श्वास थांबल्यानंतरही थांबेनात यातना
----
- शहरातील स्मशानभूमी बनल्या असुविधांचे आगर
- जबाबदारी कोणाची, नगरपालिकाच अनभिज्ञ
- स्वच्छता, पाणी, विजेच्या अभावामुळे नागरिक त्रस्त
----
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. १७ : मृत्यूनंतर तरी व्यक्तीला शांततेत अखेरचा निरोप मिळावा, अशी अपेक्षा असते. मात्र, शहरातील विविध स्मशानभूमींमधील दुरवस्था पाहता येथे निधनानंतरही मरणयातनाच वाट्याला येत असल्याचे चित्र आहे. स्वच्छतेचा अभाव, पाणी व विजेची टंचाई आणि विद्युत दाहिनीचा अभाव अशा अनेक समस्यांमुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना त्या तुलनेत स्मशानभूमींमधील मूलभूत सुविधांचा विकास पूर्णपणे रखडला आहे. अनेक ठिकाणी दहन ओटे अपुरे पडत आहेत. त्यावरील पत्रे गंजले आहेत. परिणामी, उन्हाळ्यात कडक उन्हात व पावसाळ्यात अंत्यविधी पार पाडताना नातेवाइकांचे हाल होत आहेत. स्मशानभूमीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे व गवत वाढले असून, कपिलधार येथील सार्वजनिक स्मशानभूमीची सर्वाधिक दयनीय अवस्था आहे. संरक्षण भिंत तुटली आहे, तर कुठे विजेची आणि पाण्याची सोय नाही. प्रवेशद्वार नसल्याने स्मशानजोगीला मद्यपींचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात विविध समाजांच्या एकूण सात स्मशानभूमी आहेत. त्यातील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीची स्थिती काहीशी बरी आहे. मात्र, इतर ठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव आहे. विशेषतः सर्वाधिक अंत्यविधी होणाऱ्या कपिलधार येथील स्मशानभूमीची स्थिती दयनीय आहे. दरम्यान, शहरात किती स्मशानभूमी आहेत, तेथील व्यवस्थापनाची जबाबदारी कोणाची आहे, स्मशानभूमीमधील सद्यःस्थिती कशी, याचीदेखील नगरपालिका प्रशासनाला माहिती नसल्याची स्थिती आहे. एकीकडे शहराच्या विकासाच्या गप्पांचे पीक आलेले असताना, दुसरीकडे अत्यंत संवेदनशील असलेल्या स्मशानभूमींकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने तातडीने या सर्व स्मशानभूमींची पाहणी करून दुरुस्ती, स्वच्छता व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.
----
((पॉइंटर))
... या आहेत समस्या
- अंत्यविधी आटोपल्यानंतर हातपाय धुण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी पाण्याची कायम टंचाई असते. अनेक ठिकाणचे नळ कोरडे पडले असून, पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता होत नाही.
- सायंकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या सुमारास अंत्यविधी करावा लागल्यास पथदिवे आणि हायमास्ट दिवे बंद असल्याने नागरिकांचे हाल होतात.
- अंत्यसंस्कारासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना बसण्यासाठी पुरेशी बाके किंवा निवारा शेड उपलब्ध नाहीत.
- शहरात एकही विद्युत दाहिनी नाही. त्यामुळे लाकडांचा वापर होत असल्याने वृक्षतोडीस प्रोत्साहन मिळते.
- अनेक स्मशानभूमींमध्ये महापालिकेमार्फत स्वस्त दरात लाकडे उपलब्ध होत नसल्याने, नागरिकांना खासगी विक्रेत्यांकडून चढ्या दराने लाकडे विकत घ्यावी लागत आहेत.
-----
((कोट))
नगरपालिकेने बोअरवेल घेतले नाही. त्यामुळे नागरिकांनी पैसे जमा करून कूपनलिका घेऊन लावलेली झाडे जगविली. नगरपालिकेकडून सोयी-सुविधांच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. स्मशानजोगीला आम्ही मानधन देत होतो. पण, आता त्यांना आणून दिलेल्या लाकूड विक्रीतून त्यांचा उदरनिर्वाह भागवितात. नगरपालिका प्रशासनाकडे आम्ही सोयी-सुविधांसाठी पाठपुरावा केला. पण, काहीच करीत नाहीत. हिंदू स्मशानभूमी दोन, मुस्लिम समाजाच्या दोन, तर लिंगायत, मातंग, बौद्ध समाजाची प्रत्येकी एक स्मशानभूमी आहे. रोटरी क्लबने छत उभारून दिले.
- मनोज कोचेटा, सामाजिक कार्यकर्ते
------
((कोट))
सार्वजनिक स्मशानभूमीला प्रवेशद्वार नाही, तर जुनी दगडी संरक्षण भिंत ढासळली आहे. वेळेवर वीज नसते. तसेच पाण्याची पुरेशी सुविधा नाही. उन्हाळ्यात नातेवाइकांचे हाल होतात. नगरपालिकेतील कुणी इकडे फिरकतही नाही. त्यामुळे स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली आहे.
- गणेश पवार, स्मशानजोगी, कपिलधार स्मशानभूमी, धाराशिव
------
धाराशिव ः शहरातील कपिलधार येथील सार्वजनिक स्मशानभूमीचे गायब झालेले प्रवेशद्वार. (दुसऱ्या छायाचित्रात) ढासळलेली संरक्षण भिंत.
फोटो क्रमांक ः OSM26B07406, OSM26B07407
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.