बालविवाह रोखण्यासाठी सतर्क राहावे
‘लोकसंवाद’ उपक्रमात बाल संरक्षण, युवकांसाठीच्या योजनांची माहिती
-----
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. २० : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील तळवडा येथे ‘एक गाव, एक गणपती’ मंडपात ‘लोकसंवाद’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. बालविवाह रोखण्यासाठी केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे यांनी यावेळी केले.
सरपंच ज्ञानेश्वर पांडगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात महिला व बालविकास, कौशल्य विकास आणि बाल संरक्षणाशी संबंधित योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शक्ती सदन, मिशन वात्सल्य, बालसंगोपन व शुभमंगल योजनांची माहिती दिली.
कोवे म्हणाले, महिला व बालकांसाठी शक्ती सदन योजना, बाल न्याय अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी, बालसंगोपन योजना, मिशन वात्सल्य योजना, बालकांसाठी बालगृहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण आणि शुभमंगल आदी योजना राबविण्यात येतात. अन्यायग्रस्त किंवा अडचणीत असलेल्या महिलांनी मदतीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.
जिल्हा कौशल्य विकास व रोजगार केंद्राचे सहायक आयुक्त संजय गुरव यांनी युवकांना प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. चाइल्ड हेल्पलाइनचे जिल्हा समन्वयक विकास चव्हाण यांनी संकटसमयी १०९८ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले.
जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी प्रास्ताविकात ‘लोकसंवाद’ उपक्रमामागील भूमिका विशद केली. यावेळी उपस्थितांना ‘विकास वाटा’ घडी पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास गणेश मंडळाचे अध्यक्ष सिंहल गुंड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष इसाक शेख, अजित चंदनशिवे यांच्यासह ग्रामस्थ, महिला व युवक उपस्थित होते. ज्ञानेश्वर सरक यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.