आंबा चोंडी माता मंदिर परिसरात स्वच्छता
किल्ले धारूर : महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शहराचे ग्रामदैवत आंबा चोंडी माता मंदिर परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत हा उपक्रम घेण्यात आला. मार्गदर्शक डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अभियानात संदीप काचगुंडे, दत्ताभाऊ धोत्रे, ॲड. मोहन भोसले, संतोषबप्पा सिरसट, बालूदादा चव्हाण, विनायक शिनगारे, प्रदीप नेहरकर, रोहितसिंह हजारी, रोहनसिंह हजारी, सचिन दुबे, धनंजय नागरगोजे, गणेश बडे, दादासाहेब घोळवे, संदीप भैया शिनगारे, बिशु शेठ तोष्णीवाल, प्रदीप पुजदेकर, बालाजी नागरगोजे, विलास मेंद यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले होते.
------
वनविभागासमोर आंदोलनाचा इशारा
वडवणी : बीड जिल्ह्यातील डोंगरपट्ट्याच्या रांगांमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे जंगली पशुपक्ष्यांची पाण्याविना मोठी तडफड होत आहे. या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे डोंगर रांगांच्या विस्तीर्ण भागात पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, वन्यजीव तहानलेले आहेत. वनविभागाने तातडीने पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी. दरवर्षी पानवठे बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, मात्र सध्या हे सर्व पानवठे पूर्णपणे कोरडेठाक पडलेले स्पष्ट दिसत आहेत. त्यामुळे वनविभागाच्या वनाधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देऊन डोंगररांगांमधील पानवट्यांमध्ये पाणी उपलब्ध करून पशुपक्ष्यांना जीवदान द्यावे. अन्यथा वनविभागाच्या कार्यालयासमोर भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मल्हार ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष दत्ता वाकसे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.
-------
फोटो आहे
शहीद स्मारकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण
अंबाजोगाई ः अंबाजोगाई येथील योगेश्वरी सैनिक स्कूलमध्ये निवृत्त ब्रिगेडियर सुमंत दशरथ यांच्या हस्ते शहीद स्मारकाचे अनावरण झाले. यावेळी कर्नल सतिश हंगे, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, माजी अध्यक्ष डाॅ. सुरेश खुरसाळे, अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, सचिव कमलाकरराव चौसाळकर, प्राचार्य मेजर एस.पी. कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी शहिदांना मानवंदना देण्यात आली. सैनिक स्कूलमधून सुसंस्कृत नागरिक घडतील असा विश्वास सुमंत दशरथ व सतीश हंगे यांनी व्यक्त केला. ऋषिकेश शिंदे व सुरेश खुरसाळे यांनीही विचार मांडले. यावेळी वीरपत्नी जयश्री शिवाजी चव्हाण व इंदूमती शंकर जाधव यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक चंद्रशेखर बर्दापूरकर, सूत्रसंचालन मेजर एस.पी. कुलकर्णी, तर आभार प्रशांत बर्दापूरकर यांनी मानले.
-------
शेतकरी गट क्षमता बांधणी प्रशिक्षण संपन्न
वडवणी : वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे कृषी विभाग व महत्वपूर्ण आत्मा योजनेअंतर्गत प्रकल्प संचालक एस.एम.साळवे, तालुका कृषी अधिकारी बी.एम.खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने नोंदणी झालेल्या गटांसाठी गट क्षमता बांधणी प्रशिक्षण घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एस.आंधळे यांनी केले. जी.एम.ढाकणे यांनी विविध सरकारी योजनांबाबत, आर.एस.खराडे यांनी उत्पादक कंपनी स्थापनेबाबत, राजू ढोले यांनी सेंद्रिय निविष्ठा बनवण्याबाबत, विशाल बहिर यांनी गटांच्या नोंदींविषयी, तर प्रल्हाद गवारे यांनी रब्बी पीक नियोजनावर सर्वांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी गटांना साहित्य किटचे मोफत वाटप करण्यात आले. प्रज्ञेश खरे यांनी शेवटी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आत्मा कर्मचारी व राजू ढोले यांच्यासह ग्रामस्थांनी अत्यंत मोठे प्रयत्न केले.
