(आली दिवाळी लोगो) मार्केट फोटोसह
--------
फॅशनचा नवा ट्रेंड, नवीन कपड्यांच्या खरेदीचा उत्साह
-------
परभणीची कपडा बाजारपेठ सजली; ग्राहकांची होतेय गर्दी
----
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. २५ ः दिवाळी म्हटले की नवे कपडे, फॅशन, खरेदीचा उत्साह या पार्श्वभूमीवर शहरातील कपडा बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. बदलत्या फॅशननुसार कपड्यांचे नवनवीन प्रकार बाजारात दाखल झाले असून, आपल्या आवडीचा, बजेटमध्ये बसणारा पोशाख खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे. पारंपरिक पेहरावासोबतच आधुनिक फॅशनचा मेळ यंदाच्या कपड्यांत पाहायला मिळतो आहे.
महिलांत आकर्षक साड्या, डिझायनर ब्लाउज, कुर्ती, अनारकली ड्रेस आणि इंडो-वेस्टर्न पोशाखांना पसंती मिळत आहे. तरुणींत पेस्टल रंग, आकर्षक प्रिंट्स आणि साध्या; मात्र उठावदार डिझाइनच्या कपड्यांची आवड दिसून येते. पुरुषांत कुर्ता-पायजमा, नेहरू जॅकेट, लीनन शर्ट, कॅज्युअल पोशाखांची मागणी असते. लहान मुलांसाठीही रंगीबेरंगी पारंपरिक कपड्यांपासून ते आधुनिक फॅशनेबल ड्रेसपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत. मोबाइल, सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन फॅशनची माहिती सहज मिळत असल्याने ग्राहक कपडे निवडताना रंग, डिझाइन आणि स्टाइलकडे विशेष लक्ष देत आहेत. ऑनलाइन दिसणाऱ्या फॅशनची झलक स्थानिक दुकानांमध्येही शोधली जात आहे. मात्र, कपड्यांचा पोत, फिटिंग, गुणवत्ता प्रत्यक्ष पाहून खरेदी करण्याकडेही अनेकांचा कल आहे. महागाईमुळे ग्राहक किंमत आणि गुणवत्ता यांचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण कुटुंबासाठी कपडे खरेदी करताना सवलती, आकर्षक ऑफर्स, परवडणाऱ्या किमतींचा विचार केला जात आहे. दिवाळी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीजेसाठी नवीन कपडे घेण्याची परंपरा कुटुंबात जपली जाते. नवीन कपडे परिधान करून सण साजरा करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. याच आनंदातून परभणीच्या कपडा बाजारपेठेत खरेदीचा उत्साह दिसून येत असून, दिवाळी जसजशी जवळ येईल, तसतशी ग्राहकांची वर्दळ वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
---
व्यापाऱ्यांना उलाढालीची अपेक्षा
दिवाळी हा कपडा व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा हंगाम मानला जातो. सणाच्या काळात ग्राहकांची वाढणारी वर्दळ, खरेदीमुळे व्यवसायाला चालना मिळते. यंदा ग्राहकांचा प्रतिसाद कसा राहतो, याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. दिवाळीच्या अखेरच्या दिवसांत कपड्यांच्या खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता बाजारपेठेतील हालचाली आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकूणच वर्षातील सर्वात मोठ्या सणाच्या स्वागतासाठी परभणीची कपडा बाजारपेठ सज्ज झाली असून, नवीन कपड्यांच्या खरेदीतून सणाचा उत्साह अनुभवायला मिळत आहे. आता दिवाळीच्या खरेदीला किती वेग येतो, बाजारपेठेत किती उलाढाल होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---
(((कोट)))
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी विविध प्रकारचे आकर्षक कपडे उपलब्ध करून दिले आहेत. सध्या ग्राहकांची खरेदीसाठी ये-जा सुरू असून, पुढील काही दिवसांत विक्री वाढेल अशी अपेक्षा आहे.
- गोविंद वट्टमवार, कापड व्यापारी, परभणी
--
(((कोट)))
दिवाळीसाठी कुटुंबातील सर्वांसाठी कपडे खरेदी करायचे आहेत. बाजारात विविध प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत; मात्र वाढत्या किमती लक्षात घेऊन बजेटमध्ये बसणाऱ्या कपड्यांना आम्ही प्राधान्य देत आहोत.
- अभय मानवतकर, ग्राहक, परभणी
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.