((मुख्य इंन्ट्रो))
‘सीएमआयए’चे अध्यक्ष आणि नंदावत कॉर्पोरेट सर्व्हिसेसचे संचालक अथर्वेशराज नंदावत यांचे बालपण छत्रपती संभाजीनगर शहरामध्येच गेले. ते ५८ वर्षांचा वारशा असलेल्या ‘नंदावत कॉर्पोरेट सर्विसेस’ या कन्सल्टिंग फर्मचे संचालक आणि ‘सीएमआयए’चे सर्वांत तरुण अध्यक्ष आहेत. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्यांनी हे पद भूषवले असून त्यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि हैदराबाद येथील तिन्ही कार्यालयांची जबाबदारी आहे. संभाजीनगरमध्ये ते लार्ज कॉर्पोरेट्सना ऑडिट व सरकारी परवानग्यांपासून ते ऑफशोर अकाउंटिंगपर्यंतच्या सेवा देतात, तर हैदराबादमध्ये स्टार्टअप्सना मार्गदर्शन करतात. वडिलांचा हा व्यवसाय पुढे नेण्यासोबतच ते दरवर्षी २५-३० एट्रन्सना प्रशिक्षण देऊन स्थानिक तरुणांच्या स्किलिंग आणि रोजगारात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
----------------------------------------
औद्योगिक विकासातून शहर बनावे समृद्धीचे केंद्र
----------
अथर्वेशराज नंदावत ः उद्योग येण्याइतकेच रुजण्यालाही मोठे महत्त्व
-----------
छत्रपती संभाजीनगर शहराचा औद्योगिक प्रवास आता केवळ गुंतवणुकीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो शहराच्या भविष्यासाठी व्यापक आर्थिक, सामाजिक आणि पायाभूत परिवर्तनाचा टप्पा ठरत आहे. मोठ्या कंपन्यांची उपस्थिती, स्थानिक उद्योजकांची क्षमता, तांत्रिक बदलांची गरज, कौशल्यविकासाची उणीव आणि शहरी सुविधांचा ताण या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून शहराला नवे रूप द्यावे लागणार आहे. उद्योगवाढीतून शहर आर्थिक समृद्धीचे केंद्र बनविण्यासाठी व्यापक दृष्टिकोन ठेवावा लागेल, असे स्पष्ट मत ‘सीएमआयए’चे अध्यक्ष आणि नंदावत कॉर्पोरेट सर्व्हिसेसचे संचालक अथर्वेशराज नंदावत यांनी व्यक्त केले.
----
शहरात औद्योगिक गुंतवणूक वाढत आहे, याविषयी नंदावत म्हणाले, की उद्योग येणे आणि उद्योग रुजणे यात मोठा फरक आहे. टोयोटा, एथर, जेएसडब्ल्यू यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा उल्लेख होत असला, तरी त्यांच्यासमोर येणारे खरे प्रश्न काही वेगळेच आहेत. या कंपन्यांना केवळ जागा किंवा परवानग्या पुरेशा नाहीत; त्यांना मजबूत पुरवठा साखळी, दर्जेदार स्थानिक व्हेंडर्स, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि कामकाजासाठी सुसज्ज वातावरण हवे आहे. प्लॅस्टिक मोल्डिंग पार्ट, ऑटो कंपोनंट, इलेक्ट्रॉनिक भाग, कन्स्ट्रक्शन व्हेंडर्स आणि सहायक सेवा यांचा स्थानिक पाया मजबूत नसेल, तर बाहेरून येणारा उद्योग शहराशी पूर्णपणे जोडला जात नाही. म्हणूनच स्थानिक उद्योगांना पुढे आणणे, त्यांचे पारदर्शक मूल्यांकन करणे आणि मोठ्या कंपन्यांसमोर विश्वासार्ह पर्याय म्हणून उभे करणे, हा या नव्या औद्योगिक संकल्पनेचा मुख्य भाग आहे.
या विचारसरणीत एक महत्त्वाचा घटक म्हणजे स्थानिक आर्थिक परिपथ. शहरात येणारी गुंतवणूक ही केवळ काही जमिनींच्या किमती वाढविण्यापुरती मर्यादित राहू नये, तर ती स्थानिक रोजगार, खरेदी, सेवा, वाहतूक, निवास आणि उपभोग यांमध्ये फिरली पाहिजे. शहरातच खर्च झाला, शहरातील कंपन्यांनी एकमेकांना काम दिले, शहरातील पुरवठादारांना संधी मिळाली, तरच विकास खऱ्या अर्थाने सर्वांपर्यंत पोचतो. याच भूमिकेतून ‘इथे आलेले काम इथेच राहिले पाहिजे’ हा विचार अधोरेखित व्हावा. औद्योगिक क्रांतीचा लाभ जर स्थानिक जनतेपर्यंत पोचला नाही, तर शहर फक्त उत्पादनाचे ठिकाण राहील; पण जर तो व्यापक झाला, तर शहर समृद्धीचे केंद्र बनेल.
