दुष्काळावर मात करण्यासाठी प्रयत्नांची गरज
समाज, स्वयंसेवी संस्था, विद्यापीठ आणि शासकीय यंत्रणेत समन्वय आवश्यक
-----
धाराशिव, ता. १७ : जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी केवळ एका यंत्रणेच्या प्रयत्नांवर अवलंबून न राहता समाज, स्वयंसेवी संस्था, विद्यापीठ आणि शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयाने एकत्रित काम करण्याची गरज आहे, असे मत एकदिवसीय संवाद व चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. जल व भूमी व्यवस्थापन विभाग आणि ज्ञान प्रबोधिनी केंद्र (हराळी) यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी उपाययोजनांसाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने हे चर्चासत्र घेण्यात आले.
चर्चासत्रात जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत १९ स्वयंसेवी संस्थांमधील २८ प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घेतला. दुष्काळामुळे शेती, पाणी, उपजीविका, पर्यावरण आणि सामाजिक जीवनावर होणाऱ्या दूरगामी परिणामांचा विविध अंगांनी आढावा घेण्यात आला. सहभागी संस्थांच्या प्रतिनिधींनी दुष्काळी काळात केलेल्या कामांचे अनुभव मांडत स्थानिक पातळीवरील अडचणी आणि संभाव्य उपाययोजनांवर प्रकाश टाकला.
-----
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सचिन सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे वास्तव मांडले. शेतकऱ्यांनी पिके आणि पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जल व भूमी व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. नितीन पाटील यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी ‘पाण्याचा ताळेबंद’ ठेवण्याची संकल्पना मांडली. तसेच मृदासंवर्धन आणि वृक्षसंवर्धनावर भर देण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे, तर तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शासकीय अभ्यासातून समोर आलेली दुष्काळी परिस्थिती आणि आपत्कालीन उपाययोजनांवर संवाद साधला. डॉ. संपत काळे आणि अभिजित कवठेकर यांनी स्वयंसेवी संस्थांनी आगामी आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक जबाबदारीने पुढे येण्याचे आवाहन केले.
-----
स्थानिक गरजांवर आधारित कृती आराखडा
या संवादातून केवळ कागदी योजना न आखता स्थानिक गरजांवर आधारित प्रत्यक्ष उपाययोजना, उपक्रम आणि कृती आराखडा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी उपपरिसराचे संचालक डॉ. आर.बी. चौगुले, ज्ञान प्रबोधिनी केंद्र हराळीचे प्रमुख अभिजित कापरे, टिसचे संचालक डॉ. बाळ राक्षे, प्राध्यापक डॉ. संपत काळे, डॉ. गणेश चांदरे, वॉटर संस्थेचे प्रमुख अभिजित कवठेकर आणि एसएसपी संस्थेच्या देवकन्या जगदाळे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.