sridevi
sridevi 
मनोरंजन

हर किसीको नही मिलता...

हेमंत जुवेकर

जे जे हवं असतं आयुष्यात ते सगळं मिळतंच सगळ्यांना असं नाही होत. वरकरणी सुखी वाटणाऱ्या आयुष्यांना अपुर्णतेचा शाप असूच शकतो. रंगबावऱ्या दुनियेत वावरणाऱ्या अभिनेत्रीच्या आयुष्याचे रंगही उदासवाणे असूच शकतात...  

तिचा रुपेरी पडद्यावरचा प्रवास खूपच लहानपणापासून सुरु झाला. नेमकं सांगायचं तर वयाच्या तिसऱ्या वर्षापासून. तिच्या चेहऱ्यातल्या गोडव्याला  रंगाची, मेकअपची साथ आहे ती तेव्हापासून...   बाॅलिवूड स्टाईलने सांगायचं तर, ``एकबार ये रंग चेहरेपे चढ जाये ना, तो उतरताही नही...``
तिचाही नाही उतरला.
पडद्यावर वेगवेगळे रंग दाखवले तिने. पण त्या रंगापलिकडची ती नेमकी होती कशी, नाही कळलं फारसं  कुणाला.
तिला फार कुणी मैत्रिणी नव्हत्या... जिवाभावाच्या म्हणाव्या अशा.
तिचं आयुष्य त्यामुळे फार कुणासमोर उघड नाही झालं कधी. 
तिच्या खऱ्या नावासारखंच. 
ती होती श्री अम्मा येंजर अय्यपन.
म्हणजेच श्रीदेवी. 

या गोड चेहऱ्याच्या अभिनेत्रीने करियरच्या सुरवातीला पुरुष भुमिका केल्या होत्या. 
अर्थात डेझी-हनी इराणी, सारिका, नितू सिंग अशा अनेकांची बालकलाकारांची सुरुवात तशीच झाली होती म्हणा...  पण चेहऱ्यातला गोडवा आणि तितकाच गोड अभिनय यामुळे मग तिच्यासाठी सिनेमात खास भुमिका तयार केल्या जाऊ लागल्या. मल्याळी, कन्नड आणि तेलगु अशा दक्षिणेकडच्या सिनेमात तिचं असणं नेहमीचं बनलं. लहानपणीही आणि मोठी झाल्यावरही. सिनेमाचे तिच्यावर झालेले संस्कार साऊथचे असल्याने अभिनयातल्या लाऊडपणाची तिला आणि तिच्या चाहत्यांनाही सवयच झाली होती. म्हणूनच, ती हिंदीत  जेव्हा आली तेव्हा तिचा अभिनय नव्हे तर `अंग`भूत सौदर्यच जास्त पाहिलं गेलं.  

तिला अभिनयही करता येतो हे कळण्यासाठी सदमा यावा लागला. या सिनेमात तिच्या अभिनयाचं कौतुक झालं असलं तरी, खरंतर त्यातही ती थोडी लाऊडच वाटली होती अनेकांना. (पण, समोर कमलहसन असल्यामुळे ती शैली चालून गेली असावी)
 पण नंतर नंतर मात्र प्रयत्नपुर्वक तिने स्वतःत सुधारणा केली. लम्हे आणि चांदनी सारख्या सिनेमात अनेक प्रसंगात ती अंडरप्ले करते, आणि जे पोहाचायला हवं ते पोहचतंच आपल्यापर्यंत. तिची ही खासियतच होती. फार पटकन शिकायची ती. सुरुवातीच्या अनेक सिनेमात तिचा आवाज तिचा नाही. याचं कारण तिचे `सौथ इन्डियन्` उच्चार.

पण एकुणातच, दाक्षिणात्य सौदर्यवतींच्या गोडव्याला नजर लागू नये म्हणून त्यांचा आवाज न त्यांचे उच्चार तसेच असतात बहुतेक. साऊथहून आलेल्या अनेक अभिनेत्रींना आपल्या सुरुवातीच्या चित्रपटात डबिंगचा आधार घ्यावा लागतो तो त्यामुळेच. काहींनी नंतर मेहनत करून आपले उच्चार सुधारले. काहींनी नाही. 
 हेमा मालिनीचे उच्चार अगदी आताच्या बागबानमध्येही, हेम्माअम्माचेच वाटतात. अर्थात याला अपवादही असतात म्हणा, वैजयंतीमाला आणि मिनाक्षी शेषाद्रीसारखे. 
श्रीदेवीनेही मेहनतपुर्वक आपले हिंदी उच्चार बऱ्यापैकी सुधारले. इंग्लिशविग्लिश मध्ये ती बरंच बरं बोललीय. तिची मेहनत दिसलीच त्यात.  त्यामुळेच तर पुरस्कारांचा वर्षाव झाला ना त्या सिनेमासाठी तिच्यावर.  

अर्थात, पुरस्कार पटकावणं नवं नव्हतंच तिच्यासाठी. त्याची सुरुवात अगदी १९७१ पासूनच झाली होती. तिच्या भुमिकेला तेव्हा केरळ राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट बालकलाकारासाठी असलेला पुरस्कार मिळाला होता.
 हिंदीत ती अंमळ उशीराच आली. काहींना तिचा पहिला हिंदी सिनेमा, जंपिंग जॅक जितेद्रबरोबरचा हिंमतवाला वाटतो. काही जण सोलवा सावन असं छातीठोकपणे सांगतीलही. पण अमोल पालेकरची नायिका बनून आलेल्या त्या सिनेमापुर्वीही ती हिंदी सिनेमात दिसलीच होती.   

लक्ष्मी नावाची अभिनेत्रीचा पहिला हिंदी सिनेमा होता तो... ज्युली. त्यात ती होती. म्हणलं तर बालकलाकार, पण त्यानंतर ती बालकलाकार एकदोन वर्षांतच  साऊथच्या सिनेमांतून हिराॅईन म्हणून गाजायला लागली. तीही एनटीआर, कमल हसन आणि रजनीकांत यासारख्या दिग्गज हिरोंसमोर.   

पडद्यावर आलेली अभिनेत्री ही अल्पकाळची नायिका आणि अनंत काळची माता असते हे अनेक अनेकींनी सिद्ध केलंय. (जुर्माना, बरसात की एक रात मध्ये अमिताभची नायिका असलेली राखी शक्ती मध्ये त्याची आई  बनली.)  नाही म्हणायला श्रीदेवीही वयाच्या तेराव्या वर्षी आई झालीच होती, पडद्यावर. आपल्या गाजलेल्या हिरोची. रजनीकांतची. 

पण त्यानंतर मात्र ती सदैव नायिकाच होती. अगदी शेवटच्या माॅम मध्येही. 
तिचं करीयर असं बहरतच गेलं. नव्हे ते बहरलेलच होत. कारण, बाॅलिवूडमध्ये तिला लेडी अमिताभ म्हणायला सुरुवात होण्याअगोदरच ती  साऊथला लेडी सुपरस्टार म्हणून तुफान प्रसिद्ध होतीच.   
 याचं कारण तिच्या चेहऱ्यातला गोडवा हे होतंच, पण त्यासोबत तिच्यात असलेला `एक्स` फॅक्टरही होताच. 

भारतीयांना साधारणपणे तिच्या चणीच्या अभिनेत्री आवडतात असं मानलं जातं. पण बाॅलीवूडच्या पदार्पणाच्या सिनेमात ते प्रेक्षकांच्या ते कदाचित लक्षातच आलं नव्हतं. (मुळात तो चित्रपट, सोलवा सावन डब्यातच गेला होता)  मग दुसऱ्यांदा तिने `हिम्मत` करून ते प्रेक्षकांच्या लक्षात आणून दिलं. मग जितेंद्रसोबत उड्या मारतानाही ती `पब्लिक`ला आवडली. (झ झ झोपडीमे, च च चारपाई किंवा अव्वाsss, अम्माsss असले कसले कसले विचित्र शब्द असलेली गाणी आणि त्याच त्या कवायती असूनही...) पण ती कवायतींपर्यंतच नाही थांबली. मिस्टर इंडियातली तिची मस्त काॅमेडी, (आणि रेन डान्स) चालबाजमधली दुहेरी अभिनयाची जादू यामुळे ती बाॅलिवूडचा नगिना बनली आणि ठरली अनभिषिक्त चांदनी! ऐंशी-नव्वदीच्या दशकात तिचं मानधन अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक होतं. अनेक पुरस्कार सहज सहज मिळत होते. अगदी पद्मश्रीही. 

पडद्यावर, सार्वजनिक जीवनात असं मोठं यश पाहणारी श्रीदेवी स्वतःच्या आयुष्यात मात्र अनेक धक्के पचवत होती. तिची अयशस्वी प्रेमप्रकरणं, तिची अयशस्वी लग्न... सवतींबरोबरचे संघर्ष असे बरेच... पण तिने त्याबद्दल जाहिरपणे अवाक्षरही काढलं नाही. मुलाखतीत अनेकांनी छळूनही. अनेकांनी तिच्याबद्दल काय वाट्टेल ते लिहलं तरीही. तिचं आयुष्य बंद पुस्तकच राहिलं. कुणाला नीट कळलंच नाही कसं होतं नेमकं ते. 
अगदी तिच्या मृत्युसारखंच.   
 नाही म्हणायला तिच्या चित्रांतून काही गोष्टी कळतात.  
  तोंडाला रंग लावून भुमिका रंगवणं हे प्राक्तन असणारी श्री रंगाच्या प्रेमात होती. पण ते रंग होते कॅनव्हासवरचे.
 हो. ती एक बऱ्यापैकी चित्रकार होती.  चित्रकलेची समज उत्तमच होती तिची. 
सुभाष अवचट यांच्यासारख्या जाणकार चित्रकारानेही तिचं कौतुक केलंय त्याबद्दल. 
पण भुमिकात वेगवेगळे रंग भरणारी श्रीदेवी कॅनव्हासवर व्यक्त होताना मर्यादीत रंगाचाच वापर करायची म्हणे.
 तिच्या चित्रामध्ये कदाचित त्यामुळेच अनेकदा उदासवाणी छटाच दिसे. 
अनेक आयुष्य वरकरणी रंगीत वाटली तरी प्रत्यक्षात ती कशी असतात हेच ती तिच्या चित्रातून सांगत असावी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT