फोटो : बायोमेट्रिक हजेरी यंत्र.
---
बायोमेट्रिक हजेरी फक्त चर्चेपुरती!
--
‘अनिवार्य’बाबत सूचनांकडे कनिष्ठ महाविद्यालयांचे दुर्लक्ष; उपस्थिती घसरतीच
---
सुशांत सांगवे : सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. २२ : कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा ‘टक्का’ वाढविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सर्व महाविद्यालयांमध्ये ‘बायोमेट्रिक’ हजेरी अनिवार्य केली असली, तरी याबाबतचा आदेश अद्याप कागदावरच आहे. शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातुरातील बहुतांश महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची ‘बायोमेट्रिक’ पद्धतीने हजेरी घेतलीच जात नाही. पारंपरिक पद्धतीने केवळ कागदोपत्री हजेरी घेत सरकारच्या सूचनांकडे कनिष्ठ महाविद्यालये डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे.
लातुरसह राज्यातील अनेक मोठ्या शहरांमधील कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात खालावली आहे. कनिष्ठ महाविद्यालये आणि कोचिंग क्लासमधील ‘मधुर’ संबंधांमुळे अनेक महाविद्यालये केवळ कागदोपत्री विद्यार्थ्यांची उपस्थिती दाखवत आहेत. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शिक्षण विभागाने सर्व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केली. याबाबत सरकारने महाविद्यालयांना विविध सूचना दिल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
अकरावीसाठी महाविद्यालयात प्रवेश घेऊन अनेक विद्यार्थी बारावीबरोबरच ‘नीट’, ‘जेईई’, ‘सीईटी’चा अभ्यास करण्यासाठी खासगी शिकवण्यांना प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षांत लातुरात याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. असेच चित्र वेगवेगळ्या जिल्ह्यात असून यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. याचा विचार करून शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची महाविद्यालयांमधील उपस्थिती अनिवार्य केली. विद्यार्थ्यांची किमान ७५ टक्के वार्षिक उपस्थिती राहिली पाहिजे, असेही सांगितले. पण या सूचना प्रत्यक्षात उतरल्या नसल्याचे चित्र आहे.
---
प्रवेश जवळ आला की चर्चा
--
अकरावी प्रवेशप्रक्रिया जवळ आल्यानंतर आणि ही प्रवेशप्रक्रिया संपेपर्यंत दरवर्षी बायोमेट्रिक हजेरीची जोरदार चर्चा असते. पण, त्यानंतर या पद्धतीकडे महाविद्यालयासह शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होते. त्यामुळे प्रवेशानंतर काही महिन्यांतच मुले महाविद्यालयांतील वर्गापेक्षा क्लासेसमध्ये जाऊन बसण्याला पसंती दर्शवितात. सध्या लातुरात अनेक महाविद्यालयांत असेच चित्र आहे.
---
नामांकित महाविद्यालयात यंत्रणाच नाही
--
विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेणारी यंत्रसामुग्री शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांत उपलब्धच नाही. विशेष म्हणजे, ही यंत्रणा कार्यान्वित न करणाऱ्यांमध्ये अनेक नामांकित महाविद्यालयांचाही समावेश आहे. काही महाविद्यालय रजिस्टरवर तर काही महाविद्यालयात वर्गात कागद फिरवून हजेरी घेतली जाते. या हजेरीत पारदर्शकता राहत नाही. त्यामुळेच बायोमेट्रिक हजेरीची मागणी पुढे आली होती.
कोट
---
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेणे आवश्यक आहे. याबाबतचा एक प्रस्तावही आम्ही काही महिन्यांपूर्वी सरकारकडे पाठवला आहे. बायोमेट्रिक हजेरी न घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई प्रस्तावित केली जाईल.
- डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.