पान १ लीड
इव्हेंट भारी, पण सेवाच पडली आजारी
सीटी स्कॅन बंद असल्याने रुग्णांचे अतोनात हाल; ८० कोटींच्या बिलासाठी रुग्ण वेठीस
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. ५ ः जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे पार धिंडवडे निघाले असून, येथील जिल्हा रुग्णालयाचा कारभार म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असाच झाला आहे. मोठमोठ्या इव्हेंटच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाची आणि आरोग्य यंत्रणेची खरी अवस्था आता चव्हाट्यावर आली आहे. केवळ थकीत बिलांच्या कारणावरून मुजोर कंत्राटदाराने चक्क गोरगरीब आणि मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांची सीटी स्कॅन सेवाच गेल्या पाच दिवसांपासून वेठीस धरली आहे.
एकीकडे ठेकेदाराची मनमानी आणि दुसरीकडे सुस्त, असंवेदनशील प्रशासन यांच्या संगनमतामुळे निष्पाप रुग्णांना खासगी केंद्रांमध्ये तीन-तीन हजार रुपये मोजून लुटले जात आहे. हा गरिबांच्या जिवाशी चाललेला संतापजनक खेळ प्रशासनाला दिसत नाही का? असा उद्विग्न सवाल आता बीडकर विचारत आहेत.
आरोग्य सेवेचा बोजवारा उडालेल्या बीड जिल्हा रुग्णालयात प्रशासनाचा निर्लज्जपणा आणि ठेकेदाराची मुजोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मागील सलग पाच दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील अत्यंत महत्त्वाची सीटी स्कॅन सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे उपचारासाठी येणाऱ्या अत्यंत गरीब आणि गरजू रुग्णांना नाहक मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रस्ना डायग्नोस्टिक्स या कंपनीकडून राज्यातील ४८ शासकीय रुग्णालयांमध्ये कंत्राटानुसार सीटी स्कॅन सेवा दिली जाते. या कंत्राटाचे मागील काही महिन्यांतील राष्ट्रीय आरोग्य अभियाना''कडून तब्बल ८० कोटी रुपयांपेक्षा अधिक बिल थकीत राहिल्याचे कारण पुढे करत या ठेकेदाराने रुग्णांची संपूर्ण सेवाच बंद पाडली आहे. अपघातग्रस्त रुग्ण, मेंदूशी संबंधित गंभीर आजार किंवा आपत्कालीन स्थितीत दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी सीटी स्कॅन ही अत्यंत तातडीची आणि जीव वाचवणारी चाचणी असते. जिल्हा रुग्णालयात ही सुविधा मोफत उपलब्ध असल्याने संपूर्ण जिल्ह्यातून रोज शेकडो रुग्ण येथे आशेने येतात. मात्र, मागील पाच दिवसांपासून ठेकेदाराने पैशांसाठी सीटी स्कॅन मशीनला कुलूप ठोकले आहे.
सर्वात संतापाची बाब म्हणजे, या संदर्भात राज्याच्या आरोग्य सहसंचालकांनी लेखी पत्र काढून रुग्णांची अडवणूक करू नका अशा कडक सूचना दिलेल्या आहेत. तरीही, या आदेशाला अक्षरशः केराची टोपली दाखवत ठेकेदाराने आपली सेवा सुरू केलेली नाही.
जिल्हा रुग्णालयातील हे सीटी स्कॅन केंद्र सार्वजनिक-खासगी भागीदारीतून चालवले जाते. एकीकडे जिल्हा शल्यचिकित्सक नवनवीन हायटेक सुविधा आणण्याच्या पोकळ गप्पा मारत आहेत, तर दुसरीकडे हाताशी असलेल्या सीटी स्कॅनचे थकीत देयक भागवून ही अतिआवश्यक सेवा पूर्ववत सुरू ठेवण्यात रुग्णालय प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे. प्रशासनाच्या या ढिसाळपणामुळे गोरगरीब रुग्णांचे जीव अक्षरशः टांगणीला लागले आहेत.
------
खासगी चालकांचे पौष्टिक दिवस
जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन बंद असल्याचा थेट फायदा शहरातील खासगी डायग्नोस्टिक सेंटर्स आणि रुग्णालयाच्या दारात घिरट्या घालणाऱ्या दलालांना होत आहे. अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी नातेवाईकांना नाईलाजाने या खाजगी केंद्रांकडे धाव घ्यावी लागत आहे. तिथे एका सीटी स्कॅनसाठी अडीच ते तीन हजार रुपये उकळले जात आहेत. पोटाला चिमटा काढून आणि प्रसंगी कर्ज काढून रुग्णांचे नातेवाईक हा मोठा आर्थिक भुर्दंड निमूटपणे सहन करत आहेत.
----------
कोट
डोक्याला मार लागल्याने प्रचंड त्रास होतोय. सरकारी रुग्णालयात मोफत उपचार मिळतील म्हणून आले होते, पण इथे ४ दिवसांपासून सीटी स्कॅन बंद आहे. खासगीत जायला आमच्याकडे पैसे नाहीत. बिलांच्या थकबाकीसाठी गरिबांचे जीव टांगणीला लावणे हा कुठला न्याय?
- सुरेखा कांबळे, रुग्ण
------
सिव्हिलच्या बाहेर दलाल फिरत आहेत. आत सीटी स्कॅन बंद असल्याचे समजताच खासगीत नेण्यासाठी गाड्या तयार असतात. ३ हजार रुपये मोजल्याशिवाय स्कॅन होत नाही. कर्ज काढून रुग्णाचा जीव वाचवावा लागत आहे. रुग्णालय प्रशासनाने या ठेकेदारावर तात्काळ कडक कारवाई केली पाहिजे.
- महादेव आडे, रुग्णाचे नातेवाईक
------
आम्ही गरीब लोकांनी उपचारासाठी कुठे जायचे? सरकार कोट्यवधी रुपयांच्या घोषणा करते, पण इथे साधे सीटी स्कॅन चालू ठेवता येत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः इथे येऊन परिस्थिती पाहावी आणि ही सेवा आजच्या आज सुरू करावी.
- अविनाश जाधव, रुग्णाचे नातेवाईक
------
शासकीय रुग्णालयात थकीत बिलांच्या नावाखाली सीटी स्कॅन सेवा रोखणे म्हणजे गोरगरीब रुग्णांच्या जिवाशी चालवलेला अत्यंत भयंकर खेळ आहे. आरोग्य सहसंचालकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणारा ठेकेदार आणि त्याच्यासमोर गुडघे टेकणारे जिल्हा शल्यचिकित्सक या दोघांवरही तत्काळ कारवाई झाली पाहिजे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा निधी थकल्याचे कारण दाखवून निष्पाप रुग्णांना वेठीस धरणे खपवून घेतले जाणार नाही.
- डॉ. गणेश ढवळे, सामाजिक कार्यकर्ते, बीड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.