दिवाळी आली, पण विकासकामांना मुहूर्तच नाही
--
खोळंबा ः जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्य अस्वस्थ
--
छत्रपती संभाजीनगर, ता. ५ : गेल्या दहा महिन्यांत तीनवेळा निवडणूक आचारसंहितेचा फटका बसल्याने जिल्हा परिषदेची विकासकामे अद्याप कागदावरच आहेत. एकीकडे रस्ते, इमारती, वर्गखोल्या आणि सिंचनाच्या कामांना प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे पूर्ण केलेल्या कामांची बिले मिळवण्यासाठी ठेकेदारांची धावपळ सुरू आहे. दिवाळीच्या तोंडावर मागील दोन वर्षांतील प्रलंबित कामांची चार कोटींची देयके अदा करण्यात आली असली, तरी चालू वर्षातील एकाही कामाला अद्याप सुरवात झालेली नाही.
महापालिका व जिल्हा परिषद, विधान परिषद आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे गेल्या दहा महिन्यांत तीनवेळा आचारसंहिता लागू झाली. परिणामी, जिल्हा परिषदेत विकासकामांचे प्रस्ताव तयार करणे, निधीचे नियोजन, प्रशासकीय मान्यता आणि निविदा प्रक्रिया या टप्प्यांवर कामकाज रखडत राहिले. यंदाच्या आर्थिक वर्षातील एकाही कामाला अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे कार्यारंभ आदेश निघण्याचा आणि प्रत्यक्ष कामे सुरू होण्याचा प्रश्नच निर्माण झालेला नाही. जिल्हा परिषदेकडे १५ व्या वित्त आयोगाचे ६६ कोटी, उपकराचे प्रशासकीय खर्च जाऊन शिल्लक राहिलेले ४० कोटी आणि जिल्हा नियोजन समितीचे सुमारे २१४ कोटी रुपयांचे नियोजन प्रस्तावित आहे. मात्र, या कामांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे सदस्यांसह पदाधिकारी अस्वस्थ आहेत.
----
चार कोटींची जुनी देयके अदा
दिवाळी सणामुळे मागील आठवडाभरात लेखा विभागाने विविध कामांची सुमारे चार कोटींची बिले अदा केली. ही देयके प्रामुख्याने मागील दोन वर्षांतील प्रलंबित कामांची होती. त्यामुळे चालू वर्षातील कामांची बिले मिळवण्यासाठी नव्हे, तर जुन्या कामांच्या देयकांसाठी ठेकेदारांचा पाठपुरावा सुरू आहे. दरवर्षी दिवाळीपूर्वी लेखा विभागात होणारी गर्दी यंदा तुलनेने कमीच असल्याचे सूत्रांनी सांगितले.
----
आता दिवाळीनंतरच विकासकामांना मुहूर्त
आता १३ नोव्हेंबरला जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. त्यात प्रस्तावित विकासकामांच्या नियोजनाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रशासकीय मान्यता आणि पुढील प्रक्रियेला गती मिळेल. दरम्यान, दुष्काळ निवारणाच्या कामांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेने प्रस्तावित केलेल्या २१५ कोटींच्या कामांपैकी काही कामांना कात्री लागेल, अशीही चर्चा जि.प.मध्ये सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.