता. तराना, देवदास, फुटपाथ, संगदिल, दीदार, आरजू अशा सुरुवातीच्या चित्रपटातून भग्न हृदयाचा / वैफल्यग्रस्त प्रेमी रंगवून त्याने ‘शोकात्म भूमिकांचा राजा’ ही पदवी रसिकांकडून मिळविली. एकाहून एक सरस दर्दभऱ्या भूमिकांतून तो दुःखी मनाला ‘मीठा दर्द’ देत होता.

भूमिकेत संपूर्णपणे विरघळणे म्हणजे काय याचा आदर्श आणि सर्वांगसुंदर परिपाठ म्हणजे दिलीपने घालून दिला. त्याचा कालखंड देखील ‘असाधारण’ असाच होता. इंग्रजी साहित्य, चित्रपट यामुळे भारतातही प्रेक्षकांची कलात्मक जाणीव वृद्धींगत होत होती. शहरी उच्च शिक्षित वर्ग नकळतपणे येणाऱ्या पश्चिमेकडील सांस्कृतिक वातावरणाशी एकरूप होऊ लागला होता. उच्च श्रेणीची ‘सांस्कृतिक भूक’ हवीहवीशी वाटत होती. त्यामुळेच  कलकत्यात न्यू थिएटर मधील शरतचंद्र, रवींद्रनाथांच्या साहित्याचा अंतर्भाव असो, बॉम्बे टॉकीज मधील सामाजिक आशय असो वा पुण्याच्या प्रभात मधील सामाजिक भानासोबतच असलेला नवतेचा  ध्यास असो हे त्याचेच द्योतक होते.

दिलीपच्या रुपेरी आगमनापूर्वी सोहराब मोदी, पृथ्वीराज कपूर ही बव्हंशी  मंडळी रंगभूमीवरून चित्रपटात आल्याने त्यांच्या आवाजाचा पोत वेगळा होता आणि अभिनयात  नाटकी ढंग असणे स्वाभाविक होते. पण, दिलीपने ही संवाद शैली मोडून काढली. त्याने शब्दाच्या ओघातील ‘स्तब्धतेचे’ महत्त्व अधोरेखित केले. अलंकारिक पल्लेदार भाषेच्या ऐवजी तुटक, व्याकरण रहित भाषा आणली. त्याने वाक्यातील प्रत्येक  शब्दाला ''भाव'' दिला, ''रंग'' दिला आणि चित्र प्रतिमेला ''कलात्मक'' बनवले.

दिलीप/राज/देव या सदाबहार त्रिकुटाचे आगमन नेमके याच वेळी झाले. दिलीपच्या दर्दभऱ्या अदाकारीला एक चमकते सौंदर्य होते. ११ डिसेंबर १९२२ रोजी पेशावर येथे जन्मलेल्या दिलीपकुमारचा रुपेरी पडद्यावरील प्रवेश अनपेक्षितपणे झाला. बॉम्बे  टॉकीजच्या देविकाराणी ने त्याला अभिनयाबाबत विचारले. प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा युसूफखान (मूळ नाव)  सुरुवातीला खूप  लाजाळू होता. चित्रपटासाठी त्याने काही वेगळे नाव घ्यावे असे देविकाराणीने त्याला सुचविले. त्यावेळी  बॉम्बे  टॉकीजमधील पंडित नरेंद्र शर्मा यांनी ‘वासुदेव’, जहाँगीर आणि ‘दिलीपकुमार’ या तीन नावांचे पर्याय त्याच्यापुढे ठेवले. देविकाराणीचा आग्रह  ‘दिलीपकुमार’ या नावाशी होता कारण हे नाव अशोककुमार या नावाशी साधर्म्य साधणारे होते. अशा प्रकारे दिलीपचे फिल्मी बारसे पार पडले.  त्याचा पहिला सिनेमा ''ज्वार भाटा'' २६ नोव्हेंबर १९४४ रोजी प्रदर्शित झाला,आणि फ्लॉप ही झाला. त्या वेळच्या परखड सिनेमा मासिक ''फिल्म इंडिया'' च्या बाबूराव पटेल यांनी दिलीपच्या अभिनयावर जहरी टीका केली होती. दिलीपने अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण केले.

