छत्रपती संभाजीनगर

दिवाळी अंकाची समृद्ध परंपरा

CD
दिवाळी अंकाची समृद्ध परंपरा --- ((इंट्रो)) मराठी माणसांची दिवाळी ही दिवाळी अंकाशिवाय नसते. खमंग फराळ आणि सोबत दर्जेदार साहित्य लागते म्हणजे लागतेच. पण, ही परंपरा कुठून सुरू झाली, कशी झाली याचा घेतलेला हा आढावा... - प्रशांत गौतम --- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि दिवाळी अंकाची परंपरा हे मराठी भाषेचे खास वैशिष्ट्य आहे. साहित्य संमेलन शतकाच्या उंबरठ्यावर आहे आणि दिवाळी अंक परंपरेने ११६ वर्षे पूर्ण केली. हे मराठी भाषकांसाठी नक्कीच भूषणावह आहे. मराठी रसिक आणि वाचकांना या परंपरेचे अप्रूप असते. अलीकडे बृहन्महाराष्ट्रातील इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, अहमदाबाद येथेही दिवाळी अंक प्रकाशित होतात. शतक महोत्सवी प्रवास पूर्ण करून ही परंपरा आता ११७ व्या वर्षाकडे वाटचाल करीत आहे. महाराष्ट्रात तर दिवाळी अंकाशिवाय दिवाळी नाही, असे सांस्कृतिक आणि आर्थिक समीकरण आहे. महाराष्ट्रातील दिवाळी अंकांची परंपरा ११७ वर्षांची आहे. वर्ष १९०९ मध्ये पुण्यात काशीनाथ रघुनाथ आजगावकर तथा का.र. मित्र यांनी ‘मनोरंजन’चा पहिला दिवाळी अंक प्रकाशित केला. तेच संपादक आणि प्रकाशक होते. त्याआधी १९०५-०६ च्या काळात ‘आनंद’ नियतकालिकात दिवाळी विशेष लेख प्रसिद्ध होत. पाश्चात्त्य देशांतील सणांसाठी विशेषांक प्रकाशित होत असल्याच्या प्रेरणेतून मित्र यांनी स्वतंत्र दिवाळी अंक सुरू केला. तेव्हापासूनचा प्रवास आज डिजिटल दिवाळी अंकापर्यंत पोचला. या उपक्रमाने नियतकालिकांच्या विश्वात नवा पायंडा पडला. विविध विषयांवरील अंक प्रसिद्ध होऊ लागले आणि दिवाळी अंक मराठी साहित्य विश्वातील स्वतंत्र सांस्कृतिक आविष्कार बनले. दिवाळीच्या फराळासोबत साहित्याचा आस्वाद घेणे वाचन संस्कृतीचा भाग बनले. दिवाळी अंकांत कथा, कविता, ललित लेख, कादंबरी, वैचारिक लेखन, विनोद, व्यक्तिचित्रे आणि सामाजिक विषयांवरील साहित्याची मेजवानी असते. स्त्री जीवन, सामाजिक सुधारणा, शिक्षण, ग्रामीण वास्तव, राजकारण, अर्थकारण, विज्ञान, पर्यावरण, कला आणि संस्कृती अशा विषयांचे प्रतिबिंब त्यात उमटते. काळानुसार वाचकांच्या आवडीनिवडी आणि सामाजिक प्रश्न बदलले; त्यानुसार संपादकांनीही अंकात बदल केले. दरवर्षी शेकडो पारंपरिक दिवाळी अंक प्रकाशित होतात. साहित्यिक आनंदा बरोबरच त्यांची मोठी व्यावसायिक बाजारपेठ आहे. छपाई, मुद्रण उद्योग, लेखक-कवींचे मानधन आणि वितरण यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. आज अनेक मंचांवर छापील अंकासोबत ई- दिवाळी अंक आणि पीडीएफ स्वरूपातील अंकही विकले जातात. वाचकांनी अंक खरेदी करावेत म्हणून काही प्रकाशक सवलती देतात आणि अंकासोबत पुस्तके भेट देतात. एकेकाळी ‘सत्यकथा’, ‘मौज’, ‘अनुष्टुभ’, ‘वाङ्‍मयशोभा’, ‘कवितारती’, ‘ललित’, ‘दीपावली’, ‘अस्मितादर्श’, ‘युगवाणी’, ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’, ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’, ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘मेनका’, ‘वसंत’, ‘सुगंध’, ‘विशाखा’, ‘रसिक अमृत’, ‘साधना’, ‘अक्षर’, ‘कथाश्री’, ‘जत्रा’, ‘ऋतुरंग’, ‘अंतर्नाद’ अशा नियतकालिकांचा दबदबा होता. यापैकी काहींचे प्रकाशन बंद पडले, तर काही आजही सुरू आहेत. बाल साहित्यात ‘आनंद’, ‘गंमत जंमत’, ‘कुमार’, ‘बालवाडी’, ‘टॉनिक’, ‘किशोर’ आणि ‘मुलांचे मासिक’ यांचा एकेकाळी लौकिक होता, आजही आहे. आज ‘किशोर’ हे सरकारी बाल मासिक सुरू आहे. नागपूरच्या ‘मुलांचे मासिक’चा यंदा शंभरावा दिवाळी अंक प्रकाशित होत आहे. ‘मौज’ने शंभर, ‘हंस’ने ऐंशी, ‘दीपावली’ने ब्याऐंशी, तर ‘ललित’ने त्रेसष्ट वर्षे पूर्ण केली आहेत. वि.स. खांडेकर, ना.सी. फडके, पु.ल. देशपांडे, रणजित देसाई, ना.स. इनामदार, ग.दि. माडगूळकर, गंगाधर गाडगीळ, जी.ए. कुलकर्णी, अरविंद गोखले, पु.भा. भावे, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, वसंत सबनीस, जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी, मधु मंगेश कर्णिक, अनिल अवचट, शांताबाई शेळके, इंदिरा संत, ग्रेस, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि ना.धो. महानोर अशा अनेक मान्यवरांचे लेखन दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाले. दिवाळी अंकासाठी कोणताही विषय वर्ज्य नसतो. वृत्तपत्रांचेही दिवाळी अंक प्रकाशित होतात. काही संपादक वर्षभर तयारी करून गुणवत्तेसाठी मेहनत घेतात; काही अंक ऐन दिवाळीत, तर काही एक-दोन महिन्यांनी प्रकाशित होतात. दरवर्षी नव्या अंकाची भर पडते, तर काहींना घरघर लागते. लेखकाच्या नावावर अंक विक्री होण्याचे दिवस आता संपले आहेत. संख्या वाढत असली तरी गुणात्मक दर्जा जपणे आवश्यक आहे. वाढती संख्या आणि गुणवत्ता यांचा ताळमेळ साधला पाहिजे. लोकप्रियतेच्या ओघात गुणवत्ता घसरू नये. दिवाळी अंकाची ११७ वर्षांची परंपरा आणि मान्यवरांचे योगदान लक्षात घेता पुढेही लोकप्रियता व वाङ्‍मयीन दर्जा टिकवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. दिवाळी अंक म्हणजे शतकभर उजळलेला शब्ददीप आहे; तो सतत तेवत ठेवला पाहिजे.

५० हजार लोक, घोड्यावर बसलेली रेखा खाली कोसळली! अख्खा स्टेडियम चिडीचूप, दिग्दर्शकाने ३५ वर्षांनी सांगितला किस्सा

गौरव मोरे, विशाखा सुभेदार की ओंकार भोजने; कुणी हास्यजत्रा सोडल्यावर सगळ्यात जास्त वाईट वाटलं? सचिन गोस्वामी म्हणाले-

Latest Marathi News Update : दिवाळी, छठपूजेच्या गर्दीमुळे पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनससह ६ रेल्वे स्थानकांवरील फलाट तिकीट विक्री केली बंद

Israel PM Race: नेतन्याहू यांच्याऐवजी आयझेनकोट इस्रायलचे नवे पंतप्रधान बनणार का? अरब पक्षांनी दिला पाठिंबा; पण नेमका पेच काय?

ACB Action: मोफत कायदेशीर मदतीच्या नावाखाली लाचखोरी! वकील ताब्यात, पत्नीविरोधातही गुन्हा; एसीबीने रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT