लेट नाइट अपडेट
--------------
ABD26J82355, ABD26J82356, ABD26J82357 , ABD26J82358
--------------------------------------
चिकलठाण्यात स्लॅब कोसळून मजूर अडकला!
-
पळाल्याने तिघांचे जीव वाचले ः कंत्राटदाराकडून लपवाछपवीने संशय
-
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. २९ ः चिकलठाण्यात जालना रोडलगत इमारतीचा स्लॅब कोसळून त्याखाली मजूर अडकल्याची घटना गुरुवारी (ता. २८) सायंकाळी ६.३० वाजता घडली. बल्ली सरकल्याने स्लॅब कोसळत असल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखून उड्या मारल्याने तीन जणांचे प्राण वाचले. स्लॅबखाली अडकलेल्या मजुराला काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. दरम्यान, घटनास्थळी बचावकार्य सुरू असताना जागेचा मालक, कंत्राटदार यांच्याविषयी कोणीच बोलण्यास तयार नव्हते. कोणाला माहिती देऊ नका, अशी तंबी मजुरांना देण्यात आली होती. या लपवाछपवीने संशय गडद झाला होता.
चिकलठाणा गावालगत जालना रोडवर मुजीतबा खान यांच्या एका मोठ्या इमारतीचे काम सुरू आहे. राठोड नावाच्या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले आहे. सुमारे चार हजार चौरस फुटांचा पार्किंगवरील स्लॅब टाकण्याचे नियोजन गुरुवारी करण्यात आले होते. त्यासाठी लोखंडाची बांधणी पूर्ण केल्यानंतर सायंकाळी त्यावर स्लॅब टाकण्याचे कामही सुरू करण्यात आले. त्यासाठी आठ मजूर वरच्या बाजूला काम करत होते. रात्रीच्यावेळी स्लॅब भरला जाणार असल्याने चार जण लाइटची व्यवस्था करत होते, तर इतर चौघे स्लॅबच्या खाली सेंट्रिंग व्यवस्थित आहे का, कोणत्या ठिकाणी प्लेट खाली-वर आहेत का, याची पाहणी करत त्रुटी असलेल्या ठिकाणी दुरूस्ती करत होते. मजूर स्लॅबखाली काम करत असताना दुसऱ्या बाजूने सिमेंट मिक्सरच्या गाड्यामधून मटेरियल टाकले जात होते. सायंकाळी ६.३० वाजता एका ठिकाणी बल्ली वाकल्याचे चार मजुरांच्या लक्षात आले. ती सरळ करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक मागच्या भागातील सिमेंट खडीचे मटेरिअल एकाच बाजूने सरकले व क्षणात संपूर्ण स्लॅब धाडकन कोसळला. प्रसंगावधान राखून तीन मजुरांनी बाहेरच्या बाजूने उड्या मारल्या, तर एक जण स्लॅबसाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी प्लेटखाली दबला गेला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. अग्निशमन विभागाला तातडीने माहिती कळविण्यात आली. प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्यासह जवान घटनास्थळी धावले. त्यांनी तातडीने जखमी अश्फाक शेख कडू (वय २५, रा. सुंदरवाडी), अंकुश संताराम कांबळे (वय ३५, रा. विजय नगर गारखेडा) यांच्यासह आणखी एकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. अश्फाक शेख यांच्या डोक्याला इजा झालेली आहे, तर अंकुश कांबळे किरकोळ जखमी आहेत. दरम्यान, स्लॅबखाली अडकलेल्या चौथ्या मजुराला बाहेर काढण्यासाठी सुरवातीला पाण्याचा मारा करण्यात आला. मात्र, स्लॅब अवाढव्य असल्याने अडकलेल्या मजुराचा शोध घेणे अवघड झाले. त्यानंतर दोन अजस्त्र क्रेन मागविण्यात आल्या. त्यांच्या मदतीने लोखंड उचलून बाजूला करण्याचा बराच काळ प्रयत्न झाला. पण लोखंडाचे तुकडे-तुकडेच निघत गेले. घटनेची माहिती मिळताच महापौर समीर राजूरकर, विरोधी पक्षनेते समीर बिल्डर, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त नंदकिशोर भोंबे, नगरसेवक काकासाहेब काकडे, माजी नगरसेवक संजय चौधरी, पोलिस उपायुक्त परिमंडळ-२ रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक गणेश राहिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत स्लॅबखाली अडकलेल्या मजुराला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पोकलेनच्या मदतीने मटेरियल बाजूला करून शेवटचा प्रयत्न करण्यात आला.
-------------------------------
कंत्राटदाराला पोलिसांनी घेतले फैलावर
या घटनेतील जागेचा मालक, कंत्राटदार यांच्याविषयी कोणीच बोलण्यास तयार नव्हते. त्यामुळे कामावर एकूण किती मजूर होते, याचीदेखील माहिती मिळाली नाही. दरम्यान, पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी कंत्राटदाराला फैलावर घेताच १६ पैकी १५ मजुरांची त्याने ओळख परेड करून दिली आणि एक जण स्लॅबखाली अडकल्याची कबुलीही दिली. घटनास्थळी मजुरांच्या सुरक्षेकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आल्याचे पोलिसांच्या पाहणीत लक्षात आले. काही मजुरांकडे हेल्मेटदेखील नव्हते. त्यामुळे एकाच्या डोक्याला मार लागला.
---------------
पोलिसांची धावपळ
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीमुळे दोन दिवस पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण होता. त्यातून बाहेर पडताच गुरुवारी सायंकाळी चिकलठाण्यात स्लॅब पडल्याची घटना घडल्याने मोठा बंदोबस्त लावावा लागला. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यांना हुसकावताना पोलिसांच्या नाकीनऊ आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.