‘बळिराम पाटील’मध्ये ३४ प्राध्यापकांची पदे रिक्त
----
बाराशे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत; शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही १६ पदे रिक्त
----
गोकुंदा, ता. १६ (बातमीदार) : आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्थापन झालेले बळिराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सध्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अभाव आहे. त्यामुळे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात मिळून १२०० विद्यार्थी शिक्षण घेत असताना ३४ प्राध्यापकांची पदे, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १६ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे महाविद्यालयात सध्या एकही शिपाई कार्यरत नसल्याची स्थिती आहे.
विकासाचे महामेरू स्वर्गीय उत्तम राठोड यांनी शिक्षणप्रेमींना एकत्र आणून किनवट शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून महाविद्यालयाने नावलौकिक मिळविला. येथून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी शासकीय सेवा, राजकारणासह विविध क्षेत्रांत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. काही विद्यार्थ्यांनी विदेशातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. मात्र, महाविद्यालयाच्या संचालक मंडळातील वादाचा विषय मागील चार वर्षांपासून धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित असल्याने नवीन प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांवर परिणाम झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, वयोमानानुसार अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले; मात्र रिक्त जागांवर नियुक्त्या झाल्या नसल्याने प्रशासकीय व शैक्षणिक व्यवस्था विस्कळित झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भीमराव केराम यांनी नांदेड येथील विद्यापीठ प्रशासनाची भेट घेऊन विशेष बाब म्हणून प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. संस्थेच्या अंतर्गत वादापेक्षा १२०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य महत्त्वाचे असून, रिक्त पदे तातडीने भरून महाविद्यालयातील शैक्षणिक घडी पूर्ववत करावी, अशी अपेक्षा शिक्षणप्रेमी व पालकांनी व्यक्त केली आहे.
---
सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
प्राध्यापकांची कमतरता भरून काढण्यासाठी तासिका तत्त्वावर प्राध्यापक नियुक्त केले जात असले, तरी किनवट हे दूरचे ठिकाण असल्याने अनेक जण नियमित उपलब्ध नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. परिणामी काही तासांचेच अध्यापन होऊन विद्यार्थ्यांना परतावे लागत असल्याचे चित्र आहे. तसेच सुरक्षा रक्षक उपलब्ध नसल्याने रात्रीच्या वेळी महाविद्यालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.