Marathi News Pune News Singer Kaushiki Chakravarti Bheemsen Festival
Marathi News Pune News Singer Kaushiki Chakravarti Bheemsen Festival 
मनोरंजन

मुखडा आणि मुखवटा यातील फरक लक्षात घ्यायला हवा - कौशिकी चक्रवर्ती

सकाळवृत्तसेवा

पुणे - 'गायन मैफलींमध्ये आम्ही कलाकार चांगले कपडे, दागिने परिधान करतो. चेहऱ्यावर 'मेकअप' देखील असतो. पण त्याच्या आतला माणूस महत्त्वाचा असतो. झाडाची मुळे मजबूत असतील तरच झाड मोठे होऊ शकते. कलाकाराचेही तसेच आहे. 'मुखडा' आणि 'मुखवटा' यातील फरक आपण लक्षात घ्यायला हवा,' असे मत पतियाळा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका आणि अजय चक्रवर्ती यांच्या शिष्या व कन्या कौशिकी चक्रवर्ती यांनी व्यक्त केले.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित केलेल्या ६५ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील 'अंतरंग' या कार्यक्रमात आज श्रीनिवास जोशी यांनी कौशिकी यांची मुलाखत घेतली. या वेळी त्या बोलत होत्या. 'रागसंगीत गायनाच्या तयारीसाठी १५ ते २० वर्षे मोबाईल बाजूला ठेवून प्रामाणिकपणे रियाज करणे आवश्यक असते. साधकाची गायनक्षमता कितीही चांगली असली तरी या रियाजाला 'शॉर्टकट' नसतो. मी घरात वर्षानुवर्षे बाबांना तासंतास रियाज करताना पाहिले. म्हणून हे शक्य आहे हे मला पटले. त्या रियाजामुळेच मी गाऊ शकते,' असे कौशिकी यांनी सांगितले. 'हल्ली मुले प्रश्न खूप विचारतात. नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारणे चांगले आहे. परंतु केवळ विरोधासाठी विरोध म्हणून प्रश्न विचारू नयेत. आधी गुरू काय सांगतात ते ऐका. एखादी गोष्ट आपल्याला पटते की नाही हे ठरवण्यासाठी आधी समोरच्याचे ऐकून घेणे आवश्यक असते,' असे मत कौशिकी यांनी व्यक्त केले. आपल्या वडिलांचे गुरू, आपले गुरू आणि पतियाळा घराण्याच्या वैशिष्ट्यांविषयीही कौशिकी भरभरून बोलल्या. 

कोलकात्याच्या 'संगीत रिसर्च अकादमी'त शिकताना मोठमोठ्या कलाकारांकडून शिकण्याची संधी मिळाली. शोभा गुर्टू यांच्याकडून शिकण्याचे स्वप्न मात्र अधुरे राहिले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 'मी पूर्वीही अनेकदा वडिलांबरोबर पुण्यात आले होते आणि गायलेही होते. परंतु मी फारशी कुणाच्या लक्षात राहिले नाही याचे मला फार वाईट वाटत असे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात असे होते, परंतु त्यातूनच पुढच्या वेळी अधिक चांगले गायला हवे, अशी प्रेरणा मिळते,' असे सांगत कौशिकी यांनी 'सवाई गंधर्व' महोत्सवात पहिल्यांदा गायल्याची आठवण सांगितली. त्या म्हणाल्या, 'एके दिवशी मला एक दूरध्वनी आला आणि पलीकडून एक प्रभावी आवाज ऐकू आला- 'मी भीमसेन जोशी बोलतो आहे... पुण्यात सवाई गंधर्व महोत्सव होतो, माहीत आहे ना?...,' स्वप्ने पाहणाऱ्या आणि दरवर्षी 'सवाई'च्या तारखा लक्षात ठेवणाऱ्या मला त्यांच्याशी काय बोलावे हे देखील सुचले नाही. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी माझी अवस्था आणखी वाईट झाली. माझ्याआधी पं. शिवकुमार शर्मा यांचे सादरीकरण होते आणि माझ्यानंतर पं. जसराज यांचे गायन होणार होते. मी थरथर कापत मंचावर गेले, तर लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत असे दृष्य होते. मी तसेच गाणे सुरू केले आणि काहीच वेळात प्रेक्षक पुन्हा आत येताना दिसू लागले. माझे स्वप्न साकार झाल्याची ती भावना कधीच विसरता येणार नाही.' याच दिवशी झालेल्या 'षड्ज' या कार्यक्रमात भास्कर राव दिग्दर्शित 'म्युझिक ऑफ इंडिया' (इन्स्ट्रुमेंटल),  प्रमोद पाटी दिग्दर्शित 'रवी शंकर' आणि एस. बी. नायमपल्ली दिग्दर्शित 'पं. विष्णू दिगंबर पलुसकर' हे लघुपट दाखवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT