Bawaal Movie
Bawaal Movie sakal
मनोरंजन

ऑन स्क्रीन : बवाल : सुविचारांच्या भडिमारात दबलेली गोष्ट

महेश बर्दापूरकर

‘बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्याकडं लक्ष द्या’, ‘दुसऱ्याला कमी लेखू नका’, ‘समोरच्याचा आदर करा’, ‘इतरांच्या गोष्टी लुबाडू नका’, ‘युद्धं वाईटच असतात’.... हे आणि असे शेकडो सुविचार एकाच गोष्टीत घालून तुम्हाला ऐकवल्यास कसं वाटंल?

नीतेश तिवारी यांनी ‘बवाल’ या चित्रपटामध्ये एका जोडप्याची घटस्फोटापर्यंत पोचलेली कहाणी दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्‍वभूमीमुळं कशी रुळावर येते, हे अशा अनेक सुविचारांतून, महायुद्ध आणि संसाराची तुलना करून सांगितलं आहे. कथा वेगळी असली, तरी पटकथेतील त्रुटी, पात्रांच्या लिखाणातील गोंधळ यांमुळं एक चांगला चित्रपट होता होता राहून गेला आहे.

‘बवाल’ची कथा लखनौमध्ये राहणाऱ्या अजय दीक्षितची (वरुण धवन) आहे. ‘लोक रिझल्ट नही, माहौल देखते है,’ ही मानसिकता असलेला हा तरुण केवळ दिखाव्यासाठी जगत असतो. तो एका शाळेत इतिहासाचा शिक्षक आहे. गावातील श्रीमंत, देखणी मुलगी निशाशी (जान्हवी कपूर) तो केवळ आपलं स्टेटस वाढावं म्हणून लग्न करतो.

निशाला फिट्सचा त्रास असतो व लग्नानंतर लगेचच तिला हा त्रास पुन्हा झाल्यानं तो तिला सार्वजनिक ठिकाणी घेऊन जात नाही. दुसरीकडं, वर्गात शिकवत असताना एका मुलानं खिल्ली उडवल्यानं अजय त्याच्या कानशिलात लगावतो व तो आमदाराचा मुलगा निघाल्यानं त्याला एका महिन्यासाठी निलंबित केलं जातं.

यातूनही अजय युरोपात महायुद्ध झालेल्या ठिकाणांना भेट देत तेथून विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून युद्धाचा धडा शिकवण्याचा निर्णय घेतो. तो आई-वडिलांना (मनोज पाहवा व अंजुमन सक्सेना) आपण निशाला दुसऱ्या हनिमूनसाठी घेऊन जात असल्याचं सांगत दौऱ्यासाठी पैसेही मिळवतो. निशासाठी हा दौरा सोपा असला, तरी अजयला भाषेपासून खाण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत निशाची मदत घ्यावी लागते.

ॲमस्टरडॅम, बर्लिनअशा ठिकाणी भेट देत, हे दोघं आपला संसारही सावरण्याचा प्रयत्न करू लागतात. अजयला (चक्क) हिटलरच्या चरित्रातून स्वतःमधील चुका दिसू लागतात. तो स्वतःमध्ये बदल करण्याचा निर्धार करतो आणि कथेचा शेवट गोड होतो.

दिग्दर्शकाचा प्रयत्न स्वतःच्याच विश्‍वात अडकलेल्या युवकामधील सुधारणेची गोष्ट सांगण्याचा आहे. त्यासाठी दुसऱ्या महायुद्धाची पार्श्‍वभूमी घेण्याची कल्पनाही वेगळी आहे. मात्र, कथेच्या ओघात अनेक प्रश्‍न अनुत्तरित राहतात. हुशार, उच्चशिक्षित निशा केवळ लहानपणी फिट येत होत्या एवढ्या एका कारणासाठी अजयशी लग्न करते व त्याचे सर्व अन्याय सहन करते हे पटत नाही.

‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’पासून ‘डंकर्क’पर्यंतचे युद्धपट पाहिलेल्या प्रेक्षकांना चित्रपटातील युद्धाचे प्रसंग अगदीच लुटुपुटूचे वाटतात. यांमुळं एक चांगली कथा, विचार वाया गेला आहे. संगीत श्रवणीय आहे व चटपटीत संवाद मजा आणतात.

वरुण धवननं एका उथळ व नंतर आयुष्याकडं गांभीर्यानं पाहणाऱ्या युवकाची भूमिका छान साकारली आहे. त्याच्या ‘ऑक्टोबर’ चित्रपटातील भूमिकेची आठवण येत राहते. मात्र, लिखाणातील त्रुटींमुळं त्याचा प्रभाव कमी होत जातो. जान्हवी कपूरनं निशा खूप प्रयत्नपूर्वक साकारली आहे. इतर कलाकारांना फारशी संधी नाही.

हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT