मोबाइल नको, दिवाळीच्या
सुट्यांत उभारा गड-किल्ले
----
‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ उपक्रमातून आवाहन
-----
बीड, ता. २८ : दिवाळीच्या सुटीत मातीचे किल्ले उभारण्याची परंपरा जपत विद्यार्थ्यांना गड-किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरदृष्टीपूर्ण विचार समजावून देण्यासाठी जिल्ह्यात ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. डिजिटल युगात मोबाइल आणि स्क्रीनकडे वाढलेला मुलांचा ओढा लक्षात घेऊन त्यांना प्रत्यक्ष कृतीतून इतिहासाशी जोडण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या पुणे येथील महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीच्या (अमृत) वतीने राज्यव्यापी मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी आणि शिक्षण विभागाला आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शासकीय, अनुदानित शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांनी या मोहिमेत सहभागी होऊन व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी विचार, गड-किल्ल्यांची रचना आणि त्यांचे सामरिक महत्त्व समजावून सांगण्यात येणार आहे. किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करताना तटबंदीची मजबुती, बुरुजांची दिशा, अभेद्य प्रवेशद्वारे आणि तत्कालीन संरक्षण व्यवस्था यांचा अभ्यास करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ किल्ले उभारण्याचा आनंदच मिळणार नाही, तर ऐतिहासिक वास्तुरचनेची माहितीही मिळेल.
-----
जलव्यवस्थापनाचे धडे
बीड जिल्ह्याला वारंवार दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर शिवकालीन जलव्यवस्थापनाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यावरही उपक्रमात भर देण्यात आला आहे. स्वराज्यातील किल्ले उभारताना छत्रपती शिवाजी महाराजांनी पाणी साठवण, जलस्रोतांचे नियोजन आणि अन्नधान्याची साठवण यांना महत्त्व दिले होते. किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करताना विद्यार्थ्यांनी पाषाणात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या, तलाव, पावसाचे पाणी साठविण्याच्या पारंपरिक पद्धती आणि धान्यकोठारे यांचा अभ्यास करावा, असे अपेक्षित आहे. या उपक्रमातून इतिहासासोबतच जलसंधारण, पाणीबचत आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.