छत्रपती संभाजीनगर

पान ४ साठी

CD
पथदिवे व दुभाजक बसवण्याची मागणी बीड ः बीड ते पालवण रस्त्यावर रात्रीच्या वेळी पथदिव्यांअभावी अंधार होत आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर दुभाजक आणि गतिरोधक नसल्याने भरधाव वेगातील वाहनांच्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पालवण रस्ता हा पिंपळवाडीकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरून ग्रामीण भागातील नागरिक ये-जा करतात. मागील दोन महिन्यांपासून बीड रेल्वेस्थानक सुरु करण्यात आले आहे. रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी पालवण रोड हाच महत्त्वाचा रस्ता आहे. बीड येथून रेल्वे जाण्याच्या व येण्याच्या वेळेला सदरील रस्त्यावर ॲटो, चारचाकी, दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. परंतु रस्त्याचे साईडपट्टे भरण्यात आले नाहीत शिवाय रस्त्यावर दुभाजकही नाही अशावेळी वाहने एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात होत आहे. यासाठी प्रशासनाने सदरील रस्त्यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी प्रवासी व या भागातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. ----- जिल्हा संवाद दौऱ्याचा परळीतून शुभारंभ बीड ः वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत संविधान सन्मान महासभेचे आयोजन केले आहे. याच्या पूर्वतयारीसाठी पदाधिकाऱ्यांनी १६ नोव्हेंबरला परळीतून संवाद दौरा सुरू केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड पूर्व जिल्हाध्यक्ष प्रकाश उजगरे होते. इंजि. विकास पवार, इंजि. प्रशांत उघडे, बाळासाहेब किरवले, भारत तांगडे, प्रसन्नजीत रोडे, रानबा उजगरे, तसेच भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी उपस्थित होते. २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या महासभेला बीड पूर्व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. प्रास्ताविक राजेश सरवदे यांनी, सूत्रसंचालन प्रेम जगतकर यांनी केले, तर आभार बौद्धाचार्य आनंदतुपसमुद्रे यांनी मानले. ------ अहिल्यानगर रस्त्यावरील दुभाजकातील झाडे वाळली बीड ः नगर परिषद प्रशासन, जिल्हा प्रशासनाने शहरातील विविध भागात वृक्षारोपण केले आहे. परंतु पाणी व देखभाली अभावी वृक्ष नष्ट झाले आहेत. शहरातील रस्त्याच्या दुभाजकावरील झाडांमुळे शहराचे सौंदर्य उजळले आहे. परंतु सध्या झाडांना पाणी दिले जात नसल्याने झाडे वाळत आहेत. अहिल्यानगर रस्त्यावर बीड शहरात रस्त्याच्या दुभाजकात लावलेले झाडे पाण्याअभावी वाळत आहेत. नगर परिषद प्रशासनाकडून झाडांना वेळेवर पाणी देण्यात यावे, अशी मागणी शहरातील वृक्षप्रेमी नागरिकांकडून करण्यात येत आहे. ----- नगर नाका ते अंबिका चौकात वाहतूक कोंडी बीड ः शहरातील नगर नाका ते अंबिका चौका दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या विक्रेत्यांचा वाहतुकीस अडथळा होत आहे. रात्री उशिरापर्यंत दुध, चहा पिण्यासाठी आलेले नागरिक हे आपली दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी करतात. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिक, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने अशा वाहनधारक व व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. ----- पाडव्यानिमित्त गुणवंतांचा सन्मान माजलगाव ः सादोळा येथे दीपावली पाडव्याच्या दिवशी ग्रामस्थांकडून ९ वर्षांपासून अखंड गुणवंतांचा सत्कार केला जातो. यंदा बबनराव बप्पा सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली गुणवंतांचा सत्कार सोहळा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. नारायणराव गोले उपस्थित होते. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. भानुदासराव डक यांनी गुणवंतांना मार्गदर्शन केले. ''या दीपोत्सव कार्यक्रमाचे व्यासपीठ ऊर्जेचे पीठ आहे. सादोळ्यातील ग्रामस्थांनी प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवला आहे.'' असे मत ॲड. नारायणराव गोले यांनी व्यक्त केले. सत्कारमूर्ती प्रा. डॉ. भारत सोळंके, प्रा. डॉ. रामेश्वर वाडेकर, नवनियुक्त पोलिस पाटील सरिताताई सोळंके, पृथ्वीराज सोळंके, शार्दूल सोळंके, सागर सोळंके, रुई सोळंके यांनी मनोगत व्यक्त केले. ------ हनुमान मंदिर परिसरातील हायमास्ट दिवे बंद सिरसाळा ः सिरसाळा गावाचे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर परिसरात बसविण्यात आलेला हायमास्ट गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. मंदिर परिसरात रात्रीच्या वेळी प्रकाशाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या हायमास्टचे दिवे बंद असल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. गावातील प्रमुख धार्मिक स्थळ असलेल्या हनुमान मंदिरात दररोज भाविकांची ये-जा सुरु असते. धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सव आणि इतर प्रसंगी या परिसरात मोठी गर्दी होते. मात्र, हायमास्टचे दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन हायमास्टची तातडीने दुरुस्ती करावी आणि सर्व दिवे सुरु करावेत, अशी मागणी होत आहे. ---- झाशीच्या मजुरांना दिवाळी फराळाचे वाटप किल्ले धारूर ः किल्ले