छत्रपती संभाजीनगर

बीड शहरात वाहतूक कोंडीचा विळखा कायम

CD
पान १ लीड ---- फोटो ः ---- ट्रॅफिक सिग्नल गायब; प्रमुख चौकांमध्ये वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा कोंडीचा विळखा; सिग्नल बसविण्यासाठी काढलेल्या निविदेकडे ठेकेदारांची पाठ ---- सकाळ वृत्तसेवा बीड, ता. २४ ः स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या बीड शहरात सध्या वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. काही महिन्यांपूर्वी मोठ्या दिमाखात शहरातील प्रमुख चौकांमध्ये बसविण्यात आलेले स्वयंचलित वाहतूक सिग्नल निकृष्ट कामामुळे वादात सापडले होते. नगरपालिकेने धडक कारवाई करत संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करून हे सिग्नल हटविले. मात्र, आता या रिकाम्या चौकांमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला असून, नवीन सिग्नल बसविण्यासाठी प्रशासनाने दुसऱ्यांदा निविदा काढूनही एकाही ठेकेदाराने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बीडकरांची वाहतूक कोंडीतून लवकर सुटका होण्याची चिन्हे अंधुक झाली आहेत. शहरातून जाणाऱ्या अहिल्यानगर-परळी रस्त्याचे काम तीन वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. चऱ्हाटा फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरील काम रखडल्याने वाहनचालकांना आधीच मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मार्च २०२६ मध्ये शहराच्या चार प्रमुख चौकांमध्ये तब्बल ६४ लाख रुपये खर्च करून स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अण्णा भाऊ साठे चौक, नगर नाका आणि शिवराज पान सेंटर चौक या वर्दळीच्या ठिकाणांचा यात समावेश होता. ----- पहिल्याच पावसात पितळ उघडे; ठेकेदारावर गुन्हा सिग्नल बसविल्यानंतर काही दिवसांतच, एप्रिल महिन्यात झालेल्या पहिल्याच पावसात नगर नाक्यावरील दुभाजकात बसवलेले सिग्नल एका बाजूला कलंडले. संबंधित ठेकेदाराने सिग्नलचा ढाचा रस्त्याच्या मधोमध दुभाजकात योग्य प्रकारे न बसविल्याने आणि माती सैल झाल्यामुळे हा प्रकार घडला. या गंभीर प्रकाराची दखल घेत बीड नगरपालिकेने आक्रमक भूमिका घेतली. संबंधित ठेकेदारावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करत त्याला १० टक्के दंड ठोठावला. एवढेच नाही, तर दिलेली वर्क ऑर्डर रद्द करून चारही चौकांतील बसवलेले सर्व सिग्नल काढून घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले. ----- प्रशासनावर निविदेची नामुष्की पालिकेच्या या कठोर कारवाईनंतर सिग्नल यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात पुन्हा नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, पालिकेच्या कडक कारवाईचा धसका घेतल्यामुळे एकाही ठेकेदाराने या कामासाठी पुढाकार घेतला नाही. ठेकेदारांनी पाठ फिरविल्यामुळे प्रशासनाला आता पुन्हा नव्याने निविदा काढण्याची वेळ आली आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बार्शी नाका यादरम्यान रस्तेकाम सुरू असल्याने आणि चौकांतील सिग्नल हटविल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. --- ((कोट)) पूर्वीच्या ठेकेदाराचे काम निकृष्ट निघाल्यामुळे व नगर नाक्याजवळ सिग्नल कलंडल्यामुळे पालिकेने कठोर भूमिका घेत त्याची वर्क ऑर्डर रद्द केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करत १० टक्के दंड ठोठावला व सर्व सिग्नल काढून घेतले. त्यानंतर नव्याने निविदा प्रसिद्ध केली असता, ठेकेदारांनी पाठ फिरवली. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व सिग्नल यंत्रणा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबवून प्रयत्न सुरू आहेत. - विक्रम मांडुरके, मुख्याधिकारी, नगर परिषद, बीड

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

Gold Jewellery Price: लग्नासाठी सोनं आत्ताच खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी? सोन्याचा भाव 1 लाखांपर्यंत येणार?

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्याच्या कोरंभी बायपासवर भीषण अपघात; वाहतूक पोलिसाचा मृत्यू

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT