मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली आहे. टीव्ही मालिका तसेच चित्रपट आणि वेबसीरीज यांचे चित्रीकरण बंद आहे. मात्र आता चित्रपटसृष्टीसाठी खुशखबर आहे. राज्य सरकारने काही नियम आणि अटींचे पालन करून चित्रीकरणास परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या नियमावलीनुसारच चित्रीकरण सुरू करता येऊ शकते.
मागील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चित्रपट निर्माते, कलाकार आणि ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशनचे पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला होता. यामध्ये लॉकडाऊनमध्ये चित्रीकरणास परवानगी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती. आज यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने निर्णय घेतला आहे. चित्रपट, मालिका आणि वेबसिरीज यांच्या चित्रीकरणास परवानगी दिली असून काही अटी आणि नियमानुसार चित्रीकरणास मान्यता देण्यात आली आहे.
यानुसार आता निर्मात्यांना चित्रपटनिर्मिती पूर्वीची आणि निर्मितीनंतरची कामे शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार करावी लागणार आहेत. निर्मात्यांनी याप्रमाणे काळजी घेऊन चित्रीकरण करावयाचे आहे. शासनाच्या नियमांचा भंग झाल्यास कामे बंद करण्यात येतील, असेही पत्रकात म्हटले आहे. कोविडसंदर्भातील घ्यावयाची काळजी आणि लागू केलेल्या प्रतिबंधातील सुचना यासाठी लागू राहतील.
या चित्रीकरण कामांसाठी निर्मात्यांना मुंबईकरीता व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळ , दादासाहेब फाळके चित्रनगरी , गोरेगाव येथे तसेच उर्वरित जिल्ह्यांसाठी त्या त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल.
याबाबत अभिनेता सुबोध भावे म्हणाला, की चित्रीकरणासाठी परवानगी देऊन सरकारने खूप मोठं धाडस केले आहे. त्यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांचे मी आभार मानतो. आता आमची जबाबदारी अधिक वाढली आहे. सरकारच्या सर्व नियमांचे पालन करून आम्हाला चित्रीकरण करावे लागणार आहे. चित्रीकरणासाठी परवानगी मिळाली म्हणून आनंद आहेच पण दुपटीने वाढलेली जबाबदारी आणि त्याच भान जास्त आहे.
shooting of movies and daily soaps will start again by government rules
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.