(((अँकर))
‘एमजीएम’च्या विद्यार्थ्यांची कार्बन न्यूट्रल स्मार्ट कूलिंग प्रणाली
---
सौरऊर्जेवर चालणारी सेन्सर आधारित यंत्रणा; वीज-पाण्याची बचत, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अभिनव प्रयोग
----
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. १४ : पारंपरिक वातानुकूलन यंत्रणांमधून मोठ्या प्रमाणात वीज वापरली जाते. तसेच त्याचा पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर एमजीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘कार्बन न्यूट्रल कन्स्ट्रक्शन ॲण्ड ग्रीन बिल्डिंग’ या विषयावर आधारित सौरऊर्जेवर चालणारी, सेन्सर आधारित स्वयंचलित कूलिंग प्रणाली विकसित केली आहे. अत्यल्प ऊर्जेत कार्य करणाऱ्या या प्रणालीमुळे वीज आणि पाण्याची बचत होणार असून, हरित बांधकामाच्या दिशेने हा अभिनव प्रयोग ठरला आहे.
कृष्णा एमेकर, श्रीनिवास घोरबांड, करण काळबांडे, सुधीर जाधव आणि अनुष्का बागटे या बी.टेक.च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी डॉ. मोहम्मद जमिरूद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारला आहे. सध्याच्या पारंपरिक कूलिंग यंत्रणांना पर्याय देण्याच्या उद्देशाने या प्रणालीची रचना करण्यात आली आहे.
या स्मार्ट कूलिंग प्रणालीमध्ये विविध सेन्सरचा वापर करण्यात आला असून, त्याद्वारे परिसरातील तापमान आणि आर्द्रतेची सातत्याने नोंद घेतली जाते. वातावरणातील तापमान वाढल्यास किंवा आवश्यकतेनुसार प्रणाली आपोआप कार्यान्वित होते. त्यामुळे कूलिंग यंत्रणा अनावश्यकपणे सुरू ठेवण्याची गरज राहत नाही. परिणामी विजेचा वापर कमी होण्यास मदत होते.
या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सौरऊर्जेचा वापर, पारंपरिक वातानुकूलन यंत्रणांवरील विजेचा भार कमी करून अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून कूलिंगची गरज भागविण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला आहे. कमी खर्च, अत्यल्प ऊर्जा वापर, स्वयंचलित कार्यप्रणाली आणि पर्यावरणपूरक रचना ही या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
महाविद्यालयाच्या संचालक डॉ. गीता लाठकर, उपप्राचार्य डॉ. शिरीष कोटगिरे यांनी विद्यार्थ्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. स्थापत्य विभागप्रमुख डॉ. अर्शद हाश्मी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा विचार करून तरुण अभियंत्यांनी विकसित केलेली ही प्रणाली हरित व शाश्वत भारताच्या दिशेने त्यांच्या बांधिलकीचे दर्शन घडविते.
---
अनेक ठिकाणी वापर शक्य
या प्रणालीचा वापर केवळ वर्गखोल्यांपुरता मर्यादित न राहता घरे, पोल्ट्री फार्म, शाळा, महाविद्यालये, दवाखाने, चित्रपटगृहे आदी विविध ठिकाणी करता येऊ शकतो. स्थानिक गरजेनुसार प्रणालीमध्ये बदल करून तिचा वापर विविध प्रकारच्या इमारतींमध्ये करता येण्याची शक्यता विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
---
पेटंट नोंदणीचा विद्यार्थ्यांचा मानस
भविष्यात या प्रकल्पाचे अधिक प्रगत स्वरूप विकसित करून त्याचे पेटंट नोंदणी करण्याचा विद्यार्थ्यांचा मानस आहे. हरित इमारती, ऊर्जा बचत आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने या प्रकल्पाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
---