तुडुंब जलसाठे आठ महिन्यांत आटले; आष्टीत नियोजनाचा दुष्काळ!
------------
अनिरुद्ध धर्माधिकारी
आष्टी, ता. १० (बातमीदार) ः गेल्या वर्षी तालुक्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे जलस्रोत तुडुंब भरले होते. किमान अडीच ते तीन वर्षे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल अशी खात्री निर्माण झाली होती. मात्र, अवघ्या आठ ते नऊ महिन्यांतच हे मुबलक पाणीसाठे तळ गाठू लागले आहेत. यंदा पावसाने ओढ दिल्याने आष्टी तालुक्यावर भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, सध्या तालुक्याला पाणी आणि चाऱ्याच्या टंचाई सुरू आहे. या परिस्थितीमुळे हवालदिल झालेली आष्टीतील नागरिक पावसासाठी डोळे आकाशाकडे लावून बसली असली, तरी या टंचाईला प्रशासनाचा गलथान कारभारच कारणीभूत असल्याचा थेट आरोप नागरिकांमधून केला जात आहे.
तालुक्यातील बहुतांश तलाव, बंधारे आणि लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. विहिरी आणि बोअरवेलच्या भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे. आष्टी आणि कडा यांसारख्या प्रमुख शहरांना गेल्या महिनाभरापासून टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे, की तालुक्याच्या सीमेवरील सीना मेहेकरी प्रकल्पातून पाणी आणण्याची वेळ प्रशासनावर आली. आता गणेशोत्सवात व परतीच्या पावसात पावसावरच तालुक्याचे शेवटची आशा टिकून आहे या कालावधीत पाऊस न झाल्यास तालुक्याला भीषण दुष्काळात सामना करावा लागणार लागण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत मागील वर्षे अतिवृष्टीने ओव्हरफ्लो झालेल्या प्रकल्पांतील पाण्याचा ताळेबंद सातत्याने पुढे येत आहे. तीन वर्षांचे पाणी केवळ काही महिन्यांत कसे संपले, अनियंत्रित उपसा आणि नासाडी रोखण्यासाठी काय पावले उचलली गेली, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
----
पाणीटंचाईची दाहकता आणि टँकरवर मदार
- आष्टी आणि कडा शहरांमध्ये महिनाभरापासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
- अनेक गावांमधून टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
- विहिरी आणि बोअरवेल कोरड्या पडल्याने ग्रामीण भागात पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू झाली आहे.
- स्थानिक जलस्रोत आटल्याने परजिल्ह्यातील अथवा सीमेवरील प्रकल्पांवर विसंबून राहण्याची नामुष्की तालुक्यावर आली आहे.
---
चाराटंचाईचे सावट; छावण्यांची मागणी
पिके पूर्णत उद्ध्वस्त, पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पिके पूर्णपणे वाया गेली. सप्टेंबर महिन्यातच चाऱ्याचा प्रश्न पेटल्याने पशुपालकांसमोर जनावरांना सांभाळण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. तातडीने चारा छावण्या सुरू करा. दूध उत्पादनात मोठी घट होण्याची भीती असून, प्रशासनाने वेळ न दवडता तातडीने अधिकृत चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
----
प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा
- प्रत्येक गावातील उपलब्ध पाण्याचा आढावा घेऊन स्वतंत्र वितरण नियोजन जाहीर करावे.
- शाळा, अंगणवाड्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठ्याची तरतूद करावी.
- जनावरांसाठी तत्काळ पाणवठे उभारणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे आणि संभाव्य टंचाई निवारणासाठी निधी तातडीने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.