पान १ लीड
-----
पाणी जपून वापरायला आधी येऊ तर द्या
मुख्य जलवाहिनीला नेहमीच बाधा; दहा दिवसांआड पाणी, त्यातही ३ दिवस कपात
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. १४ ः दिवाळी असो वा एरवीचे दिवस, आमच्या नशिबी पाण्यासाठी वेटिंग हे ठरलेलेच असते. महिनाभर नळाला पाणी मिळत नाही, आणि उरले-सुरले पाणीही असे दुरुस्तीच्या नावाखाली बंद करून पालिकेला नक्की काय साधायचे आहे? पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही आणखी किती वणवण भटकायचे? बीड शहरातील एका संतप्त गृहिणींचा हा उद्विग्न सवाल केवळ एका कुटुंबाचा नाही, तर पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या संपूर्ण शहराचा प्रातिनिधिक आवाज बनला आहे. बीड शहराचा पाणीप्रश्न कायमच ऐरणीवर राहिला असला, तरी आता नगर परिषद प्रशासनाने दर पंधरा ते वीस दिवसांतून एकदा मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचा अघोषित नियमच लागू केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात बीडकरांमध्ये आता तीव्र संताप उसळला आहे.
नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने पुन्हा एकदा एक परिपत्रक जारी करून नागरिकांच्या चिंतेत मोठी भर घातली आहे. या नव्या परिपत्रकानुसार, सोलापूर-धुळे महामार्गावरील पिंपळनेर सर्व्हिस रोडसंबंधीचे मुख्य जलवाहिनीचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. परिणामी, १७ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत संपूर्ण शहराला होणारा नळ पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सलग तीन दिवस बीडकरांना पाण्यासाठी तरसावे लागणार असून, २० नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. नेहमीच्या साच्यातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असा कोरडा सल्लाही प्रशासनाने दिला आहे. ज्यांच्या घरात पिण्यापुरतेही पाणी शिल्लक नाही, त्यांनी पाणी जपून तरी कसे वापरावे, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
प्रशासनाच्या या अजब कारभारावर नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. बीड शहरात आधीच १० ते १२ दिवसांआड एकदा पाणीपुरवठा होतो. नोकरदार वर्ग, महिला आणि रोजंदारीवर जाणाऱ्या कामगारांना पाण्यासाठी रात्र-रात्र जागून काढावी लागते. अशा भीषण स्थितीत जेव्हा नळाला पाणी येण्याची वेळ येते, नेमकी तेव्हाच जलवाहिनी दुरुस्तीचे विघ्न उभे राहते. यामुळे सर्वसामान्यांचे पाण्याचे संपूर्ण गणितच कोलमडून पडते. दर पंधरा ते वीस दिवसांनी हीच मुख्य जलवाहिनी कशी काय नादुरुस्त होते? आणि नेमकी कोणती दुरुस्ती बारकाईने केली जाते, ज्याचे आयुष्य जेमतेम पंधरा दिवस असते? असे परखड प्रश्न आता बीडकर विचारत आहेत.
जर अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच याच मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती केली होती, तर ती पुन्हा कशी बिघडली, की आधीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले होते, याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. सोलापूर-धुळे महामार्गावरील विकासकामांचा संदर्भ देऊन प्रशासन वेळ मारून नेत असले, तरी विकासकामे आणि शहरातील पायाभूत सुविधांचा ताळमेळ राखण्यात पालिका अधिकारी सपशेल अपयशी ठरत आहेत. एका बाजूला पाण्याचे योग्य नियोजन करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे, तर दुसऱ्या बाजूला दुरुस्तीच्या नावाखाली बीडकरांच्या नशिबी तीन-तीन दिवसांचा पाणीबाणीचा काळ लादला जात आहे. विकतचे टँकर किंवा जारचे पाणी घेण्याची ऐपत नसलेला मोठा वर्ग शहरात आहे, त्यांचे या काळात अतोनात हाल होत आहेत.
-----
नागरिकांना वेठीस धरणे थांबवावे
पाणीपुरवठा विभागाचे नियोजन पूर्णपणे कोलमडलेले आहे. जर वेळेवर आणि दर्जेदार काम केले असते, तर वारंवार जलवाहिनी दुरुस्तीची वेळ नक्कीच आली नसती. याचा नाहक आणि मोठा त्रास सर्वसामान्य नागरिकांना, तसेच व्यावसायिकांना सहन करावा लागतो. दुरुस्तीच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरण्याचे सत्र आता थांबले पाहिजे, असे मत व्यावसायिक सुनील तांदळे आणि गृहिणी वैशाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
-----
कोट
प्रत्येक पंधरा दिवसांनी हीच लाइन कशी काय फुटते? महिनाभर लोकांना आधीच पाणी मिळत नाही, आणि उरले-सुरले पाणी बंद करून पालिकेला नक्की काय साधायचंय? हा प्रशासनाचा केवळ हलगर्जीपणा आहे. सामान्य माणसाने पाण्यासाठी किती वणवण करायची?
- नारायण पवार, नागरिक, बीड
----
बीड नगर परिषदेचा हा भोंगळ आणि गलथान कारभार अत्यंत संतापजनक आहे. पंधरा दिवसांपूर्वी दुरुस्ती केलेली जलवाहिनी पुन्हा कशी बिघडली? तीन-तीन दिवस पाणी बंद राहिल्यास पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होतील. प्रशासनाने तत्काळ टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल.
- डॉ. गणेश ढवळे