आयना का बायना, हाफ तिकीट अशा चित्रपटांतून वेगवेगळे विषय दिग्दर्शक समित कक्कडने हाताळलेले आहेत. चित्रपटांबरोबरच इंदौरी इश्क नावाची वेबसीरीज
त्याने दिग्दर्शित केली होती. तसेच आता त्याची धारावी बँक ही सीरीजदेखील येत आहे. मराठी चित्रपट आणि सीरीज अशा दोन्ही माध्यमांमध्ये दिग्दर्शक म्हणून त्याची घौडदौड
सुरू आहे. ३६ गुण या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती त्याने केली आहे. याबद्दल त्याच्याशी केलेली बातचीत...
* कोवीडनंतर चित्रपटगृहांमध्ये तुझा प्रदर्शित होणारा ३६ गुण हा मराठी चित्रपट आहे. त्याबद्दल काय भावना आहेत ?
-खूप आनंद होत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या माझ्या सर्व क्रू मेंबर्सपासून सगळ्याच टीमने केलेल्या कामाचे चीज होताना
मला दिसते आहे. सिनेमागृहांमध्येदेखील चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतोय हे पाहून खरं तर नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळते. 36 गुण च्या रूपाने आम्ही एक
वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. या सिनेमाची कथा प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला आपलीशी वाटणारी आहे
* '36 गुण' या सिनेमाची कल्पना कशी सुचली?
अगदी बालपणापासून मी जेव्हा जेव्हा एखाद्या लग्न समारंभाला गेलो तेव्हा तेव्हा मला सतत लग्न जुळवत असताना पत्रिका जुळल्या पाहिजेत आणि त्यातही 36 गुण जुळणं
महत्त्वाचं असतं हे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्ष निरीक्षणातून माझ्या लक्षात आलं की या पत्रिकेमधील छत्तीस गुण जुळण्याऐवजी एकमेकांची मने जुळली तरच ते नातं
अबाधित राहतं. नाही तर 36 गुण जुळून सुद्धा संसारात भांड्याला भांड हे लागत असते आणि या सिनेमाबद्दल विशेष बाब म्हणजे हा सिनेमा वेगवेगळ्या सत्य घटनांवर
आधारित आहे. याचे लेखन करताना मी आणि हृषिकेश कोळीने वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्या जीवनातील 36 गुणांच्या वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेत या
चित्रपटाची रचना केली. त्यामुळे हा प्रवास खरंच अविस्मरणीय आहे.
* आपल्याकडे लग्न ठरवताना 36 गुण आणि पत्रिका जुळते का हे पाहतात, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ?
-प्रत्येकासाठी या गोष्टींचं महत्त्व वेगवेगळं आहे. मला असं वाटतं की पत्रिका जुळण्यापेक्षा एकमेकांची मतं आणि मनं जुळणं महत्त्वाचं आहे. याच गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा
प्रयत्न मी या चित्रपटातून केला आहे. लग्न करणाऱ्या दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन, प्रत्येक बाबतीत एकमेकांना साथ देणे अतिशय गरजेचे आहे हे प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे सर्वच वयोगटातील लोकांना हा चित्रपट आवडेल.
* चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. मग लंडनमधील तो अनुभव कसा होता ?
-लंडनचा एकूणच अनुभव विलक्षण होता. मुख्य म्हणजे लंडनसारख्या ठिकाणी आम्ही फक्त नऊ जणांच्या टीमसह या संपूर्ण चित्रपटाचे शूटिंग केले. लंडनमध्ये जवळपास
आम्ही 70 हून अधिक वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग केले तर मुंबईत जवळपास 30 वेगवेगळ्या ठिकाणी या चित्रपटाची शूटिंग झाली आहे. पण मुळात लंडनमध्ये जाऊन फक्त
लंडनची दृश्य दाखवण्याऐवजी माझ्या कथेच्या दृष्टिकोनातून लंडन दाखवणे हा एक वेगळाच अनुभव होता.
* तुझ्या चित्रपटामध्ये कलाकारांची टीम मोठी आहे. त्यांच्या बरोबर काम करण्याचा अनुभव कसा काय होता?
- चित्रपटाच्या मुख्य कलाकारांपासून ते सहकलाकारांपर्यंत सगळ्यांनीच या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री पूर्वा पवारने वेगळी भूमिका असूनही
आपली व्यक्तिरेखा अतिशय उत्तमपणे निभावण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक कलाकाराला त्या व्यक्तिरेखेला जगता यावे म्हणून आम्ही त्यांची वेगवेगळ्या माणसांची भेट घडवून
दिली. या माणसांच्या गोष्टी ऐकून आणि त्या समजून घेऊन चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण
करताना खूप धमाल आली. अगदी हसतखेळत आम्ही चित्रीकरण केले आहे.
श्तूर वेबसीरीजही दिग्दर्शित केल्या आहे. आणि चित्रपटही. तर या दोन्ही माध्यमामध्ये काम करताना काही फरक जाणवतो का ?
-वेब सिरीज असो अथवा सिनेमा माझ्यासाठी दोन्हीही सारख्याच गोष्टी आहेत. फक्त फरक असतो तो छोट्या आणि मोठ्या पडद्याचा. पण या सिनेमासाठी कलाकारांची मेहनत
ही तितकीच असते. त्यामुळे वेब सिरीज असली किंवा सिनेमा असला तरी देखील त्यासाठी लागणारी संसाधने ही सारखीच असतात म्हणून मला त्यात कोणताही फरक जाणवत
नाही.
तुमचे आगामी प्रोजेक्ट कोणते आहेत ?
-सध्या माझे अभिनेता शरद केळकर सोबत एका चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाचे 14 दिवसांची शूटिंग पूर्ण झाली असून पुढील शूटिंग हे नोव्हेंबर महिन्यात
करण्याचा विचार सुरू आहे. त्यानंतर मी निर्माते व दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्यासोबत दोन चित्रपट करणार आहे आणि लवकरच माझा एक शो सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येईल"
- दक्षता पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.