छत्रपती संभाजीनगर

दिवाळीच्या सुट्ट्या, मामाचं गाव अन् बालपणीचा आनंद हरवला!

CD
(दीपोत्सव लेख) .... मामाच्या गावची ओढ आता उरली आठवणीत .... दिवाळी म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते बालपणीचं निरागस जग! मातीच्या घराचं सारवलेलं अंगण, फराळाचा दरवळ, मामाच्या गावाला जाण्याची लगबग, मित्रांसोबत फोडलेले फटाके आणि संध्याकाळपर्यंत रंगणारे मैदानी खेळ... १९९० च्या दशकातील दिवाळीचा आनंद काही औरच होता. आज २०२६ मध्ये दिवाळीचा सण तितक्याच उत्साहाने साजरा होत असला, तरी त्या काळातील बालपण मात्र कुठेतरी हरवल्याची भावना मनात घर करून जाते. -अरुण ठोंबरे, केदारखेडा ..... १९९० च्या दशकात दिवाळीच्या सुट्या लागल्या की मुलांच्या आनंदाला पारावार राहत नसे. शाळेला सुट्ट्या लागण्यापूर्वीच मामाच्या गावाला जाण्याची तयारी सुरू व्हायची. मामाच्या गावाला जायचं म्हटलं की गावापासून तीन ते चार किलोमीटर पायी चालत बसस्थानक गाठावं लागायचं. बसस्थानकावर पोचल्यानंतर तासनतास बसची वाट पाहावी लागायची. कधी बस वेळेवर यायची, तर कधी बराच वेळ ताटकळत उभं राहावं लागायचं. मात्र, बस दिसताच चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असायचा. बसमध्ये जागा मिळाली की मामाच्या गावाकडे निघाल्याचा आनंद गगनात मावेनासा व्हायचा. आजच्या काळात काही मिनिटांत वाहनाने प्रवास होतो; मात्र त्या काळातील पायी चालणं, बसची वाट पाहणं आणि प्रवासातील गंमती-जमती यांची मजाच काही वेगळी होती. दिवाळीत मामाच्या गावाला जायचं असल्याने घरातील तयारीलाही वेग यायचा. त्या काळात अनेकांची घरे मातीची असायची. दिवाळीपूर्वी घर सारवण्यासाठी आईची धावपळ सुरू व्हायची. आईला मदत म्हणून गडीवरून माती आणणे, घरासमोरची जागा स्वच्छ करणे अशी छोटी-मोठी कामे मुलंही आनंदाने करायची. घर सारवताना ओल्या मातीचा दरवळ संपूर्ण घरात पसरायचा. त्या मातीचा सुगंध आजही आठवणींच्या कप्प्यात ताजा आहे. घराला नवा साज चढवून मामाच्या गावाला जाण्याची तयारी पूर्ण व्हायची. मामाच्या घरी पोचताच मामाची मुलं आणि गल्लीतील मित्र आनंदाने जवळ यायचे. अनेक दिवसांनी भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा. मामाकडून टिकल्या, सुरसुऱ्या, लवंगी फटाके आणले जायचे. एकेक फटका जपून फोडताना होणारा आनंद शब्दांत सांगता येणार नाही. फटाक्यांचा आवाज, धुराचे लोट आणि मुलांचा किलबिलाट यामुळे संपूर्ण गल्ली दिवाळीच्या उत्साहात न्हाऊन निघायची. मामाच्या गावात नवीन मित्र जोडले जायचे. उन्हाळ्याच्या सुट्या असोत किंवा दिवाळीच्या, मामाच्या घरी जाण्याची ओढ कायम असायची. तिथे तयार झालेली मैत्री पुढच्या भेटीची आतुरता वाढवायची. त्या काळात मुलांना खेळण्यासाठी मोबाइल किंवा महागड्या खेळण्यांची गरज नव्हती. गल्लीतील मित्र एकत्र आले की खेळांची मैफल रंगायची. सुरपारंब्या, लपाछपी, विटीदांडू, गोट्या, गल्लीतील पारंपरिक खेळ अशा विविध खेळांमध्ये संध्याकाळ कधी व्हायची, हे कळतही नसे. झाडांच्या फांद्यांवर चढणे, लपण्यासाठी जागा शोधणे, विटीदांडू खेळताना होणारे वाद आणि पुन्हा काही क्षणांत एकत्र येणे, यातच