आरोग्य कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
-----
बीड जिल्ह्यातील ४५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन
-----
बीड, ता. २८ : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सेवा देणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे. राज्य शासनाने पात्र कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची अंतिम यादी मंगळवारी प्रसिद्ध केली. यामुळे बीड जिल्ह्यातील ४५२ कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून सेवेत समायोजनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय दिवाळीची भेट ठरला आहे.
राज्यात दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या १४ हजार ७८७ कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष वेतनश्रेणीत अधिसंख्य पदांवर समाविष्ट करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी वार्षिक ९८३ कोटी ८० लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. समायोजनाच्या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळ संघर्ष केला. १४ मार्च २०२४ पासून सुरू झालेली कायदेशीर लढाई, ऑगस्ट २०२५ मध्ये मुंबईतील आझाद मैदानावर केलेले आंदोलन आणि सेवा समाप्तीच्या नोटिसांनंतरही सुरू ठेवलेला पाठपुरावा यानंतर शासनाने हा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाने २५ जूनला निर्णय घेतल्यानंतर प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही महिने लागले. अखेर अंतिम यादी प्रसिद्ध झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
समायोजनाची यादी प्रसिद्ध झाली असली, तरी जिल्हा पातळीवरील पुढील तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व ४५२ पात्र कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश देऊन थेट पदस्थापना द्यावी. प्रक्रियेत दिरंगाई करू नये, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली.
-----
((कोट))
दहा वर्षे तुटपुंज्या मानधनावर आरोग्यसेवा दिल्यानंतर हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागला. आझाद मैदानावरील आंदोलनासह संकटांचा सामना केला. अखेर समायोजनाचा निर्णय घेतला. हा न्याय आमच्यासाठी दिवाळीची भेट आहे.
- अभिजित सारणीकर, कर्मचारी
-----
((कोट))
२००८ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानात अविरत सेवा बजावत आहे. जवळपास १८ वर्षे आरोग्य विभागात काम केले. समायोजनासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मागणी पूर्ण झाली असून, शासनाने न्याय दिला आहे.
- रमेश तांगडे, कर्मचारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.