अभिनय सुधारण्यासाठी दिलीपने अपार मेहनत घेतली. देश-विदेशातील उत्तमोत्तम चित्रपट तो पाहू लागला. हॉलीवूडमधील त्या कालचे आघाडीचे कलावंत पॉल म्युनी, जेम्स स्टीवर्ट, इन्ग्रिड बर्गमन यांच्या अदेतील बारकावे आत्मसात करू लागला. काव्य, शास्त्र, विनोद याची त्याला उत्तम जाण  होतीच. विविध भाषा, त्यातील व्याकरण याचा त्याने सखोल अभ्यास केला. संयत अभिनयावर भर देत त्याने वाक्यातील ‘स्तब्धतेलाही’  नवा अर्थ मिळवून दिला. दुःखाने भिजलेल्या दिलीपच्या  अनेकानेक चित्रपटांनी रसिक पुरते मोहविले. नदिया के पार, शहीद, जुगनू, मिलन, मेला, शबनम, जोगन, बाबुल आणि  अंदाज! दिलीपच्या ऐन तारुण्यातील हे सर्व सिनेमे म्हणजे त्याच्या चाहत्यांकरिता ‘मर्म बंधातली ठेव ही’ असे आहेत! २१ मार्च १९४९ रोजी मुंबईच्या लिबर्टी या आलिशान चित्रपट गृहात ‘अंदाज’ झळकला. आणि खऱ्या अर्थाने मल्टी स्टार युगाचे बिगूल वाजले. दीदार, यहुदी, संगदिल, शिकस्त, फुटपाथ आणि कळसाध्याय  शोभावा असा बिमल रॉयचा देवदास! आज इतकी वर्ष झाली पण ''कौन कम्बख्त है जो  बर्दाश्त करने के लिए पिता है''  ''इतनीसी भूल और इतनी बडी सजा'' , ‘ वो शादी के रास्ते चली गई और मै बरबादी के’ हे संवाद रसिक विसरलेले नाहीत.

अभिनयाचा पुढील टप्पा

दिलीपच्या अभिनयाचा दुसरा टप्पा सुरु झाला बी आर च्या ''नया दौर'' पासून ! या काळात त्याने हलक्या-फुलक्या, खेळकर, मस्तवाल, रोमॅंटिक भूमिका केल्या. यात कोहिनूर, मधुमती, लीडर, ‘दिल दिया दर्द लिया’, ‘आदमी’, राम और श्याम, गोपी, संघर्ष या भूमिका आल्या. याच काळात त्याचे दोन महत्त्वपूर्ण सिनेमे आले ''मुघल ए आझम’ आणि ‘गंगा जमुना!’ दिलीपच्या अभिनयाचा तिसरा टप्पा चरित्र नायकाचा जो सुरु झाला १९८१ सालच्या ‘क्रांती’ पासून. या काळात त्याचे शक्ती, विधाता, मशाल, सौदागर, मजदूर, कर्मा असे चित्रपट आले. गंभीर शोकमग्न भूमिकांत हातखंडा असणाऱ्या दिलीपने पुढच्या दोन्ही टप्प्यात जबरदस्त बाजी मारली. कलात्मक चित्रपट हा अलीकडच्या काळातील शब्द पण दिलीपचा मधुमती काय किंवा तराना काय किंवा ‘सगिना’ काय ‘सिम्पली क्लासिक’ या गटात मोडणारे होते.

दिलीप कुमार यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील तीन पिढ्यांना मोहित करणारा अखेरचा तारा निखळला गेला!

(लेखक मुक्त पत्रकार आणि चित्रपट अभ्यासक आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT