((((मिशन ॲडमिशन))))
---
डी. फार्मसीच्या नोंदणीला ‘तारीख पे तारीख’
---
सहाव्यांदा मुदतवाढ; ११ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची संधी, कॅप फेऱ्यांच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा
---
छत्रपती संभाजीनगर, ता. ३ : बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी. फार्मसी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीला तंत्रशिक्षण संचालनालयाने सहाव्यांदा मुदतवाढ दिली आहे. उमेदवारांना आता ११ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रे अपलोड व पडताळणी तसेच अर्ज निश्चित करता येणार आहे. मात्र, प्रवेश प्रक्रियेतील पुढील महत्त्वाच्या कॅप फेऱ्यांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नसल्याने विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा गोंधळ कायम आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून, महाराष्ट्र राज्य तसेच अखिल भारतीय उमेदवारांसाठी नोंदणी आणि कागदपत्रांच्या पडताळणीची अंतिम मुदत ११ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. १६ सप्टेंबरला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यावर हरकती नोंदविण्यासाठी १७ ते १९ सप्टेंबरपर्यंत मुदत असून, २० सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
---
शैक्षणिक वेळापत्रक लांबणार
गेल्या वर्षी राज्यातील ५३१ महाविद्यालयांत डी. फार्मसीचे ३२ हजार प्रवेश झाले होते. यंदापासून नव्या महाविद्यालयांना वर्ष २०३१ पर्यंत मान्यता देण्यास बंदी घालण्यात आली. गेल्या वर्षी १७० हून अधिक महाविद्यालयांवर कारवाई करण्यात आली होती. त्यापैकी काही महाविद्यालयांनी न्यायालयात धाव घेतली. त्यातच फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या मान्यतेची प्रक्रिया गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत लांबल्याने शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाली असल्याचे फार्मसी शिक्षकांनी सांगितले.
---
अंतिम गुणवत्ता यादीपूर्वी कॅप फेऱ्यांचे वेळापत्रक नाही
कॅपच्या विविध फेऱ्यांसाठी विकल्प अर्ज भरणे, जागावाटप, जागास्वीकृती, संबंधित संस्थेत प्रवेश घेणे तसेच संस्था स्तरावरील प्रवेशाचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे संचालनालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या पुढील टप्प्यांसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
---
कॅपबाहेरील जागांसाठी स्वतंत्र प्रक्रिया
११ सप्टेंबरनंतर ई-स्क्रूटनी किंवा प्रत्यक्ष स्क्रूटनीद्वारे नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्चित करणारे अर्ज केवळ संस्था स्तरावरील तसेच कॅपबाहेरील जागांसाठी विचारात घेतले जातील. या प्रवेशाचे पुढील वेळापत्रक संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे.
---
असे आहे सुधारित वेळापत्रक
ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रे अपलोड : ११ सप्टेंबरपर्यंत
तात्पुरती गुणवत्ता यादी : १६ सप्टेंबर
हरकती नोंदविणे : १७ ते १९ सप्टेंबर
अंतिम गुणवत्ता यादी : २० सप्टेंबर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.