------
टपाल अदालतचे १६ ऑक्टोबरला आयोजन
बीड ः टपाल विभागाच्या सेवेबाबत असलेल्या ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी पोस्ट विभागातर्फे १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील पोस्टमास्टर जनरल यांच्या कार्यालयात डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. मागील सहा आठवड्यांत निवारण न झालेल्या टपाल सेवा, मनी ऑर्डर, बचत बँक खाते आणि बचत प्रमाणपत्रांबाबतच्या तक्रारींची दखल या अदालतीत घेतली जाणार आहे. तक्रारदारांनी आपली तक्रार सविस्तर तपशिलासह दोन प्रतीत आपला अर्ज भगवान नागरगोजे, सहायक निदेशक, जन शिकायत विभाग, कार्यालय पोस्टमास्टर जनरल, छत्रपती संभाजीनगर ४३१००२ या पत्त्यावर १४ ऑक्टोबरपर्यंत पाठवणे आवश्यक आहे. मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्जाचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------
महिला शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण
अंबाजोगाई ः महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंबाजोगाईच्या वतीने पट्टीवडगाव येथे महिला शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. प्रशिक्षक सहाय्यक कृषी अधिकारी सुवर्णा आरसुळे, ओम कांगणे, ग्राम महसूल अधिकारी राजपाल बैकरे, सरपंच जयश्री लव्हारे, शाम लव्हारे, शिवाजी वाकडे उपस्थित होते. सुवर्णा आरसुळे यांनी महिला शेतकरी व्याख्या, निकष, प्रमाणपत्र मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेबाबत सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात गाव पातळीवर कृषी विभागाची जबाबदारी विशद करण्यात आली. या महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमास गावातील सर्व ग्रामस्थ व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या दिसून आल्या.
-------
नवमतदारांसाठी जनजागृती कार्यशाळा
अंबाजोगाई ः अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात नवमतदारांसाठी जनजागृती कार्यशाळा झाली. तहसीलदार विलास तरगे उपस्थित होते. रमेश सोनवळकर यांनी निवडणूक प्रक्रिया, इव्हीएम व लोकशाहीवर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी डॉ. प्रशांत देशमुख होते. यावेळी डॉ. रमेश सोनटक्के, जितेंद्र देशपांडे, श्रीकांत जवळगावकर, डॉ. गंगाधर आकलुड उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. किरण चक्रे तर आभार प्रा. सविता बुरांडे यांनी मानले. आयोजनासाठी डॉ. डी. एल. सोनवणे, डॉ. ज्ञानेश्वर वडजे, डॉ. भारती गडदे, डॉ. सुलक्षणा चाटे, डॉ. निलेश होदलूरकर, प्रा. पाराजी शिंपले, अभय शेटे, बाळू वैद्य, सय्यद शमशुद्दीन यांनी पुढाकार घेतला. सर्व तरुणांनी मतदान करावे असे महत्त्वपूर्ण आवाहन या विशेष कार्यक्रमात करण्यात आले आहे.
-------
माहिती अधिकाराबाबत निबंध स्पर्धेला प्रतिसाद
अंबाजोगाई ः उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाई व योगेश्वरी नूतन विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत विद्यालयातील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. माहितीचा अधिकार हा सर्व नागरिकांना मिळालेला महत्त्वपूर्ण अधिकार असून, त्याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी आणि जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी माहिती अधिकार अधिनियमाचे महत्त्व, नागरिकांचे अधिकार, शासकीय कामकाजातील पारदर्शकता आणि जबाबदारी या विविध विषयांवर निबंध लिहिले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत माहिती अधिकाराच्या प्रभावी वापराबाबत आपले विचार मांडले. या उपक्रमाचे सहाय्यक मोटार निरीक्षक ऐश्वर्या कराड, विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व पदाधिकारी यांनी विशेष कौतुक केले.