--
कौशल्यविकास व्हावा
आजचा खरा प्रश्न कौशल्याचा आहे. उद्योग वाढताहेत, तंत्रज्ञान बदलते आहे, नव्या सॉफ्टवेअरपासून ऑटोमेशनपर्यंत सर्वच क्षेत्रे वेगाने बदलत आहेत. या बदलांना सामोरे जाण्यासाठी फक्त पदवी पुरेशी नाही; रोजगारक्षमतेसाठी विशिष्ट, उद्योगनिहाय आणि तंत्रज्ञाननिहाय कौशल्ये आवश्यक आहेत. मराठवाड्यातील अनेक विद्यार्थी ग्रामीण किंवा निमशहरी पार्श्वभूमीतून येतात. त्यांच्यावर शिक्षण कर्जाचे ओझे असते, घराला आर्थिक हातभार लावायचा असतो, त्यामुळे सुरवातीला चांगल्या पगाराची नोकरी ही त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरते. पण त्या नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षण अनेकदा उपलब्ध नसते. हे अंतर भरून काढण्यासाठी उद्योग-शिक्षण-प्रशासन यांच्यात समन्वय आवश्यक आहे. यासाठी सीएमआयएने स्किल सेंटरचा प्रस्ताव पुढे आणला आहे. हे केंद्र केवळ सीएनसी मशिनिंग, टूलिंग किंवा प्लॅस्टिक तंत्रज्ञानापुरते मर्यादित नसून, व्यवसायाच्या सर्व स्तरांवरील प्रशिक्षणासाठीचे व्यापक व्यासपीठ असेल. तळागाळातील कामगार, शॉप फ्लोअर कर्मचारी, मध्यम व्यवस्थापन आणि उच्च व्यवस्थापन या सर्व स्तरांना आवश्यक प्रशिक्षण मिळाले पाहिजे. यामध्ये फायनान्स, एचआर, मार्केटिंग, लीगल, अकाउंटिंग, टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि उद्योजकीय नियोजन यांचा समावेश असू शकतो. वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने महिलांसाठी राबवलेल्या प्रशिक्षण उपक्रमांचा उल्लेख करून, अशा कार्यक्रमांची व्याप्ती वाढविण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
--
आयटी सेक्टरही गरजेचे
छत्रपती संभाजीनगरचा पुढील मोठा आधारस्तंभ आयटी सेक्टर ठरू शकतो. आज शहरातील अनेक स्थानिक आयटी कंपन्या फक्त छोट्या जागेत काम करत आहेत, पण त्यांच्याकडे वाढीची क्षमता आहे. त्यांना आवश्यक भूखंड, अखंड वीजपुरवठा, विश्वासार्ह इंटरनेट आणि अनुकूल धोरणे मिळाली, तर हजारो रोजगार निर्माण होऊ शकतात. आयटी उद्योगाची खासियत अशी की तो मॅन्युफॅक्चरिंगच्या तुलनेत जलद उभा राहतो; जड पायाभूत गुंतवणूक न करता उत्पादनक्षमता निर्माण होऊ शकते. त्यामुळे शहरातील तरुणांचे पुणे, बंगळुरू, हैदराबाद किंवा दिल्लीकडे होणारे स्थलांतर थांबवू शकतो.
---------------------
पायाभूत सुविधांचे महत्त्व
पायाभूत सुविधांचा मुद्दा निर्णायक आहे. बिडकीन-शेंद्रा कनेक्टर, पुणे-संभाजीनगर ई-वे, अंतर्गत रस्त्यांचे जाळे, पर्यायी मार्ग, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाइट्स, हरित पट्टे, वाहतूक नियमन, पोलिस ठाणे आणि अग्निशमन व्यवस्था या सगळ्या गोष्टी केवळ नगरविकासाचा भाग नाहीत; त्या औद्योगिक विश्वासार्हतेचा आधार आहेत. एखादा उद्योग उभा राहतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला कार्यक्षम सुरक्षा, वाहतूक, आणि नागरी सुविधा असणे गरजेचे असते. अन्यथा औद्योगिक वसाहती विकासाची ठिकाणे न राहता अडचणींची केंद्रे बनू शकतात. त्यामुळे भविष्यातील समस्या टाळण्यासाठी आजपासूनच नियोजन करणे अपरिहार्य आहे, असेही नंदावत यांनी नमूद केले.
-----
आपले शहर आपणच घडवूया
शहरासाठी उद्योग, शैक्षणिक संस्था, स्थानिक व्यावसायिक, नागरिक आणि तरुण वर्ग यांनीही सहभागी व्हायला हवे. ‘आपले शहर आपणच उभे करायचे’ हा विचार केवळ घोषणाबाजी न राहता, प्रत्यक्ष व्यवहारात उतरला, तर संभाजीनगर हे केवळ गुंतवणुकीचा ठिकाण न राहता, एक सक्षम, आत्मनिर्भर आणि आधुनिक औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाईल. संभाजीनगरकडे संधी आहे, क्षमता आहे, आणि आता आवश्यक आहे ती योग्य दिशा. ती दिशा कौशल्य, पायाभूत सुविधा, स्थानिक सहभाग आणि दीर्घदृष्टी यातूनच मिळू शकते. नंदावत कॉर्पोरेट सर्व्हिसेससारख्या स्थानिक संस्थांपासून ते सीएमआयएच्या स्किल सेंटर प्रस्तावापर्यंत आणि आयटी विस्ताराच्या उपक्रमांपर्यंत, या सगळ्या घडामोडी शहराच्या नव्या औद्योगिक रचनेला आकार देत आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
------
नंदावत कॉर्पोरेट सर्व्हिसेसचे महत्त्व
छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि हैदराबाद येथे कार्यरत असलेली ही सल्लागार संस्था कॉर्पोरेट ऑडिट, सरकारी वाटाघाटी, जमीन संपादन, परवानग्या, प्रोत्साहने, बुक कीपिंग, ऑफशोर अकाउंटिंग, क्रॉस-बॉर्डर टॅक्सेशन, स्टार्टअप सल्ला आणि ‘आयपीओ’पर्यंतचे मार्गदर्शन देते. मोठ्या उद्योगांपासून स्टार्टअप्सपर्यंत सर्वसमावेशक सेवा देणारी ही स्थानिक फर्म शहराच्या औद्योगिक क्षमतेचे महत्त्वपूर्ण उदाहरण ठरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.