AIFF sakal
छत्रपती संभाजीनगर

International Film Festival : जगभरातील ६० फिल्मसचे प्रदर्शन होणार ९ व्या 'अजिंठा वेरूळ' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोचवणाऱ्या ९ वा 'अजिंठा वेरूळ' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ३ जानेवारी २०२४ पासून सुरू होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

- पृथा वीर

छत्रपती संभाजीनगर - जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोचवणाऱ्या ९ वा 'अजिंठा वेरूळ' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ३ जानेवारी २०२४ पासून सुरू होणार आहे. जगभरातील ६० चित्रपटांचे प्रदर्शन, तज्ज्ञांचा मास्टरक्लास, दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञांचा थेट प्रेक्षकांशी संवाद, 'मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा' अशी महोत्सवाची रचना असून ७ जानेवारीपर्यंत आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलावंताच्या मांदियाळीत महोत्सव संपन्न होईल.

प्रत्येक वर्षी या महोत्सवात दर्जेदार सिनेमांची भर पडत असून सहा महिन्यांपासून तयारी सुरू होती, अशी माहिती महोत्सवाचे संचालक अशोक राणे यांनी दिली. ते शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुश कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी उपस्थित होते.

नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र, छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित 'अजिंठा वेरूळ' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होतोय. यामध्ये एनएफडीसी व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचीही सहप्रस्तुती आहे.

महोत्सवाचा विस्तृत आढावा घेताना अशोक राणे म्हणाले, जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट चित्रपट छत्रपती संभाजीनगरच्या रसिकांपर्यंत पोचावे. पाचही दिवस दर्जेदार चित्रपट व तज्ज्ञांशी संवादावर भर देण्यात आला आहे. महोत्सवात 'भारतीय स्पर्धा' गटाचा समावेश असून यात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमे दाखवले जातील.

राष्ट्रीय स्तरावरील परीक्षक प्रेक्षकांसह चित्रपट बघतील. सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला 'सुवर्ण कैलास' पारितोषिक व एक लक्ष रूपये देण्यात येतील. सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा समावेश असेल.

स्पर्धा गटाच्या समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक श्रृतीमान चॅटर्जी (कोलकाता) असणार आहे. प्रसिध्द छायाचित्रकार डिमो पापोव (झेक रिपब्लिक), ज्येष्ठ दिग्दर्शक नचिकेत पटवर्धन (पुणे), ज्येष्ठ समीक्षक रश्मी दोराईस्वामी (दिल्ली) व प्रसिध्द छायाचित्रकार हरी नायर (पणजी) परीक्षण करतील.

महोत्सवात अभिनेते देवानंद यांचा ' गाइड' चित्रपट आणि ना. धो. महानोर यांच्या गीतांनी अजरामर झालेला ' जैत रे जैत ' चित्रपट दाखवला जाणार आहे, असे राणे यांनी सांगितले. या चित्रपट महोत्सवाचे उ‌द्घाटन ३ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर येथे चित्रपट दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या हस्ते होईल.

या वेळी सुचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकारचे प्रधान सचिव अपुर्व चंद्रा व प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा प्रमुख अतिथी असतील. यंदाचा 'पद्मपाणी' जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द गीतकार व पटकथाकार पद्मश्री जावेद अख्तर यांना देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम वगळता सर्व कार्यक्रम आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे होतील, असे चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितले.

इथल्या कलाकारांना व्यासपीठ देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे नंदकिशोर कागलीवाल म्हणाले. मराठवाड्यातील लघुपट निर्मिती करणाऱ्या कलाकारांसाठी आयोजित 'शॉर्ट फिल्म' स्पर्धेतील अंतिम फेरीत निवड झालेल्या पाच शॉर्ट फिल्म महोत्सवात दाखवण्यात येतील. सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मला विशेष पारितोषिक व रोख २५,००० रूपये देऊन गौरवण्यात येईल.

एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टसच्या विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेल्या ९ लघुपटांचे व प्राचार्य रा.रं. बोराडे यांच्या 'पाचोळा' या प्रसिध्द कादंबरीवर आधारित 'पाचोळा' चित्रपट दाखवला जाईल. शहरातील २५ महाविद्यालयांमध्ये २० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान चित्रपट रसग्रहण कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत, असेही मान्यवरांनी सांगितले.