-------
विद्यार्थिनींची क्रीडा क्षेत्रात भरारी
बीड ः येथील संस्कार प्राथमिक विद्यालयाच्या श्रावणी गणेश भंडारे या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय मल्लखांब या क्रीडाप्रकारामध्ये बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून आता तिची विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच शाळेची विद्यार्थिनी तेजल बाळासाहेब लाखे या विद्यार्थिनीने बीड तालुकास्तरीय थाळीफेक स्पर्धेत बीड तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला आणि तिची जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत निवड झाली आहे. या दोन्ही विद्यार्थिनींचे संस्कार प्रबोधिनी संस्थेचे कार्यवाह ॲड कालिदास थिगळे आणि संस्थेचे सर्व संचालक शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कुलकर्णी, मुख्याध्यापक शाम घाडगे विभागप्रमुख सुनील सोनवळकर क्रीडा प्रमुख दिनकर बडे आणि पाचवी ते सातवी विभागातील सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वागत केले आहे.
-------
रोटरी क्लबतर्फे शिक्षकांचा नेशन बिल्डर अवॉर्डने गौरव
गेवराई ः शिक्षक हा प्रशासनातील अत्यंत महत्वाचा घटक असून खऱ्या अर्थाने शिक्षकच देशाचा राष्ट्रनिर्माता आहे, असे स्पष्ट मत रोटरी इंटरनॅशनलच्या सीएसआर चेअरमन वर्षा पित्ती यांनी व्यक्त केले. शिक्षकांना त्यांच्या चांगल्या कामासाठी प्रेरणा मिळावी म्हणून दिला जाणारा नेशन बिल्डर अवॉर्ड हा खरोखरच भाग्याचा क्षण आहे, असेही त्या म्हणाल्या. रोटरी क्लब ऑफ गेवराईतर्फे २९ सप्टेंबर रोजी लातूर पॅटर्न क्लासेसच्या सभागृहात नेशन बिल्डर अवॉर्ड व उत्कृष्ट गणेश मंडळांच्या पारितोषिक वितरणाचा शानदार कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे सहप्रांतपाल इंजि. नितीन गोपन हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून वर्षा पित्ती, डॉ. कविता गीते कराड, आणि गीतांजली गरड यांची उपस्थिती होती.
--------
शिरूरच्या कालिकादेवी महाविद्यालयाचा डंका
शिरूर कासार ः छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापीठातर्फे गेवराई येथे संपन्न झालेल्या आविष्कार स्पर्धेत शिरूरच्या कालिकादेवी महाविद्यालयातील तीन प्रकल्पांची थेट केंद्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कार्तिक कांबळे याने पेस्टिसाइड रिमूव्हल मशीन प्रकल्पात प्रथम, राणी काकडे हिने बायोडिग्रेडेबल सर्फेक्टंट प्रकल्पास द्वितीय, तर श्रद्धा गिरी हिने डिजिटल मतदार केवायसी व मतदान प्रणाली प्रकल्पासाठी तृतीय पारितोषिक मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास अंधारे, डॉ. सुधीर येवले, डॉ. गणेश आडगावकर, डॉ. उद्धव चौधर, डॉ. प्रीती विधाते, डॉ. संदीप संपल, डॉ. शामा लोमटे, डॉ. ज्ञानेश्वर येवले, आणि डॉ. धम्मपाल घुम्बरे यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक करून अभिनंदन केले.
-----
उमराद खालसा शाळेत महापुरुषांना अभिवादन
बीड ः तालुक्यातील उमराद खालसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महादेव घोडके उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर भाषणे केली. महादेव घोडके यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वावलंबन, जिद्द, चिकाटी अंगीकारावी, असे आवाहन केले. शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असेही सांगितले. मल्टिमिडीया आणि मोबाईलचा वापर करताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे, हेही त्यांनी पटवून दिले.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.