खांब उभारले, दिवे बसविले
पण वीजजोडणीअभावी नागरिकांची गैरसोय
धाराशिव, ता. २१ (बातमीदार) : शहराबाहेरून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बायपासलगतच्या सर्व्हिस रस्त्यांवरील बहुतांश पथदिवे बंद असल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी पथदिव्यांसाठी खांब उभारून दिवेही बसविण्यात आले आहेत. मात्र, ते अद्याप सुरू झालेले नाहीत. त्यामुळे दिवाळीपूर्वी तरी सर्व्हिस रस्ते प्रकाशमान होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शहरांतर्गत वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी शहराबाहेरून पर्यायी मार्ग सुरू करण्यात आला. या महामार्गाचे चौपदरीकरण करताना शहराच्या दोन्ही बाजूंनी उड्डाणपूल उभारण्यात आले. पण, येडशीहून शहरात प्रवेश करताना उड्डाणपुलापासून पुढील सर्व्हिस रस्त्यावर अंधार असतो. येथे पथदिवे बसविण्यात आले असले, तरी वीजजोडणीअभावी ते सुरू झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्किट हाउसपासून बायपासमार्गे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतच्या सर्व्हिस रस्त्यालगतही अनेक पथदिवे बंद आहेत. एमआयडीसी परिसरातील उड्डाणपुलाच्या एका बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावरील दिवेही अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी दिवे सुरू असले तरी बहुतांश भाग अंधारात असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महामार्गाच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वसाहती वाढल्या असून, सर्व्हिस रस्त्यांचा वापर करणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. रात्रीच्या वेळी अंधारामुळे अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने वीजजोडणी करून सर्व पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.