लालपरी सुखरूप नेणार घरी
-----
धाराशिव विभागाकडून जादा बसचे नियोजन; ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध
-----
सकाळ वृत्तसेवा ः
धाराशिव, ता. २२ ः दिवाळी सणात गावी येणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या धाराशिव विभागाने जय्यत तयारी केली आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगरहून गावी परतणाऱ्या प्रवाशांसाठी नियमित फेऱ्यांसह अतिरिक्त जादा बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
प्रवाशांचा वाढता ओघ लक्षात घेता चार ते सात नोव्हेंबर या कालावधीत विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुणे मार्गावर १७, छत्रपती संभाजीनगरसाठी दोन आणि भूम ते परभणी मार्गावर एक जादा फेरी धावणार आहे. तसेच एक ते २२ नोव्हेंबरदरम्यान अन्य आठ जादा फेऱ्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. शिवाय, बसस्थानकांवर ऐनवेळी गर्दी वाढल्यास परिस्थितीनुसार आणखी तत्काळ जादा बस सोडण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
दिवाळीचा सण म्हणजे घरापासून दूर नोकरी-व्यवसायानिमित्त शहरात राहणाऱ्या प्रत्येकाला गावी येण्याची, नाती जपण्यासाठीची संधी. दिवाळीच्या या आनंदात कोणताही खंड पडू नये, यासाठी बस चाकरमान्यांच्या भावनांचे आणि आपुलकीचे हक्काचे नाते बनून धावते. पुणे असो वा छत्रपती संभाजीनगर, दिवाळीत हक्काच्या घरी परतणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी लालपरी प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे.
----
नियमित फेऱ्यांची स्थिती
दिवाळीच्या दिवसांत प्रवाशांना अखंडित सेवा मिळावी म्हणून धाराशिव विभागातून नियमित फेऱ्याही सुरू राहणार आहेत. पुणे मार्ग : एकूण ४९ नियमित फेऱ्या (धाराशिव दहा, उमरगा नऊ, परंडा सात, भूम सात, तुळजापूर नऊ आणि कळंब नऊ). छत्रपती संभाजीनगर मार्ग : एकूण १५ फेऱ्या (धाराशिव दोन, उमरगा दोन, भूम एक, कळंब चार, परंडा दोन आणि तुळजापूरवरून छत्रपती संभाजीनगर व धुळेसाठी प्रत्येकी दोन फेऱ्या)
----
तिकीट आरक्षणाची सोय सुरू
दिवाळीसाठी गावी येताना आणि सण संपल्यानंतर पुन्हा शहरात परतताना प्रवाशांचा प्रवास सोयीचा व्हावा, यासाठी एक ते २२ नोव्हेंबर या कालावधीत सीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवासी एसटी महामंडळाच्या मोबाइल ॲपवरून ऑनलाइन किंवा थेट बसस्थानकातील आरक्षण कक्षातून आपले सीट बुक करू शकतात, अशी माहिती धाराशिव विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.