धाराशिववर पाणीटंचाईचे सावट;
यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश
धाराशिव, ता. १७ : पावसाच्या दीर्घ खंडामुळे जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, सिंचन प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. आगामी काळात गंभीर पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन शासकीय यंत्रणांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पिण्याचे पाणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. मराठवाड्यासह पावसाची तूट असलेल्या भागांत खरीप पिकांबरोबरच आगामी पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात गुरुवारी (ता. १७) पाणीटंचाई व पीक नुकसानीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलिस अधीक्षक रितू खोखर आणि निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर उपस्थित होते.
राजेनिंबाळकर यांनी शेतकऱ्यांना १०० टक्के पीक नुकसानीपोटी भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी केली. उपग्रहाद्वारे दर्शविलेल्या उत्पन्नाची अट रद्द करून प्रत्यक्ष पाहणीवर भर द्यावा, तसेच टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. पाटील यांनी पीक कापणी प्रयोगाचे काम एका आठवड्यात पूर्ण करून शासनाला तातडीने अहवाल पाठविण्याचे सूचित केले. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत केवळ सात टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने शेतीसाठीचे पाणी बंद करण्यात आले आहे. भूजल विकास यंत्रणेच्या माहितीनुसार, भूजलपातळी तब्बल सात मीटरने खालावल्याने विहिरींच्या पाणीक्षमतेवरही परिणाम झाला आहे.
-----
१८४ विहिरी अधिग्रहित
सध्या धाराशिव तालुक्यात पाच आणि लोहारा तालुक्यात एक टँकर सुरू असून, १८४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. टंचाई आणि पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन सरनाईक यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.