बालपणाचा खरा आनंद सामावलेला होता. संध्याकाळ झाली की घरातून आईची हाक यायची; पण खेळात रंगलेल्या मुलांना घरी परतण्याची इच्छाच होत नसे. कधी मित्रांसोबत खेळताना धुळीने माखलेले कपडे, तर कधी पडल्यामुळे लागलेल्या खरचटण्यांच्या खुणा घेऊन घरी परतायचं. तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच उत्साहाने खेळायला जायचं. दरम्यान, काळ बदलला, तंत्रज्ञान पुढे गेलं, दळणवळणाची साधने वाढली. पूर्वी मामाच्या गावाला जाण्यासाठी पायी चालत बसस्थानक गाठावं लागायचं; आज वाहनांची सोय आहे. पूर्वी मामाच्या घरी पोचल्यावर प्रत्यक्ष भेटीतून नाती घट्ट व्हायची; आज मोबाइलवर व्हिडिओ कॉल करून संवाद साधला जातो. मात्र, या सोयी वाढताना नात्यांमधील प्रत्यक्ष भेटीचा जिव्हाळा काहीसा कमी झाल्याची खंत अनेकांना जाणवते. पूर्वी दिवाळीच्या सुट्यामध्ये मामाच्या गावातील मित्रांसोबत मैदानी खेळ खेळले जायचे. आता अनेक मुलांच्या हातात मोबाईल आले आहेत. सोशल मीडियाने संवादाची साधने वाढवली; मात्र प्रत्यक्ष भेटून गप्पा मारणे, एकत्र खेळणे आणि मैत्रीचा आनंद अनुभवणे कमी होत चालले आहे. मोबाईलवरील खेळांमध्ये रमलेली मुलं अनेकदा घरातच वेळ घालवतात. त्यामुळे एकत्र खेळण्याची, मित्रांसोबत मस्ती करण्याची आणि नाती जपण्याची सवय कमी होत असल्याचे चित्र दिसते.१९९० च्या दशकातील दिवाळी आणि २०२६ मधील दिवाळी यामध्ये मोठा बदल झाला आहे. त्या काळात साध्या गोष्टींमध्ये मोठा आनंद होता. मामाच्या गावाला जाण्यासाठी केलेला पायी प्रवास, बसची वाट पाहण्याची उत्सुकता, मातीच्या घराचा सुगंध, मामाच्या गावातील मित्रांची साथ, फटाक्यांची आतषबाजी आणि मैदानी खेळ यांची सर आजच्या डिजिटल मनोरंजनाला येणार नाही. आजही दिवाळी आली की बालपणीच्या त्या आठवणी मनात फेर धरतात. मामाचं गाव, तेथील मित्र, अंगणातले खेळ आणि आईच्या हातची माया आठवते. काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या, काही माणसं दुरावली, काही मित्र संपर्काबाहेर गेले; पण त्या आठवणी मात्र मनाच्या कोपऱ्यात जपून राहिल्या आहेत. खरंच, त्या काळी साधनं कमी होती; पण आनंद भरपूर होता. आज साधनं भरपूर आहेत; मात्र तो निरागस आनंद कुठेतरी हरवला आहे. दिवाळी आजही येते, सुट्ट्याही मिळतात; पण मामाच्या गावाला जाण्याची ती ओढ, मित्रांसोबतची ती धमाल आणि बालपणीच्या दिवाळीचा तो गोडवा पुन्हा अनुभवायला मिळेल का? हा प्रश्न मात्र प्रत्येक जुन्या पिढीच्या मनात नक्कीच डोकावतो!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: दोन सिक्स अन् रोहित शर्माने मोडीत काढला शाहिद आफ्रिदीचा विक्रम! या खास यादीत 'हिटमॅन' नंबर-१

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Trending News: ज्याने नोकरी दिली, त्याचेच 170 कोटी लुटले! महिलेचा घरातील अजब कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

Latest Marathi News Live Update: नालासोपाऱ्यात आगीच्या तांडव; दोन गाड्या जळून खाक

BAN vs WI, Test: १८४ वर ७ बाद... अन् मग तोहीद हृदोयची डबल सेंच्युरी! तिसराच सामना खेळताना बांगलादेशला दिली आघाडी

SCROLL FOR NEXT