Blood and Gold Movie sakal
मनोरंजन

ऑन स्क्रीन : ब्लड ॲण्ड गोल्ड : माणसांतील ‘सोनं’ वेचणारी गोष्ट!

दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात जर्मन सैन्य युद्धात पराभूत होण्याच्या स्थितीत असताना नाझी सैनिकांकडून ज्यू नागरिकांवर झालेल्या अमानुष अत्याचारांची ही गोष्ट.

महेश बर्दापूरकर

ओटीटी प्लॅटफॉर्मची एक चांगली गोष्ट म्हणजे ते आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर (एआय) काम करतं. तुम्ही एका प्रकारचे सिनेमे पाहात असल्यास त्याच प्रकारचे सिनेमे पाहण्याची शिफारस तुम्हाला केली जाते. दुसऱ्या महायुद्धावरचा १० भागांचा रंगीत माहितीपट ‘नेटफ्लिक्स’वर पाहात असताना ‘एआय’ने तीन-चार महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ब्लड ॲण्ड गोल्ड’ या चित्रपटाची शिफारस केली.

दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात जर्मन सैन्य युद्धात पराभूत होण्याच्या स्थितीत असताना नाझी सैनिकांकडून ज्यू नागरिकांवर झालेल्या अमानुष अत्याचारांची ही गोष्ट. वेगवान कथानक, प्रत्येक टप्प्यावर भावनांचा हल्लकल्लोळ, अभिनय आणि जबरदस्त छायाचित्रण यांच्या जोरावर हा अविस्मरणीय अनुभव देणारा, युद्धाचा फोलपणा अधोरेखित करणारा चित्रपट कायमचा लक्षात राहतो.

‘ब्लड ॲण्ड गोल्ड’ची कथा दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यावर जर्मनीतील एका छोट्या शहरात सुरू होते. जर्मन सैनिकांना आपला पराजय समोर दिसत असतो, तर अमेरिकेचे सैन्य जोरदार मुसंडी मारत पुढं सरकत असतं. सोनेनबर्ग या गावात लेफ्टनंट कर्नल स्टार्नफेल्डच्या (ॲलेक्झांडर शिअर) नेतृत्वाखालील एक तुकडी तेथील ज्यू नागरिकांनी त्यांच्या ताब्यात ठेवलेलं मोठ्या प्रमाणावरील सोनं हस्तगत करण्यासाठी आटापिटा करीत आहे.

या तुकडीतील एक जर्मन सैनिक हेन्रिच (रॉबर्ट मासेर) याला हे मान्य नसतं व तो बंड करतो. याची शिक्षा त्याला दिली जाते, मात्र जवळच राहणारी ज्यू मुलगी एल्साच्या (मेरी हॅक) प्रयत्नांमुळं तो थोडक्यात बचावतो. आपल्या गतिमंद भावाला सांभाळणाऱ्या एल्साच्या दृष्टीनं हेन्रिचला मदत करणं एक संकटच ठरतं.

मात्र, हेन्रिच व एल्सा मिळून जर्मन सैन्याचा मुकाबला करण्याचा निर्णय घेतात, तर सैनिक सोन्याच्या शोधात शहरातील चर्चपर्यंत येऊन पोचतात. येथील गोळीबारानंतर एल्सा स्टार्नफेल्डला शरण जाते, तर हेन्रिच जखमी होतो. सैनिक सोन्याच्या शोधात आहेत, हे समजल्यावर हेन्रिच हे सोनं हस्तगत करून त्याच्या बदल्यात एल्साला सोडवण्याची योजना आखतो. चर्चमधील रक्तरंजित युद्धानंतर सोनं कोणाच्या हाती लागणार, हे नक्की होतं.

युद्धाच्या पार्श्‍वभूमीवरची ही कथा काल्पनिक असली, तरी जर्मन सैनिकांनी युद्धाच्या काळात ज्यूंकडील सोन्याची मोठ्या प्रमाणावर लूट केली होती, हे नंतर सिद्ध झालं आहे. हीच पार्श्‍वभूमी कथेसाठी निवडण्यात आली आहे.

माणसाला मृत्यू डोळ्यासमोर दिसत असला, तरी त्याचा स्वार्थ, हाव कमी होत नाही हे अधोरेखित करणारे चित्रपटातील प्रसंग अंगावर शहारे आणतात. जर्मन सैनिकांची निष्ठूरता, वयाच्या विचार न करता केले जाणारे अत्याचार अचंबित करतात. त्याचबरोबर सामान्य नागरिकही सोनं हस्तगत केल्यास युद्धानंतरचं आपलं आयुष्य श्रीमंतीत घालवता येईल, असा विचार करीत एकमेकांच्या जिवावर उठतात, हे अधिकच अंगावर येतं.

जर्मन सैनिकांकडून एल्साच्या घरातील कोंबड्या आणि गाईंना मारणं, तिच्या भावाची हत्या करणं, स्टार्नफेल्डनं एल्साला ताब्यात घेतल्यानंतरचे प्रसंग आणि शेवटी सोन्यासाठी जर्मन सैनिक व नागरिकांबरोबर अमेरिकी सैनिकांचं अधःपतन हे सर्वच प्रसंग हादरवून टाकतात. कलाकारांचा अभिनय, संगीत आणि छायाचित्रण यामुळं ही कथा अधिक चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोचते.

चित्रपटाची कथा युद्धाचे परिणाम वाईटच असतात, हे ठामपणे मांडते व त्याचबरोबर माणसांतील ‘सोनं’ही वेचून दाखवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: होमगार्ड तरुणीचा खून मैत्रिणीकडून,मृतदेह फेकण्यासाठी घेतली मुलाची मदत

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT