(आवश्यक)
ABD26J79195 ऑरिकचा सुधारित मास्टरप्लॅन.
---
शेतकऱ्यांसाठी ‘बिडकीन ऑरिक’
येथे भूखंड वाटपाची प्रक्रिया सुरू
---
जमीन मूळ दराने दिली होती त्याच दराआधारे भूखंड
---
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. १२ : ऑरिक प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी भूखंड वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेडमार्फत (एमआयटीएल) ३,०४५ प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत. त्यापैकी अर्ज केलेल्या १,८०० शेतकऱ्यांना भूखंडासाठी ऑनलाइन पसंती नोंदविण्याची संधी देण्यात आली. पात्र अर्जदारांना उपलब्ध भूखंडांचे वाटप लॉटरी पद्धतीने करण्यात येणार असल्याचे एमआयटीएलकडून सांगण्यात आले.
ऑरिक प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपली जमीन शासनाला दिली होती, त्यांना शासनाच्या धोरणानुसार पुनर्वसनाच्या अनुषंगाने भूखंड उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी शासनाला जमीन ज्या मूळ दराने दिली होती, त्याच दराच्या आधारे भूखंड उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. औद्योगिक वापरासाठी मूळ जमिनीच्या १५ टक्क्यांपर्यंत, तर व्यावसायिक अथवा निवासी वापरासाठी ५ टक्क्यांपर्यंत जमीन भूखंडाच्या स्वरूपात मिळण्याची तरतूद आहे.
एमआयटीएलने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, पात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ऑनलाइन पोर्टलवर लॉगिन करून उपलब्ध भूखंडांमधून आपली पसंती नोंदवायची आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन (पीएपी) लॉटरी पोर्टलवर अर्जदारांना भूखंडाची निवड करून आपला अर्ज सबमिट करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात ११ ते १७ सप्टेंबर या कालावधीत ५,००० चौरस मीटरपेक्षा जास्त पात्र क्षेत्र असलेल्या प्रकल्पग्रस्त अर्जदारांना ऑनलाइन भूखंड पसंती नोंदविण्याची सुविधा देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५ हजार चौरस मीटरपेक्षा कमी पात्र क्षेत्र असलेल्या उर्वरित प्रकल्पग्रस्तांसाठी टप्प्याटप्प्याने (फेजनुसार) भूखंड निवडीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र कालावधी जाहीर करण्यात येणार असून, संबंधित अर्जदारांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार आहे.
---
लॉटरी पद्धतीने होणार प्रक्रिया
भूखंड वाटपाची प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न एमआयटीएलकडून करण्यात येत आहे. उपलब्ध भूखंडांपेक्षा अधिक अर्जदारांनी एखाद्या भूखंडासाठी पसंती दर्शविल्यास, धोरणानुसार लॉटरी पद्धतीने वाटप केले जाणार आहे. एमआयटीएलने संबंधित सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत पीएपी लॉटरी पोर्टल pap.auric.city या संकेतस्थळावर ऑनलाइन पसंती नोंदवून आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
----
निश्चितीनंतर होणार नाही बदल
एकदा भूखंडाचे वाटप निश्चित झाल्यानंतर तो कोणत्याही कारणास्तव बदलून दिला जाणार नाही. भूखंड पसंतीक्रम नोंदविण्यासाठी पोर्टल उपलब्ध झाल्यापासून सात दिवसांची मुदत असेल. प्रथम, द्वितीय व तृतीय असा पसंतीक्रम प्रकल्पग्रस्तांना नोंदवता येणार आहे.
---
(((कोट)))
ऑरिक प्रकल्पासाठी ३,०४५ शेतकऱ्यांनी जमीन दिली. नियमानुसार त्यांना भूखंड देण्याची प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी धोरण (पॉलिसी) तयार केले असून, त्यासाठी ही पद्धत अवलंबली आहे. सर्वांना त्यांच्या जमीन अधिग्रहणानुसार भूखंड देणे अनिवार्य आहे. त्यासाठी केवळ १,८०० प्रकल्पग्रस्तांनी अर्ज केला आहे. त्यांच्यासाठी पसंतीक्रमाची प्रक्रिया राबवत आहोत.
- महेश पाटील, व्यवस्थापक, एमआयटीएल
---
अशी आहे नियमावली
१. पसंतीक्रम : उपलब्ध भूखंडांना पहिली, दुसरी व तिसरी पसंती; निवडीसाठी ७ दिवसांची मुदत.
२. लॉटरी पद्धत : एकाच भूखंडासाठी अनेक अर्जदार असल्यास संगणकीय लॉटरीद्वारे वाटप.
३. पुढील संधी : भूखंड न मिळाल्यास पुढील निवड चक्रात (सायकलमध्ये) संधी.
४. भूखंडाचा आकार : पात्रतेनुसार भूखंड; उपलब्ध नसल्यास जवळचा कमी आकाराचा भूखंड.
५. ग्रुप भूखंड : नियोजन विभागाच्या तपासणीनंतर एकत्रित भूखंड उपलब्ध; त्यासाठीही समान निवड प्रक्रिया.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.