छत्रपती संभाजीनगर

कबुलीजबाब न्यायालयात कधी ग्राह्य धरला जातो?

CD
((( कायद्याची भाषा))) कबुली जबाब न्यायालयात कधी ग्राह्य धरला जातो? ---- गुन्हा मान्य केल्यानेच आरोपी दोषी ठरत नाही; कबुली जबाबाची स्वेच्छा, नोंदविण्याची पद्धत आणि कायदेशीर वैधता महत्त्वाची -- न्यायालयीन विविध खटल्यांमध्ये आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली, तर त्याला दोषी ठरविता येते का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. मात्र, केवळ कबुली जबाब दिला म्हणून तो न्यायालयात आपोआप ग्राह्य धरला जात नाही. तो कोणत्या परिस्थितीत, कोणासमोर आणि कशा पद्धतीने दिला आहे, याला कायद्याच्या दृष्टीने महत्त्व आहे. भारतात १ जुलै २०२४ पासून लागू झालेल्या भारतीय साक्ष्य अधिनियम, २०२३ मध्ये कबुली जबाबाच्या ग्राह्यतेसंदर्भात तरतुदी आहेत. त्यानुसार, दबाव, धमकी, प्रलोभन किंवा आश्वासनामुळे दिलेला कबुली जबाब पुराव्यात ग्राह्य धरण्यावर कायदेशीर निर्बंध आहेत. ---- पोलिसांसमोरील कबुली जबाबाला मर्यादा भारतीय साक्ष अधिनियमाच्या कलम २३ नुसार, पोलिस अधिकाऱ्यासमोर दिलेला कबुली जबाब सामान्यतः आरोपीविरुद्ध सिद्ध करता येत नाही. पोलिस कोठडीत दिलेल्या कबुली जबाबालाही दंडाधिकाऱ्याच्या तत्काळ उपस्थितीशिवाय ग्राह्यतेची मर्यादा आहे. मात्र, आरोपीने दिलेल्या माहितीमुळे एखादी वस्तू किंवा महत्त्वाचा पुरावा सापडल्यास, त्या शोधाशी स्पष्टपणे संबंधित माहितीचा भाग पुरावा म्हणून ग्राह्य धरता येतो. ----- दंडाधिकाऱ्यासमोरील कबुली जबाब भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १८३ नुसार, दंडाधिकारी कबुली जबाब नोंदविण्यापूर्वी आरोपीला तो कबुली जबाब देण्यास बांधील नसल्याचे आणि त्याचा वापर त्याच्याविरुद्ध होऊ शकतो, हे स्पष्ट करतो. आरोपी स्वेच्छेने कबुली जबाब देत असल्याची खात्री झाल्यानंतरच तो नोंदविला जातो. आरोपीने नंतर कबुली जबाब मागे घेतला, तरी तो प्रत्येक प्रकरणात आपोआप बाद होत नाही. न्यायालय त्याची सत्यता, नोंदविण्याची परिस्थिती आणि अन्य उपलब्ध पुरावे तपासते. आवश्यकतेनुसार स्वतंत्र पुराव्यांची पुष्टीही महत्त्वाची ठरते. थोडक्यात, कबुली जबाब ग्राह्य धरण्याचा निर्णय केवळ आरोपीने गुन्हा मान्य केला आहे, यावर अवलंबून नसतो. तो कायदेशीर प्रक्रियेनुसार, स्वेच्छेने आणि विश्वासार्ह परिस्थितीत दिला आहे का? याची तपासणी करूनच न्यायालय त्याचे पुराव्यातील महत्त्व ठरवते. ----- चौकट कबुली जबाब मागे घेतल्यास काय? आरोपीने न्यायालयात पूर्वी दिलेला कबुली जबाब नंतर मागे घेतला, तरी तो आपोआप अमान्य ठरत नाही. कबुली जबाब स्वेच्छेने दिला होता का, त्याला अन्य पुराव्यांची पुष्टी आहे का आणि तो विश्वासार्ह आहे का, याची न्यायालय पडताळणी करते. त्यानंतरच त्याच्या पुराव्याचे महत्त्व निश्चित केले जाते. -अनिल जमधडे ९९२२०३४५००

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Australia Hate Campaign : "ही तुमची संस्कृती आहे का?"; ऑस्ट्रेलियात भारतीय उत्पादनांवर वर्णद्वेषी स्टिकर्स, भारतीयांविरोधात द्वेष का वाढतोय?

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरण, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराजवळ 'ही' झाडे लावणे मानले जाते शुभ; जाणून घ्या घरासाठी फायदेशीर असणारी रोपे!

Pune News : झाडणकाम वाढले, रस्ते स्वच्छ, उकिरडे झाले कमी

SCROLL FOR NEXT