मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत आपली छाप पाडत आपल्या कामानं प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणाऱ्या दोन अभिनेत्री म्हणजे स्मिता तांबे आणि मुग्धा गोडसे.
- स्मिता तांबे, मुग्धा गोडसे
मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत आपली छाप पाडत आपल्या कामानं प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणाऱ्या दोन अभिनेत्री म्हणजे स्मिता तांबे आणि मुग्धा गोडसे. ‘७२ मैल - एक प्रवास’ चित्रपटाच्या प्रीमियरला यांची पहिली भेट झाली. नंतर त्यांच्यात बोलणं वाढत गेलं, तसं दोघींनाही जाणवलं की त्यांच्यात गप्पा मारण्यासारख्या कॉमन खूप गोष्टी आहेत. पुढं त्यांची मैत्री घट्ट होत गेली.
स्मितानं सांगितलं, ‘‘मुग्धानं पुण्याच्या लक्ष्मीनगरसारख्या भागातून मुंबईत येऊन ज्याप्रकारे स्वतःमध्ये बदल घडवून आणले आहेत, ते खूप कौतुकास्पद आहेत. त्यामुळं ती मला आधीपासूनच आवडायची. मेडिटेशन ही आमच्या दोघींच्याही अगदी मनाजवळची गोष्ट. मुग्धा आपल्याला भासते तशी अजिबात नाहीये. ती खूप शांत, समजूतदार आणि मृदुभाषी आहे. ती आवाज चढवून कोणाशीतरी बोलतेय, असं अगदी क्वचितच घडतं. तिचं कलेवर आणि उत्तमोत्तम कथांवर खूप प्रेम आहे. एखादी कलाकृती पाहिल्यावर तिच्या त्याच्यावरच्या टिप्पणी असतात, त्या मला बऱ्याचदा आश्चर्यचकित करून जातात. आमच्या मैत्रीच्या सुरुवातीच्या काळात माझ्यासाठी हे सरप्राईज होतं. मी कधी कल्पनाही केली नव्हती, मुग्धा अशा प्रकारे विचार करत असेल. पण आता एखाद्या गोष्टीवर मुग्धा कशी रिॲक्ट करेल किंवा तिचं काय म्हणणं असेल, हे मला बरोबर कळतं. कामाच्या बाबतीत ती खूप मेहनती आणि प्रामाणिक आहे. कलाकार म्हणून स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणण्यासाठी ती प्रयत्नशील असते.’’
मुग्धा म्हणाली, ‘‘मी पुण्याहून मॉडलिंगमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईत आल्यावर माझे मराठी मित्र-मैत्रिणी खूप कमी होते. मी स्मिताला भेटल्यावर मराठी मैत्रीण गवसल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली. आमच्या सवयी, आवडी-निवडी, बोलण्याची पद्धत, आम्हाला आमच्या घरातून मिळालेले संस्कार सगळंच सारखं असल्यानं मला आपल्यासारखंच कोणीतरी आपल्या क्षेत्रात भेटल्याचा फार आनंद झाला. त्यामुळं आमच्या गप्पा खूपच रंगायच्या. माझ्यासारखंच तिचंही कलेवर खूप प्रेम आहे. आम्ही दोघीही अभिनय क्षेत्रात काम करत असलो, तरी आमची पार्श्वभूमी वेगवेगळी असल्याने आमच्यात त्याबद्दलही शेअरिंग व्हायचं. स्मिता अतिशय साधी सरळ, मनमिळाऊ आणि गप्पिष्ट मुलगी आहे. स्मितासारखी मी पटकन कोणात मिसळत नसल्यानं माझे मित्र-मैत्रिणी कमी आहेत. त्यामुळं ज्याप्रकारे स्मिता सगळ्यांशी बोलते, तिच्या स्वभावानं सगळ्यांना छान जोडून ठेवते, हे बघून मला अप्रूप वाटलं आणि मला तिचा हा बिनधास्त आणि मराठी बाणा असलेला स्वभाव आवडला. म्हणूनच एकमेकींसारख्या, पण वेगवेगळं जग असलेल्या आम्ही दोघी एकमेकींना छान कॉम्प्लिमेंट करतो. कामाच्या गडबडीत आमचं वरचेवर बोलणं होत नसलं, तरीही आमच्यातल्या बॉण्डिंगमध्ये किंचितही बदल झालेला नाही.’’
स्मिताला मुग्धानं ‘फॅशन’ या चित्रपटातलं काम फार आवडलं, तर मुग्धाला स्मितानं ‘७२ मैल - एक प्रवास’ चित्रपटात केलेली भूमिका अतिशय आवडली. आता लवकरच स्मिता ‘लगन’ या चित्रपटातून आपल्या भेटीला येत आहे. त्याबद्दल स्मिता म्हणाली, ‘‘या चित्रपटात मी खेड्यात राहणाऱ्या राधा नावाच्या ऊसतोडणी कामगाराची भूमिका मी साकारात आहे. आपल्या लेकरासाठी काहीही करण्याची प्रत्येक आईची धडपड असते. प्रत्येक आईची ती तळमळ माझ्या भूमिकेतून दिसेल.
यासाठी आमचे लेखन-दिग्दर्शक अर्जुन गुजरनं माझ्याकडून भाषेवर, बोलण्याच्या लहेजावर खूप मेहनत करून घेतली. या चित्रपटाची कथा ऐकताक्षणी मला ती भावली. तसाच हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची आम्हाला खात्री आहे.’
(शब्दांकन - राजसी वैद्य)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.