चारा राखूनच कुटार विक्रीला परवानगी
बायोमास उद्योगांना ५० टक्के साठा राखणे बंधनकारक
-----
नांदेड, ता. १६ : जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याने संभाव्य चाराटंचाई लक्षात घेऊन चारा पिकांच्या अवशेषांच्या विक्री व वाहतुकीबाबतच्या आदेशात सुधारणा करण्यात आली आहे. पशुधनासाठी आवश्यक चारा राखून ठेवल्यानंतरच उर्वरित कुटाराची विक्री करता येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याबाबत सुधारित आदेश निर्गमित केला आहे.
जिल्ह्यात स्थानिक पातळीवर पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा आणि चाराटंचाईच्या काळात पशुपालकांची गैरसोय टाळता यावी, हा या आदेशामागील उद्देश आहे. यापूर्वी चारा पिकांच्या अवशेषांची विक्री व वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. आता त्यात सुधारणा करून काही अटींवर कुटार विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.
पशुधन नसलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील कुटार प्रथम परिसरातील पशुधन असलेल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत विचारणा करावी. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या कुटाराची बायोमास ब्रिकेट, पेलेट निर्मिती करणाऱ्या उद्योगांना किंवा अन्य उद्योगांना विक्री करता येईल.
पशुधन असलेल्या शेतकऱ्यांनीही प्रथम आपल्या जनावरांसाठी आवश्यक कुटाराची व्यवस्था करावी. त्यानंतरच उर्वरित कुटार विक्रीसाठी उपलब्ध करून देता येईल. यासाठी विहित नमुन्यातील प्रमाणपत्र तालुकास्तरीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे.
-----
साठा राखणे बंधनकारक
बायोमास ब्रिकेट व पेलेट निर्मिती करणाऱ्या उद्योगांना दररोज प्राप्त होणाऱ्या कुटारापैकी किमान ५० टक्के साठा शासनाच्या आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांसाठी राखून ठेवावा लागणार आहे. या राखीव साठ्याची माहिती जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, नांदेड तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी सादर करणे बंधनकारक आहे. सात ऑक्टोबर २०२६ रोजीच्या आदेशातील अन्य सर्व तरतुदी कायम ठेवण्यात आल्या असून, सुधारित आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.