((अँकर))
----
बडबड गीतांपासून निबंधांपर्यंत रंगल्या विविध स्पर्धा
---
प.पू. अनंतदास महाराजांच्या ६३ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजन
----
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ३ : स्थानिक श्री अनंतदास महाराज स्मारक मंडळाच्या वतीने परमपूज्य श्री अनंतदास महाराज यांच्या ६३ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त आयोजित विविध शालेय स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शनिवारी (ता. ३) सकाळी दहाला शहरातील आर्य चाणक्य विद्यालयात भक्तिमय वातावरणात या स्पर्धा पार पडल्या.
पूज्य अनंतदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. याप्रसंगी श्री अनंतदास महाराज स्मारक मंडळाचे कार्यवाह गोविंदराव अयाचीत यांच्यासह आर्य चाणक्य विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि विविध स्पर्धांचे परीक्षक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या सर्व स्पर्धा गटनिहाय आणि वर्गनिहाय आयोजित करण्यात आल्या. बालवाडी व प्राथमिक गटात लहानग्यांसाठी बडबड गीत गायन, मनाचे श्लोक पाठांतर आणि वेशभूषा स्पर्धा रंगल्या. चिमुकल्यांनी साकारलेल्या क्रांतिकारक व महापुरुषांच्या वेशभूषेने उपस्थितांची मने जिंकली. इतर स्पर्धांमध्ये रंगभरण, चित्रकला, कथाकथन, समूहगीत गायन, सुंदर हस्ताक्षर, निबंध आणि वक्तृत्व अशा विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे आणि वक्तृत्वाचे सादरीकरण केले.
-----
((चौकट))
पालक अन् नागरिकांची गर्दी
या उपक्रमात धाराशिव शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण व परिसरातील विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी भाग घेतला. तज्ज्ञ परीक्षकांनी सर्व स्पर्धांचे बारकाईने परीक्षण करून गुणदान केले. या सोहळ्याला धाराशिव शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चिमुकल्यांचा उत्साह वाढवत होते.
------
धाराशिव ः परमपूज्य श्री अनंतदास महाराज यांच्या ६३ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त आयोजित शालेय स्पर्धांत सहभागी विद्यार्थी.
फोटो क्रमांक ः OSM26B07123