या महोत्सवाचे डेली हंट डिजीटल पार्टनर, नाथ स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजी व अभ्युदय फाउंडेशन महोत्सवाचे सह आयोजक आणि एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस या महोत्सवाचे अॅकॅडमिक पार्टनर आहेत. या वेळी डॉ. अपर्णा कक्कड, कुलसचिव आशिष गाडेकर, संयोजक नीलेश राऊत, क्रियेटिव्ह डायरेक्टर जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटींग, शिव कदम, सुहास तेंडूलकर, सुबोध जाधव, निखिल भालेराव आदी उपस्थित होते.

फिप्रेसीतर्फे निवड

'फिप्रेसी' भारत हे जगभरातील चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करतात. या पुरस्कार निवडीसाठी फिप्रेसीने अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची निवड केली आहे. त्यांचे तीन विशेष परीक्षक एन. मनू चक्रवर्थी (बंगळूरू), श्रीदेवी पी. अरविंद (कोचीन), सचिन चट्टे (पणजी) महोत्सवातील इतर चित्रपटांचे विशेष परीक्षण करतील.

'फॉलन लिव्हस', 'अनॉटामी ऑफ फॉल'चा समावेश

३ जानेवारीला सायंकाळी ६.३० वाजता उद्घाटन सोहळ्याच्या अर्ध्या तासाच्या अंतराने आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे यावर्षीची जागतिक स्तरावर नावाजलेली जर्मन भाषेतील फिल्म ' फॉलन लिव्हस' फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून दाखवली जाईल. ७ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर व मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप होईल.

महोत्सव समारोपाची फिल्म म्हणून 'कान' चित्रपट महोत्सवाची यावर्षीची सर्वोत्कृष्ट फिल्म 'अनॉटामी ऑफ फॉल' (फ्रेंच) दाखविण्यात येणार आहे. ७ जानेवारीपर्यंत आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे सर्व ६० फिल्म दाखवल्या जातील.

मास्टर क्लास, विशेष व्याख्यान

महोत्सवात ४ जानेवारीला दुपारी २ वाजता दिग्दर्शक आर. बाल्की यांचा मास्टर क्लास व सायंकाळी ६ वाजता दिग्दर्शक जयप्रद देसाई जावेद अख्तर यांची प्रकट मुलाखत घेतील. ५ जानेवारीला दुपारी २ वाजता दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा मास्टर क्लास, ६ जानेवारीला दुपारी २.३० वाजता पीआयबीचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश मगदुम यांचे 'गांधी आणि सिनेमा' यांचे विशेष व्याख्यान होईल.

सायंकाळी ६.३० वाजता 'मीट द डिरेक्टर्स' सत्रात भारतीय सिनेमा गटातील सर्व दिग्दर्शकांसमवेत चित्रपट रसिकांना प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधता येईल. हे वर्ष ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने ७ जानेवारीला दुपारी १२ वाजता ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक श्रृतीमान चॅटर्जी यांचा ' मृणाल सेन समजून घेताना' हा विशेष संवाद होईल. श्रृतीमान चॅटर्जी यांनी मृणाल सेन यांच्या अनेक चित्रपटामध्ये प्रमुख अभिनेत्याची भूमिका साकारली आहे.

इथे करा नोंदणी

चित्रपट महोत्सवात सर्वसामान्य नागरिक सहभागी होऊ शकतात. www.aifilmfest.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल. साकेत बुक वर्ल्ड (औरंगपुरा), तापडिया आयनॉक्स (सिडको), आयनॉक्स रिलायन्स मॉल, आयनॉक्स-प्रोझोन मॉल व निर्मिक ग्रुप, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रस्ता येथे प्रत्यक्ष नोंदणी करता येईल. info@aifilmfest.in या ई- मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.

शायरांच्या शहरात प्रसिद्ध शायर जावेद अख्तर येणार असून, 'अजिंठा वेरूळ' आंतरराष्ट्रीय महोत्सवाद्वारे शहराची सांस्कृतिक ओळख, अभिरूची वाढवायची आहे.

- चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : : लालबागचा राजा गिरगावमध्ये दाखल

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT