((अँकर))
---
पदवीच्या तृतीय वर्षात १२० तासांचे कार्यप्रशिक्षण अनिवार्य
----
व्यावसायिक कौशल्यांचा विकास व्हावा हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश
---
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. ८ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पदवी तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी १२० तासांचे प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, तसेच त्यांच्यात व्यावसायिक कौशल्यांचा विकास व्हावा, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
नांदेड जिल्ह्यात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या समन्वयातून शासन-विद्यापीठ-महाविद्यालय कार्यप्रशिक्षण व्यवस्था विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक शाखा आणि अभ्यासक्रमाशी संबंधित संस्थांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे.
-----
विविध संस्थांमध्ये प्रशिक्षणाची संधी
जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच स्वयंसेवी संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयाने तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची विषय व अभ्यासक्रमनिहाय यादी तयार करून त्यांच्या शैक्षणिक विषयाशी संबंधित संस्थांची निवड करावी. त्यानंतर अधिकृत पत्रासह कार्यप्रशिक्षणाचे प्रस्ताव संबंधित कार्यालयांकडे सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
---
महाविद्यालयात समन्वयकाची नियुक्ती
कार्यप्रशिक्षणाच्या दैनंदिन देखरेखीसाठी तसेच संबंधित कार्यालयांशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने प्राध्यापक समन्वयक अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी निर्धारित १२० तासांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित कार्यालय प्रमुखांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राचा विहित नमुना प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी संबंधित कार्यालयाला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महाविद्यालयाची राहणार आहे.
---
कार्यालयीन शिस्तीचे पालन बंधनकारक
प्रशिक्षणाच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी संबंधित कार्यालयाची शिस्त, कामाची वेळ, नैतिकता तसेच गोपनीयतेसंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. याबाबत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी आवश्यक सूचना द्याव्यात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---
रोजगारक्षमतेला मिळणार चालना
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रशासकीय कामकाज, संस्थात्मक प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कार्यपद्धती समजून घेण्याची संधी मिळणार आहे. शिक्षण आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव यांची सांगड घातल्याने विद्यार्थ्यांची व्यावसायिक कौशल्ये विकसित होऊन रोजगारक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना या अनिवार्य उपक्रमाचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने सुरू करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.