ABD26J83138
हिंगोली : पोस्ट ऑफिस रोडमार्गे महात्मा गांधी चौकाकडे मार्गस्थ होताना भाजपची पदयात्रा.
लोकशाहीची मूल्ये जपणे आवश्यक
-
हिंगोलीत भाजपची पदयात्रा; काँग्रेसच्या धोरणांवर टीका
हिंगोली, ता. १४ : लोकशाहीची मूल्ये जपणे, अराजक माजवणाऱ्या प्रवृत्तींना ठामपणे प्रत्युत्तर देणे आणि केंद्र सरकारच्या विकासाभिमुख कामांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोचवणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा मराठवाडा संयोजक सुनील राणे यांनी येथे केले.
हिंगोली विधानसभा भाजपच्या वतीने शनिवारी (ता. १४) आयोजित ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या पदयात्रेनंतर महात्मा गांधी चौकात जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या सभेस राज्यसभा सदस्य रामराव वडकुते, आमदार तान्हाजीराव मुटकुळे, आमदार डॉ. प्रज्ञा सातव, माजी आमदार गोविंद केंद्रे, भाजप जिल्हा प्रभारी संजय कौडगे आणि जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुनील राणे यांनी काँग्रेसच्या धोरणांवर कडाडून प्रहार केला. ‘विरोधकांकडून देशात सतत संभ्रम व अराजकता निर्माण करण्याचा आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसने नेहमीच सत्तेच्या राजकारणाला प्राधान्य देत लोकशाही मूल्यांची पायमल्ली केली. अशा प्रवृत्तींना सजग जनता कधीही थारा देणार नाही,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताकडे यशस्वी वाटचाल सुरू ठेवली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
चौकट
घोषणांनी परिसर दणाणला
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी ११ च्या सुमारास भव्य पदयात्रेला प्रारंभ झाला. पोस्ट ऑफिस आणि जवाहर रोडमार्गे ही पदयात्रा महात्मा गांधी चौकात पोचली. पदयात्रेदरम्यान कार्यकर्त्यांनी दिलेल्या ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या पदयात्रेत व जाहीर सभेत माजी जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकुळे, नितीन काळे, किरण पाटील, शशिकांत वडकुते, मिलिंद यंबल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.