पालिकेच्या सभेतील १५ ठरावांवर आक्षेप
भाजप, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बीड, ता. ४ : नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी नगरसेवकांनी सभात्याग केल्यानंतरही १७ पैकी १५ ठराव एकतर्फी मंजूर दाखविल्याचा आरोप करण्यात आला. या ठरावांना बेकायदेशीर ठरवत ते रद्द करावेत आणि संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलवावी, अशी मागणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
सभेतील विषय क्रमांक चार सुरू होण्यापूर्वीच गोंधळ झाला. सत्ताधाऱ्यांच्या कथित मनमानी कारभाराचा निषेध करत भाजप आणि राष्ट्रवादीचे (एसपी) नगरसेवक सभागृहाबाहेर पडले. विरोधी नगरसेवक सभागृहात उपस्थित नसताना नंतर १७ ठराव मंजूर कसे झाले, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. ठरावांवर चर्चा, मतदानाची प्रक्रिया न करता ते मंजूर दाखविल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
सभेत शहरातील विकासकामांच्या खर्चावरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले. मुरूम खरेदी आणि रस्त्यांवर टाकण्याच्या कामासाठी दोन कोटी ७० लाख रुपये खर्च दाखविण्यात आल्याचा उल्लेख करत नगरसेवकांनी हिशेब मागितला. प्रत्यक्षात रस्त्यांवर अत्यल्प प्रमाणात मुरूम टाकण्यात आला असून, मोठ्या रकमेची बोगस बिले काढल्याचा आरोप महिला नगरसेविकांनी केला.
-----
सर्वसाधारण सभेत बहुमत नसतानाही काही विषय रेटून नेण्याचा प्रयत्न झाला. नगरसेवकांनी अनेक ठरावांवर आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे ही सभा ग्राह्य धरू नये आणि रद्द करून पुढील तारीख द्यावी, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे.
-डॉ. योगेश क्षीरसागर, भाजपचे नेते
-----
शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा सोडविण्यासाठी पालिकेचे कामकाज शांततेत चालावे, या हेतूने पाठिंबा दिला होता. मात्र, सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार वाढत राहिल्यास पाठिंबा काढून घेऊ. सभेत एकतर्फी मंजूर केलेले ठराव रद्द करून संबंधित विषयांवर चर्चेसाठी पुन्हा सभा बोलवावी.
-खुर्शीद आलम, नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.