धारूर येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या संवर्धन व दुरुस्तीच्या कामासाठी झाशी येथून आलेल्या मजुरांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या सामाजिक बांधिलकीतून भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, माजी नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या वतीने दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. गोड, लाडू, चिवडा, बालुशाही, शंकरपाळे, करंजी, शेव, पापडी असे विविध पदार्थ वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे किल्ल्याच्या कामासाठी आलेल्या मजुरांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलला. यावेळी शहराध्यक्ष दत्ता घोडे, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष ॲड. मोहन भोसले, पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल शिनगारे, नगरसेवक विनायक शिनगारे, नगरसेवक सुरेश ठोंबरे, माजी नगरसेवक सचिन ठुबे, मार्केट कमिटी संचालक संदीप शिनगारे, विलास थेटे, तांबे मामा, कपिल शर्मा यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ---- आष्टी-अहिल्यानगर रस्त्यावर भरधाव वाहनांचा धोका कडाः शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या आष्टी-अहिल्यानगर रोडवर वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. वाहनांचा वेग वाढला आहे. अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. विद्यार्थी, नागरिक, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिसरातील नागरिक, पालक, विद्यार्थ्यांनी या मार्गावर तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे. या रस्त्यावर पंचायत समिती, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, ग्रामीण रुग्णालय, निबंधक कार्यालय, गणपती मंदिर, खाजगी दवाखाने, महावितरण कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. त्यामुळे दिवसभर नागरिकांची गर्दी असते. शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना भरधाव वाहनांचा धोका वाढला आहे. अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. ------ अलहुदा उर्दू हायस्कूलमध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन बीड ः येथील अलहुदा उर्दू हायस्कूल येथे राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारताचे पहिले शिक्षणमंत्री आणि विचारवंत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या शैक्षणिक कार्याचा, विचारांचा आणि शिक्षणविषयक दृष्टिकोनाचा गौरव करण्यात आला. यावेळी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विविध विचारांचा समावेश असलेल्या आकर्षक पोस्टरचे राज्य उर्दू साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. सय्यद हसीन अख्तर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी प्रा. डॉ. सय्यद फरीद अहमद नहरी, मुख्याध्यापक डॉ. सिराज खान आरजू, कवी गुलाम साकिब आदींची उपस्थिती होती. ---- क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ बीड ः शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. अर्ज सादर करणे करिता २५ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षींकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यासाठी १२ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. आता १० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. १६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ------- नर्मदा परिक्रमेसाठी भाविक सज्ज पाटोददाः पवित्र नर्मदा परिक्रमेसाठी पाटोदा तालुक्यातील ५० हून अधिक भाविक दादा गुरु भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज झाले आहेत. बांगरवाडीतील लक्ष्मण महाराज सस्ते यांच्या नियोजनातून हे भाविक यात्रेला रवाना होतील. रविवार, २२ नोव्हेंबर रोजी बांगरवाडी येथील विठ्ठलधाम येथून दुपारी १२.३० वाजता प्रस्थान सोहळा होणार आहे. लक्ष्मण महाराज सस्ते यांना मागील वर्षी दादा गुरु महाराजांसमवेत पायी नर्मदा परिक्रमेचे भाग्य लाभले होते. या अनुभवावरून प्रेरित होऊन त्यांनी इतरांनाही या यात्रेचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. नर्मदा परिक्रमा ही श्रद्धा, त्याग आणि आत्मचिंतनाचा संगम असलेली एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक साधना मानली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Akvan Update: 145 किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ ‘अकवान’; 'या' 13 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

IPL 2027: शमी चा संघ बदलला! लखनौ-राजस्थान मध्ये मोठी ट्रेड, कोणासोबत झाली अदला बदली

MS Dhoni Retire: महेंद्रसिंग धोनीने त्याचा निवृत्तीचा निर्णय CSK ला केव्हा आणि कसा कळवला? म्हणाला, माझं नाव त्यात लिहा...

School Admission: मोठी बातमी! नर्सरी-केजी प्रवेशावेळी डोनेशन मागितल्यास शाळांवर कारवाई; मुलाखती अन् चाचण्याही बंद; वाचा नवे नियम

Amazon: ॲमेझॉनची भारतात 7 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची योजना; 2030 पर्यंत चार सौर आणि पवनऊर्जा प्रकल्प उभारणार

SCROLL FOR NEXT