लातूर : शहरातील गंजगोलाई भागात विक्रीसाठी दाखल झालेले मातीचे बैल.
---
लातूर : बैलपोळा सणानिमित्त बाजार समितीच्या भागात आलेल्या विविध आकर्षक वस्तू.
---
सर्जा-राजाच्या उत्सवासाठी बाजारपेठेत लगबग
-----
आज बैलपोळा; पाऊस नसल्याने सणाला नाराजीची किनार
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ९ : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या बैलपोळा सणाच्या खरेदीसाठी बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. बाजारपेठही विविध आकर्षक वस्तूंनी सजली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांतील शेतकऱ्यांची खरेदीसाठी लगबग वाढली आहे. पण, पाऊस नसल्याने यंदाच्या सणावर नाराजीची किनार आहे.
कृषिप्रधान संस्कृतीत पोळा हा महत्त्वाचा सण मानला जातो. श्रमाचा गौरव करणारा हा सण आहे. त्यामुळे शेतकरीबांधवांचे या सणाकडे लक्ष लागलेले असते. हा सण गुरुवारी (ता. दहा) जिल्ह्यात साजरा होणार आहे. मागीलवर्षी बैलपोळा सणावर अतिवृष्टीचे सावट होते, तर यंदा दुष्काळाचे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे बैलपोळा सणासाठी खरेदी करताना शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले. सध्या शहरातील भुसार लाइन आणि जुने गूळ मार्केट चौक ते मार्केट यार्ड या भागात पोळा सणासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची दालने सुरू झाली आहेत, तर शहरातील नागरिकांसाठी मातीच्या बैलाची विक्री शहरात जागोजागी सुरू झाली आहे. मातीचे बैल ७० रुपये जोडीपासून ७०० रुपये जोडीपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. पैंजण, कमरी, वेगवेगळे वेसण, शिंगदोरी, नक्षीदार झूल, कवडी माळ, गोंडे, म्होरकी, रेशमी गजरा अशा अनेक प्रकारच्या वस्तूंना मागणी असल्याचे दिसून येते. विक्रेते रामराव पाटील म्हणाले, पूर्वी बैलजोडी जवळपास प्रत्येक शेतकऱ्याकडे असायची. अलीकडे बैलजोडीची संख्या कमी झाली आहे. पण, शहरात जवळपास सर्वच घरांत मातीच्या बैलजोडींची पूजा केली जाते. त्यामुळे मातीच्या बैलजोडीला मागणी कायम आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.