मुंबई : कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. कालपासूनच अनेक भक्त नवसाच्या रांगेत दर्शनासाठी थांबले होते. ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी लालबागच्या राजाची ख्याती असल्याने दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.