पान १ लीड
---
दिवाळीचा उत्साह शिगेला; खरेदीसाठी गर्दी
रोषणाई, कपडे आणि फराळ साहित्याने बाजारपेठ हाऊसफुल
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. १ : प्रकाशाचा, मांगल्याचा आणि आनंदाचा सण असलेली दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या मंगलमयी सणाची जोरदार तयारी करण्यासाठी बीडकरांचा उत्साह सध्या शिगेला पोचला आहे. सणापूर्वीचा शेवटचा रविवार आणि सुटीचा मुहूर्त साधत बीड शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या सुभाष रोडवर खरेदीसाठी अक्षरशः अलोट जनसागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. कपड्यांची दुकाने असोत, रोषणाईचे साहित्य असो वा फराळाचा किराणा; प्रत्येक ठिकाणी ग्राहकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. खरेदीच्या या अभूतपूर्व उत्साहामुळे संपूर्ण बाजारपेठेत चैतन्याचा झगमगाट आणि मोठी आर्थिक उलाढाल पाहायला मिळत आहे.
दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा सण मानला जातो. या सणाच्या पूर्वसंध्येला खरेदीचे विशेष महत्त्व असते. दिवाळीपूर्वीचा शेवटचा रविवार हा खरेदीसाठी अत्यंत मोक्याचा मानला जातो. याच पार्श्वभूमीवर, नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांनी रविवारच्या सुटीचा दिवस साधत कुटुंबासह खरेदीसाठी घराबाहेर पाऊल टाकले. बीड शहरातील सर्वात गजबजलेला आणि मुख्य व्यापारी मार्ग असलेल्या सुभाष रोडवर सकाळपासूनच खरेदीसाठी ग्राहकांची पावले वळू लागली होती. दुपारनंतर या गर्दीत प्रचंड वाढ होऊन रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती. संपूर्ण सुभाष रोड आणि परिसरातील बाजारपेठ खरेदीच्या प्रचंड गर्दीने फुलून गेली होती. ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदीसाठी शहरात दाखल झाल्याने वाहतुकीची मोठी वर्दळ पाहायला मिळाली.
दिवाळीत नवीन कपडे परिधान करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठीच नवीन वस्त्रे खरेदी करण्यासाठी कापड बाजारात मोठी लगबग उडाली होती. शहरातील नामांकित कपड्यांच्या मॉल्स आणि दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड झुंबड उडाली होती. विशेषतः महिला आणि तरुणी वर्गाचा कल पैठणी, सिल्क साड्या, डिझायनर ड्रेसेस आणि इंडो-वेस्टर्न कपड्यांच्या खरेदीकडे सर्वाधिक दिसून आला. तर तरुणाईने नवनवीन फॅशनच्या जीन्स, शर्ट्स आणि पारंपरिक कुर्त्यांना पसंती दिली. लहान मुलांच्या कपड्यांच्या दालनातही पालकांची मोठी गर्दी होती.
यंदाच्या दिवाळीत घराची सजावट अधिक आकर्षक करण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. सुभाष रोडवरील सजावटीच्या साहित्यांच्या दुकानांवर पर्यावरणपूरक पणत्या, विविध आकारांचे आणि रंगांचे आकर्षक आकाशकंदील, रांगोळीचे रंग आणि विविधरंगी इलेक्ट्रिक रोषणाईच्या माळा खरेदी करण्यासाठी ग्राहकांची एकच धडपड सुरू होती. फुलांचे हार आणि घराला लावण्यासाठीचे आकर्षक झुंबरही मोठ्या प्रमाणावर विकले जात आहेत. जसजशी संध्याकाळ झाली, तसतशी संपूर्ण बाजारपेठ विविधरंगी दिव्यांच्या प्रकाशाने पूर्णपणे झगमगून निघाली होती. रात्रीच्या वेळी येथील परिसर लक्षवेधी रोषणाईमुळे उजळून निघाल्याने खरेदीचा आणि सणाचा आनंद अक्षरशः द्विगुणित झाला होता.
फराळाशिवाय दिवाळीचा सण अपूर्णच मानला जातो. त्यामुळे गृहिणीवर्गाचे लक्ष आता फराळ तयार करण्याकडे लागले आहे. यासाठी लागणारा दर्जेदार कच्चा माल जसे की डाळी, रवा, मैदा, बेसन पीठ, गोडेतेल, साजूक तूप, सुकामेवा आणि विविध मसाल्यांच्या खरेदीसाठी किराणा दुकानांमध्ये महिलांची मोठी गर्दी जमली होती. घमघमणाऱ्या मसाल्यांच्या आणि सुकामेव्याच्या वासाने बाजारपेठेत दिवाळीची चाहूल अधिक गडद केली होती. नोकरी करणाऱ्या महिला आणि वेळेची कमतरता असणाऱ्यांनी काही ठिकाणी तयार फराळ खरेदी करण्यालाही पसंती दिल्याचे दिसून आले. त्यामुळे किराणा मालाच्या दुकानांपासून ते अगदी रस्त्याकडच्या फराळ साहित्याच्या स्टॉलपर्यंत सर्वत्र ग्राहकांची तुफान गर्दी कायम होती.
-----
कोट
यंदाच्या दिवाळीपूर्वीच्या अखेरच्या रविवारी आमच्या दुकानात रवा, मैदा, डाळी, तेल, तूप आणि सुकामेव्याच्या खरेदीसाठी महिला वर्गाची अक्षरशः झुंबड उडाली होती. गेल्या काही दिवसांपासून बाजारात संथ असलेली उलाढाल आज सुटीच्या दिवशी अचानक वाढली. माल विकण्यात आणि ग्राहकांना सेवा देण्यात आजचा संपूर्ण दिवस कसा निघून गेला हे समजलेच नाही. फराळ आणि किराणा साहित्याची अशीच तुफान विक्री यंदा पाहायला मिळत आहे.
- गणेश रुकर, किराणा दुकानदार, बीड
----
दिवाळीच्या सणात नवीन कपडे खरेदी करण्याला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व असते. आज रविवारचा सुटीचा दिवस आणि दिवाळी तोंडावर असल्याने आमच्या कपड्यांच्या दुकानात लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली होती. साड्या, डिझायनर ड्रेसेस आणि रेडीमेड कपड्यांना यंदा ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. बाजारात आलेल्या नवनवीन कपड्यांच्या ट्रेंडला तरुणाईकडून मोठी पसंती मिळत आहे.
- भागवत जाधव, सिद्धिविनायक ड्रेसेस, बीड
-----
रोषणाईच्या साहित्याने बाजारपेठ उजळली
दिवाळीत घराची सजावट आकर्षक करण्यासाठी यंदा इलेक्ट्रिक रोषणाईच्या माळा, एलईडी लाइट्स, रंगीबेरंगी पणत्या आणि झगमगाट करणाऱ्या पारंपारिक तसेच आधुनिक आकाशकंदिलांना ग्राहकांकडून खूप मोठी मागणी आहे. सुभाष रोडवरील आमच्या दुकानात आज दिवसभर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या उत्साहामुळे आणि रोषणाईच्या साहित्यामुळे संपूर्ण बाजारपेठ जणू उत्सवासारखी उजळून निघाली आहे.
- सचिन झाडे, इलेक्ट्रिकल लाइटिंग दुकानदार, बीड
----
फोटो कॅप्शन
बीड : दिवाळी खरेदीसाठी सुभाष रोडवर उसळलेली प्रचंड गर्दी आणि रोषणाईने झगमगणारी बाजारपेठ. (छायाचित्रे ः कृष्णा शिंदे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.