दुचाकीला धक्का लागल्यावरून राडा; चौघांविरुद्ध गुन्हा
छत्रपती संभाजीनगर, ता. ३ : नवीन दुचाकीला सायकलचा धक्का लागून खरचटल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. याच वादातून चौघांनी एका कुटुंबाला शिवीगाळ करत दगड आणि काठीने मारहाण केली. ही घटना ३० ऑक्टोबर रोजी रात्री वाळूजमधील म्हसोबानगर परिसरात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल उत्तम राऊत (वय २७, रा. लक्ष्मीनगर, वाळूज) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. राहुल यांचा कॅनॉट प्लेस येथे फूड कॅफे आहे. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास त्यांचा भाऊ निखिल हा ड्यूटीवरून नवीन दुचाकीने घरी जात होता. म्हसोबानगर येथील जोधपूर बॉडी बिल्डर गॅरेजजवळ अजय भोईया याच्या सायकलचा निखिलच्या दुचाकीला धक्का लागला. यावरून निखिलने विचारणा केली असता अजयने त्याला हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच कंबरेच्या बेल्टने मारहाण केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राहुल हे भाऊ निखिल, प्रशांत आणि आई जयश्री यांच्यासह रात्री साडेआठच्या सुमारास अजय राहत असलेल्या म्हसोबानगर येथील इमारतीजवळ गेले. निखिलला केलेल्या मारहाणीबाबत विचारणा करून अजयला समजावून सांगत असताना अजय भोईया, कुंदन कुमार, शुभम कुमार आणि रितादेवी यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर चौघांनी खाली पडलेले दगड उचलून राऊत कुटुंबीयांच्या दिशेने फेकले. त्यातील एक दगड राहुल यांच्या डोक्यात लागल्याने ते जखमी झाले. तसेच कुंदन कुमार याच्यासह इतरांनीही त्यांना मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी अजय भोईया, कुंदन कुमार, शुभम कुमार आणि रितादेवी यांच्याविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार अब्दुल शेख करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.